फडणवीसांचा कागदावरच राहिलेला ‘नमामि चंद्रभागा’ प्रकल्प एकनाथ शिंदे पूर्ण करतील..??

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची महापूजा केल्यांनतर पंढरपूरच्या विकासाठी कुठलीच कमी पडू देणार नाही असं सांगितलंय.

याबद्दल सांगतांना “पंढरपुरात पिण्याचं मुबलक पाणी, शौचालये, चांगले रास्ते, पायाभूत सुविधा तसेच या ठिकाणांचं पावित्र्य जपत ज्या ज्या सोई सुविधा द्यायच्या आहेत त्यात हात आखडता घेणार नाही” असंही म्हंटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेनंतर परत एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नमामि चंद्रभागे प्रकल्प चर्चेत आलाय. मोठा गाजावाजा करून सुरु झालेला हा प्रकल्प कागदावरच राहिला.  आता या प्रकल्पाचं पुनरुज्जीवन होणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय.

‘नमामि चंद्रभागे’ पुनरुज्जीवित होईल का? 

२०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नमामि चंद्रभागा प्रकल्प सुरु केला. परंतु हा प्रकल्प आजही कागदावरच राहिलेला दिसतोय. या प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेलं वेबपोर्टल तर अस्तित्वातच नाही सोबतच नमामि चंद्रभागा प्राधिकरणाची सुद्धा काही माहिती नाही. २०१६ मध्ये अभियानाच्या सुरुवातीपासून बैठका आणि तुरळक कामे वगळता यात काही भरीव कामं  सुद्धा झालेली नाहीत. 

परंतु मुख्यमंत्र्यांच्या पंढरपुरातील घोषणेमुळे ‘नमामि चंद्रभागे’ प्रकल्प पुन्हा पुनरुज्जीवित होईल याची शक्यता वर्तवली जात आहे. 

नमामि गंगेच्या धर्तीवर सुरुवात झाली होती..

जून २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामि गंगे ही योजना सुरु केली होती. तसेच देशातील नद्यांच्या शुद्धीकरणाची योजनाही सुरु करण्यात आली होती. याच योजनेवरून प्रेरित होत मार्च २०१६ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नमामि चंद्रभागा अभियानाची सुरुवात केली होती.

परंतु निव्वळ पंढरपूर पुरती नदी स्वछ केल्याने होणार नाही. म्हणून संपूर्ण भीमा नदीकडे लक्ष देण्यासाठी जून २०१६ मध्ये नमामि चंद्रभागा प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. तसेच या प्रकल्पासाठी नमामि चंद्रभागा प्राधिकरणाची स्थापना सुद्धा करण्यात आली होती. या योजनेची सुरुवात करतांना टोकणस्वरूपात २० कोटी रुपयांची घोषणा केली होती. 

तसेच www.namamichandrabhaga.org या वेबपोर्टलची सुरुवातही केली होती. परंतु २०१७ मध्ये वेब पोर्टल हॅक झालं होतं आणि तेव्हापासून ते बंदच आहे.

आजपर्यंत झालेली कामे.. 

पंढरपूरच्या यमाई तलावाजवळ तुळशी वृंदावनची निर्मिती करण्यात आलीय. घाटांलगत ७० कोटींचे भुयारी गटाराचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तर नदीघाटाचे सौंदर्य वाढवण्यासाठी ५३८ मीटर लांबीच्या नदीघाटाचे सुद्धा काम पूर्ण झाले आहे आणि २७२९२ शौचालयांची व्यवस्था करण्यात आलीय. मात्र ही कामे पुरेशी नाहीत असे नागरिक सांगतात.

यासोबतच भीमा नदीच्या काठावरील गावांतून सांडपाणी नदीत जात असल्याने ऑक्टोबर २०२१ मध्ये १२० गावांमध्ये शोषखड्डे तयार करण्याचे काम हातात घेण्यात आले आहे. 

पण अजूनही काही आराखडे अपूर्णच आहेत..

अकलूज, माळीनगर, संग्रामनगर, माळेवाडी, गुरसाळे, गोपाळपूर आणि यशवंतनगर या सात गावांमधून भीमा नदीत सोडण्यात येणारं सांडपाणी, शुद्ध करून नदीत सोडण्याबाबत आराखडा तयार करण्याची प्रक्रिया देवेंद्र फडणवीसांच्या काळात सुरु झाली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने यावर  कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे हा मुद्दा काही पुढे सरकला नसल्याचे विश्लेषक सांगतात. 

देवेंद्र फडणवीसांच्या काळात हा प्रकल्प जरी कागदावर असला तरी त्यासाठी काही प्रमाणात प्रयत्न चालू होते परंतु महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर या प्रकल्पासाठी कोणतीच तरतूद झाली नसल्याचे विश्लेषक सांगतात. 

नमामि चंद्रभागेच्या या अडचणी अजूनही दूर झालेल्या नाहीत.. 

भीमा नदीच्या उपनद्यांमधून येणारं सांडपाणी शुद्ध करणे, पुणे, पिंपरी चिंचवड शहरातुन येणारं  सांडपाणी तसेच पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या शहरातील औद्योगिक वसाहतींमधून येणारं सांडपाणी यावर अद्याप कोणतंही  काम हाती घेण्यात आलेलं नाही. 

साखर कारखाने, औद्योगिक वसाहती आणि शहरातील सांडपाण्याची समस्या..

भीमा नदीच्या किनाऱ्याच्या आसपास असलेल्या साखर कारखान्यांमधून मळी असलेलं प्रदूषित पाणी नदीत सोडण्यात येतं. तसेच पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या औद्योगिक वसाहतींमधून आणि पुणे शहरांतून सांडपाणी भिमा नदीत वाहून येतं.

या सांडपाण्यामुळे भीमा नदीवरील उजनी धरणातील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे. परंतु यासाठी अद्याप कोणतेही काम सुरु झालेले नाही. 

उजनी धरण ओलांडल्यावर नरसिंगपूर या संगमात भीमा नदीची उपनदी असलेली नीरा नदी सगळ्यात जास्त प्रदूषित पाणी भीमा नदीत वाहून आणते. यामुळे भीमा नदी पुन्हा जास्त प्रदूषित होते. हेच प्रदूषित पाणी पुढे पंढरपूरच्या नदी पात्रात येते. 

नीरा नदीचं प्रदूषित पाणी शुद्ध करण्यासाठी अजून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समोर असलेलं आव्हान म्हणजे.. 

पंढरपूरचे पावित्र्य जपण्यासाठी आधी भीमा नदीच्या शुद्धीकरणाकडे लक्ष द्यावे लागेल. कारण जोपर्यंत भीमा नदीच्या शुद्धीकरणाची समस्या सुटत नाही तोपर्यंत पंढरपूरचे पावित्र्य परत येणारं नाही.

त्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपूच्या विकासासाठी निधी देण्यात हात आखडता घेणार नसल्याची घोषणा केलीय. त्यामुळे या प्रकल्पाचं पुनरुज्जीवन केल्यास भरीव निधीची तरतूद करणे ही मुख्यमंत्र्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान असेल. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरचे पावित्र्य राखण्याची आणि विकासाला निधी मिळवून देण्याची घोषणा केलीय. परंतु बाकी नेत्यांच्या घोषणांप्रमाणे ही घोषणा सुद्धा हवेत विरते कि मग सत्यात येते हे मात्र भविष्यातच कळेल..

हे ही वाच भिडू

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.