चंद्रभागेचा आजवरचा सर्वात मोठा महापूर १९५६ साली आला होता असं सांगतात 

गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या परतीच्या पावसाने विठुरायाच्या पंढरीला देखील जोराचा तडाखा दिला. या मुसळधार पावसामुळे चंद्रभागेला पूर आला आणि पंढरपूरची वाताहत झाली. गेल्या कित्येक वर्षांनी असा महापूर पंढरीने पाहिला.

पुणे-सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी भीमा नदी म्हणजे जीवनदायनी.

पंढरपुरला वळसा घालणारी भीमा चंद्रभागा बनते. याविषयी अख्यायिका सांगितली जाते की, शापित चंद्राने इथे येवून या तीर्थात स्नान केले व तो शापमुक्त झाला म्हणूनच ही नदी अर्धचंद्राकार वाहू लागली व लोक तिला चंद्रभागा म्हणू लागले. पंढरपूरच्या पूर्वेला हे चंद्रकोरीसारखे विस्तीर्ण पात्र आहे. भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात.

गेल्या अनेक शतकांपासून संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी आषाढी व कार्तिकीच्या एकादशीसाठी पाय नामस्मरणाचा गजर करत शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरला येतात. कोणत्याही कारणामुळे वारीमध्ये खंड पडत नाही. यावर्षी आलेल्या कोरोनासारख्या महामारीचा अपवाद वगळता वारी अखंडपणे आहे.

अगदी महापुरात देखील वारी थांबली नव्हती. 

चंद्रभागेचा आजवरचा सर्वात मोठा महापूर १९५६ साली आला होता असं सांगतात. 

१९५६ साली ऐन आषाढीच्या वारीवेळी भीमा नदीला हा महाप्रचंड पूर आला. संपूर्ण महाराष्ट्रात तेव्हा जोराचा पाऊस झाला. विशेषतः पुणे जिल्ह्यात या पावसाचा जोर जास्त होता. याचा परिणाम भीमा नदीत आलेलं पाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतात घुसून पिकांची वाताहत करू लागले.

कधी नव्हे ते चंद्रभागेने रौद्ररूप धारण केले होते. पंढरपुरात तीन बाजुंनी पाणी घुसले. अनेकांचे संसार वाहून गेले. बाजारपेठेत दुकाने वाहून गेली. त्या पुरात चार-पाचशे घरे पडली. जुने पुराणे अडीचशे वर्षांचे अनेक वाडे पंढरपुरात आहेत. त्यांचं प्रचंड नुकसान झालं. वित्तहानी खूप झाली.

वाळवंटातील पुंडलिकाचे मंदिर सोडलं तर बाकी सर्व मंदिरे पाण्याखाली होती. विठुरायाचे मंदिर थोड्याशा उंचावर होते. तरी नामदेव पायरीला पाणी लागले होते.

त्यावर्षी देखील वारी पंढरपूरला येऊन पोहचली. मात्र संतांच्या पालख्या गावाबाहेरच रोखण्यात आल्या. मुसळधार पावसात पंढरपूरला आलेले लाखो भाविक वेशीबाहेरच थांबले. वारीची परंपरा अखंड राहावी म्हणून थोडे मानकरी पादुका घेऊन पांडुरंगाच्या भेटीला होडीने गेले.

विठोबाच्या दारात होडीने वारकरी पोहचले हे एक नवलच त्यावेळी घडले.

इतर वारकऱ्यांनी विठोबाच्या कळसाचे दुरून दर्शन घेतले. वारी व्यवस्थित पार पडली मात्र या महापुराने पंढरपूर नगरीला होत्याचे नव्हते केले. शेतकरी उद्धवस्त झाला. व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले. गुराढोरांच्या मृत्यूचे प्रमाण मोठे होते. काही प्रमाणात मनुष्यहानी देखील झाली होती. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या या भागाला महापुराचा एवढा मोठा फटका बसेल याची कोणीही अपेक्षा केली नव्हती.

उशिरा का होईना जाग आलेल्या प्रशासनाने अनेक मोठे निर्णय घेतले. 

मजबूत रस्ते बांधले. महापुराची सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपकाची सोया करण्यात आली. नदीवर नवीन पूल बांधला. त्यामुळे पाच किलोमीटरचा वळसा पडत असला, तरी वाहतूक खोळंबत नाही. रेल्वे पूल मजबूत करण्यात आला. दुथडी भरून वाहणाऱ्या भीमेला आवर घालण्यासाठी उजनी धरणाची संकल्पना पुढे आली.

महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण समजले जाणाऱ्या उजनीचे काम पूर्ण होण्यास जून १९८० साल उजाडले. या धरणाच्या भूमिपूजनावेळी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी साकडं घातलं होतं की,

“हे विठ्ठला तुझी चंद्रभागा मी अडवतोय, कारण या पाण्यावर शेतकऱ्यांच्या शेतात शाळूचे पीक जोमाने वाढेल आणि त्याच्या कणसाच्या दाण्यादाण्यात त्यांना पांडुरंगाचे दर्शन होईल.”

उजनी धरणाच्या निर्मितीमुळे सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी समृद्ध बनला. त्यांना दुष्काळावर मात तर करता आलीच शिवाय महापुरासारख्या अस्मानी संकटावर देखील आपल्याला काही प्रमाणात नियंत्रण स्थापन करता आले.

आजही उन्हाळ्यात रोडावलेली चंद्रभागा पावसाळ्यात दुथडी भरून वाहू लागते. आषाढीला नदीचे बहुतेक वाळवंट पाण्याखाली असते. १९८३ साली, १९९७ साली, २००८ साली मोठमोठे पूर भीमेला आले मात्र त्यांनी पंढरपुरात खूप मोठी हानी केली नाही.

मात्र यावर्षी कोरोना पाठोपाठ आलेल्या अवकाळी अतिवृष्टीने मात्र १९५६च्या प्रलयकारी आठवणींना उजाळा दिला. आजही इथला शेतकरी या ओल्या दुष्काळामुळे उघड्यावर आलाय. हाताशी आलेल्या पिकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. नुसते दौरे काढ्ण्यापेक्षा सरकारने त्यांना मदत जाहीर करून फाटलेल्या आभाळाला जमेल तेवढी ठिगळे लावण्याच्या या शेतकऱ्यांच्या प्रयत्नाला साथ द्यावी इतकीच किमान अपेक्षा.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.