त्याकाळी इंग्लड अमेरिकेत सुद्धा केरळच्या माणसाने बनवलेला ‘वागेस्वरी कॅमेरा’ हिट होता…

तुम्हाला दे धक्का मधला सायलीचा दवनीय बाप आठवतोय का?

परिस्थितीने गांजलेला होता पण लय हुशार होता. त्याच्याकडे बघून वाटलेलं की शोध लावायला सायंटिस्टच असावं लागतं असं नाही. डोकं आणि संधी वापरता आली की साधा, सर्व सामान्य माणूस पण असामान्य गोष्टी करून दाखवू शकतो

आता मी हे सगळं का बोलतेय, तर त्याला एक कारण आहे. ‘दे धक्का’ तर पिक्चर होता त्यामुळे बनाव स्टोरी होती पण त्यातल्या सायलीच्या बापासारख्याच केरळच्या एका भारी माणसाने लय वर्षांपूर्वी असाच एक शोध लावलेला, कॅमेराचा..

गोष्ट आहे १९४२ काळातली. केरळ मधल्या अलप्पूझा गावात म्यूझिकल इन्स्ट्रूमेंट्सचं एक दुकान होतं आणि या दुकानाचा जो मालक होता त्याच्या मुलाने हा कॅमेराचा शोध लावला. 

आता कॅमेराच्या कॅनन आणि निकॉन सारख्या कंपन्या जशा फेमस झाल्या आहेत तसाच हा कॅमेरा त्याकाळी खूप फेमस झाला होता. पण कॅमेरा बनवणाऱ्याचं तितकं नाव झालं नाही.  

या कॅमेराचं नाव होतं वागेस्वरी कॅमेरा आणि कॅमेरा बनवणाऱ्याचं नाव होतं के. करुणाकरण. 

करुणाकरण यांचे वडील म्हणजे कुंजू कुंजू भगावथार हे एक वादक होते आणि त्यांचं अलप्पूझा इथे वाद्यांचं एक छोटसं दुकान होतं. वाद्य बनवणं आणि बिघडलेली वाद्य दुरुस्त करण्याचं ते काम करायचे. त्यांच्या मुलाचं म्हणजे करुणाकरण यांचं सुद्धा शिक्षण घेता घेता, दुकानात येणं आणि कामाला हातभार लावणं चालू असायचं. 

वयाच्या सोळाव्या वर्षी, १९४२ साली एक घटना घडली आणि ती घडलेली घटना म्हणजेच या बाप आणि मुलाच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. 

अलप्पूझा गावात पद्मनाभन नेर नावाच्या माणसाचा एक स्टुडिओ होता. पद्मनाभन नेर एक दिवशी त्यांच्याकडे असणारे घुंगरू आणि परदेशातून आणलेला एक कॅमेरा दुरूस्त करण्यासाठी करुणाकरण यांच्या वडिलांच्या दुकानात आले. 

वाद्य दुरुस्त करण्यात तर करुणाकरण यांच्या वडिलांचा चांगला हातखंडच होता, पण प्रश्न होता तो कॅमेरा दुरुस्त करण्याचा. थोडे दिवस लागले पण तोही त्यांनी व्यवस्थित दुरुस्त करून दाखवला. 

त्यांच्या कामावर खुश होऊन पद्मनाभन यांनी करुणाकरण यांच्या वडिलांना कॅमेरा बनवण्याचा बिझनेस सुरू करण्याचा सल्ला दिला.  

हे चॅलेंज घेतलं.. पण करुणाकरण यांच्या वडिलांनी नाही तर स्वतः अवघ्या सोळा वर्षांच्या करुणाकरण यांनी. ते लागलीच कमाला लागले. त्यांनी काही पुस्तक चाळली, मासिकं वाचली. कॅमेरा काय असतो, कॅमेराची टेक्नॉलॉजी काय असते, तो वापरतात कसा, त्याचं मेकॅनिझम कसं चालतं, काम करतं अशा सगळ्या गोष्टींचा करुणाकरण यांनी व्यवस्थित अभ्यास केला. 

मग त्यांनी कॅमेराचं एक विशिष्ठ मॉडेल तयार केलं, त्यासाठी मुंबई आणि मद्रासला जाऊन लागणारी सगळी साधनं आणली आणि एक नवा कोरा कॅमेरा तयार केला. कॅमेराची एक लेन्स सोडली तर प्रत्येक भाग करुणाकरण यांनी स्वतः बनवला होता. 

Vageeswari Camera 85×15

काहीच दिवसांत हा कॅमेरा जगभरात पोहोचला. कॅमेरासाठीची डिमांड पण वाढायला सुरवात झाली, कॅमेरासाठी परदेशातून मागणी यायला लागली

पहिला कॅमेरा विकला गेला होता २५० रुपयांना. आणि त्या काळी २५० रुपये सुद्धा खूप होते. करुणाकरण त्या काळी महिन्याला जवळ जवळ १०० च्या घरात कॅमेरे बनवायचे आणि विकायचे. यामध्ये आठ वेगवेगळ्या पद्धतीच्या कॅमेरांचा समावेश होता. 

यातले लहान कॅमेरे पासपोर्ट साइज फोटो काढण्यासाठी वापरले जात असत तर मोठे कॅमेरे ग्रुप फोटो काढण्यासाठी वापरले जायचे. 

नंतर पुढे वागेस्वरी कॅमेरा फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये सुद्धा वापरला जाऊ लागला.  

जपानी टेक्नॉलॉजीचा, अल्ट्रासाऊंड स्कॅनर इमेजरी कॉपीअर डेवलप करण्यात सुद्धा करुणाकरण यांचं योगदान मोठं ठरलं. आणि त्यामुळे फोटोग्राफी इंडस्ट्रीत त्यांचं खूप मोठं योगदान आहे असं मानलं जातं.  

वागेस्वरी कॅमेराने त्यावेळी एक काळ गाजवला पण जसं ८० चं दशक सुरू झालं तसं रोज येणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजीला टफ देणं करुणाकरण यांना अशक्य होऊ लागलं आणि वागेस्वरी कॅमेरा मागे पडत गेला. शिवाय करुणाकरण यांना सुद्धा जेवढं एक्सपोजर मिळायला हवं होतं तेवढं मिळालं नाही, जितकं त्यांचं नाव व्हायला हवं होतं तितकं झालं नाही, आणि त्यांना कधी प्रसिद्धीची हाव सुद्धा वाटली नाही. 

त्यांनी त्यांचं पुढलं सगळं आयुष्यही त्याच केरळातल्या आपल्या छोट्या गावी घालवलं. पण करुणाकरण यांचं कॅमेराच्या दुनियेत खूप मोठं योगदान होतं आणि कायम राहील हे नक्की. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.