कोडॅक कॅमेरा बनवून जगाला फोटोग्राफी शिकवणाऱ्या ईस्टमनने शेवटी आत्महत्या केलेली

आजच्या डिजिटल जगात कॅमेऱ्याच्या किती व्हरायटी आहेत हे सांगणं मुश्किल, निकॉन, कॅनॉन ह्या कंपन्या त्यातल्या त्यात जगप्रसिद्ध आहेत. मोबाइलमधले चांगल्या दर्जाचे कॅमेरे हे आजच्या जगात किती आधुनिक कॅमेरे आहेत याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. पण एक काळ असा होता कि रीळच्या कॅमेरातून फोटो काढले जायचे.

जुन्या काळातले बरेचसे फोटो जर तुम्ही पाहिलेत तर ते इस्टमनच्या कॅमेऱ्यातून काढलेले असायचे. त्याकाळात इस्टमनचा कॅमेरा हा खूप मोठी गोष्ट मानली जात असे. पण ज्यावेळी जगात कुठंच कॅमेरा नव्हता तेव्हा इस्टमन कोडॅक कंपनीने जगातला पहिला कॅमेरा बनवला आणि खऱ्या अर्थाने फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी यांना चांगले दिवस आले. 

तर अगोदर जाणून घेऊया कि इस्टमन कोडॅक कंपनीने हा कॅमेरा कसा बनवला. इस्टमनची घरची परिस्थिती हलाखीची होती. वडील लवकर गेल्याने त्याच्या आईवर सगळी जबाबदारी आली होती. पुढे काहीतरी पोटापाण्याचा उदयॊग करावा म्हणून इस्टमनने फोटोग्राफीचा स्टुडिओ उभा केला. त्याला नंतर बॅंकेतसुद्धा नोकरी मिळाली.

बँकेपेक्षा फोटोग्राफीत नवीन काय करता येईल याच्यावर इस्टमनचं काम सुरु होतं. त्यावेळी त्याने फोटोग्राफीसाठी लागणाऱ्या ड्राय प्लेट्स बनवायला सुरवात केली. कारण त्यावेळी फोटोग्राफीसाठी ड्राय प्लेट्स वापरल्या जायच्या. ज्यावेळी इस्टमनचा हा व्यवसाय वाढीस लागला तेव्हा त्याने बँकेतली चांगली नोकरी सोडली आणि पूर्णपणे स्टुडिओकडे वळला. 

हेनरी ए. स्ट्रॉंग नावाच्या व्यवसायिकाबरोबर २३ मे १८९२ साली इस्टमनने एक कंपनी सुरु केली. ज्याचं नाव ठेवलं इस्टमन कोडॅक कंपनी.

कारण k हे इस्टमन आणि त्याच्या आईला आवडणारा अक्षर होतं. त्यांनी जगातला पहिला निगेटिव्ह रीळ बनवला. निगेटिव्ह म्हणजे ज्यात एखाद चित्र पांढऱ्या आणि निळ्या रंगात बहुधा भुतासारखं दिसतं.

कोडॅकने लावलेला हा शोध जगातल्या प्रत्येक कॅमेऱ्यात वापरला जाणार आहे याचं भान त्यांना त्याकाळी नव्हतं. त्यांनी जगातला पहिला कॅमेरा बनवला ज्यात फिल्म रोल ऍड केला गेलेला होता. या कॅमेऱ्यातून फोटो काढले जात होते हे तेव्हा मोठं आश्चर्य मानलं गेलं.  या कॅमेऱ्यामुळे कंपनीला चांगलाच फायदा होत गेला. कंपनीत तेव्हा फक्त फोटोग्राफीसाठी लागणारी साधनच तयार केली जात असे.

आता मार्केटमध्ये स्पर्धा वाढू लागली होती, त्यावेळी कोडॅक कंपनीने कॅमेऱ्याचं प्रोडक्शन बंद करून फक्त फोटोग्राफीसाठी लागणाऱ्या साधनांची जास्त विक्री केली. त्यामुळे कोडॅक कंपनीचे रीळ हे जे लोकं स्पर्धा करू पाहत होते तेसुद्धा विकू लागले. हे प्रकरण जवळपास २० व्या शतकापर्यंत सुरु होतं अजूनही इस्टमनचे रीळ आणि कॅमेरा परदेशात अँटिक पीस म्हणून ओळखला जातो. 

जबरदस्त प्रॉफिट इस्टमन कोडॅक कंपनीने कमावला. फोटो, रिल्स अशा अनेक गोष्टी त्यांनी विक्री करून भरमसाट पैसे मिळवला. बँकेमध्ये इस्टमनला ३ अमेरिकन डॉलर पगार होता पण आता स्वतःच्या व्यवसायात तो लाखो रुपये कमवत होता.

सगळ्यात मोठी गौरवाची गोष्ट म्हणजे निल आर्मस्ट्राँग आणि एल्ड्रिन यांनी जेव्हा चंद्रावर पाऊल ठेवलं तेव्हा चंद्राचा पहिला फोटो हा कोडॅकच्या कॅमेऱ्याच्या रिळातून टिपला होता. इतकंच नाही तर फिल्मी रोल बनवून त्यांनी मोठी क्रांती घडवून आणली. 

भारतातला पहिला सिनेमा राजा हरिश्चंद्र आणि पहिला रंगीत सिनेमा किसान कन्या या इस्टमन कोडॅकच्या कॅमेऱ्यातून शूट झाला होता. कोडॅकचे कॅमेरा रीळ हे सिनेमात अनेक लोकांनी उत्तमरीत्या वापरले.

दादा कोंडकेंच्या बऱ्याच सिनेमांमध्ये इस्टमन कलर हे नाव दिसत ते म्हणजे या इस्टमन कोडॅक कंपनीचे रीळ सिनेमात वापरण्यात आले होते त्याचा दाखला.

इस्टमन कोडॅकने पुढे आपली सगळी संपत्ती दान करून टाकली. शारीरिक आजारांमुळे तो शेवटच्या काळात त्रस्त झाला होता.

वयाच्या ७७ व्या वर्षी इस्टमनने छातीत गोळी मारून आत्महत्या केली आणि चिट्ठीत लिहिलं कि,मला जे करायचं होतं ते मी केलं आता जास्त वेळ थांबून मजा नाही.

पुढे कोडॅकच्या कॅमेऱ्यात वेळेनुसार भरपूर बदल होत गेले.  सध्याच्या काळात भलेही कितीपण भारीतले कॅमेरे येऊ पण कोडॅकच्या रीळची एकेकाळी प्रचंड क्रेझ होती.

आजच्या डिजिटल युगात मात्र कोडॅक कंपनीचे दुर्दैवी हाल सुरू आहेत. मध्यंतरी त्यांना ट्रम्प सरकारने कर्ज देऊन कोरोनाची औषध बनवायला सांगितलं होतं. या कॅमेऱ्याच्या निर्मात्या ईस्टमन प्रमाणे कोडॅक कंपनीने देखील स्वतःच्या हाताने आत्मघात केलाय हे खरंच आहे.

 

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.