गोव्याचं मुख्यमंत्रीपद आपल्याला झेपेल याचा पर्रीकरांनाच कॉन्फिडन्स नव्हता

गोव्याचे मनोहर पर्रिकर फक्त गोव्यातच नाहीत तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत ते फक्त त्यांच्या कार्यशैलीमुळे. त्यांच्या वटवृक्षाखाली गोव्यात भाजपा वाढली याबद्दल कोणत्याही गोवेकराच दुमत असणार नाही. पर्रीकरांनी आपले ते हयात असेपर्यंत आपलं सर्वस्व भाजपासाठी दिलं.

गोव्यात एक काळ असा होता की ज्या पक्षाला लोक चेष्टेने घेत होते. या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणे म्हणजे अनामत रक्कम हरविणे होते. त्या पक्षाला पर्रिकरांनी चेतना दिली, पक्षाला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि विरोधकांच्या छातीत धडकी भरविण्याइतपत पक्ष सक्षम, बळकट केला.

अशा या गोवेकर पर्रिकरांच्या, पक्षाच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे गोव्याचे लोक त्यांना मुख्यमंत्रीपदी स्वीकारतील का ? अशी धास्ती होती.

तर भाजपा संघटनेत ते सक्रिय झाले त्याच दरम्यान त्यांनी व्यवसायात नुकताच जम बसवला होता. त्यांच्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात राजकीय तत्त्वज्ञानच नव्हे तर राजकीय कौशल्यही आपल्याला अवगत आहे आणि त्या जोरावर मी राजकारणात तड गाठणार हा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा.

पुढील काळात भारतात हिंदुत्वाचे राजकारण व्हायला सुरुवात झाली.

महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीने गोव्यात भाजपाला साथ दिली. १९९४ मध्ये या पक्षाचे चार उमेदवार निवडून आले. सुरुवातीला मगोप, हिंदुत्ववाद याचा भाजपला लाभ झालाच. परंतु त्यानंतर पर्रीकरांनी स्वत:चे स्वतंत्र राजकारण सुरू केले व मागे वळून पाहिले नाही. त्यांच्याएवढा राजकारणाचा अभ्यास कोणी केला नसेल.

त्यातूनच गोव्यात काँग्रेस पक्षाच्या बंडखोरीला पर्रीकरांनी हवा दिली. काँग्रेसला संपायला आणि काँग्रेस बंडखोरांबरोबर भाजपाने सरकार स्थापन करायला कारणीभूत होते पर्रीकर. परंतु स्वत: पर्रीकरांनी या सरकारमध्ये मंत्रीपद काही स्वीकारले नाही.

त्याच दिवशी पर्रीकर त्यांच्या पत्रकार मित्राला घेऊन पणजीत दोन चकरा मारल्या. नंतर त्याला घेऊन ते म्हापशातील घरी गेले. तिथं त्या दोघांनी जेवण केलं. या चार तासांमध्ये स्वत:बद्दल विचारण्याचे धाडस पर्रीकरांना होत नव्हते. शेवटी धीर धरून पर्रीकरांनी विचारले,

मी मुख्यमंत्री बनलो तर लोक मला स्वीकारतील का?

तो त्यांचाच पाठीराखा होता. त्या पत्रकाराने त्यांना छातीठोकपणे उत्तर दिले, खरंच. तुम्ही हे शिवधनुष्य पेलू शकता. जातीयवादातून लोक तुमच्याकडे पाहाणार नाहीत.

पर्रीकरांनी कठोरपणे राज्यशकट हाकले. कधी नतद्रष्टांची साथ घेतली, कधी त्यांना पाडले, कधी राजकीय तडजोडी केल्या तर कधी पक्षसंघटनेलाही विश्वासात न घेता सरकारही स्थापन करण्यास ते कचरले नाहीत!

पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी प्रशासनात दरारा निर्माण केला. भ्रष्ट नेत्यांना कठोर शिक्षा केल्या, तुरुंगात डांबले याचा जनमानसावर विलक्षण परिणाम झाला आणि पर्रीकरांची छबी श्रीमान स्वच्छ, प्रामाणिक तशीच राजकीय सुपरमॅन अशी बनली.

फक्त गोव्यातच नाही तर महाराष्ट्रासह देशभर त्यांना प्रचंड मान होता. मोठ्या विलासी गाड्यांचा त्यांनी कधी हव्यास बाळगला नाही. साधेपणाने प्रवास केला. त्यामुळे गोव्यातले पत्रकार, बुद्धिवादी, मध्यमवर्गीय त्यांच्यावर खुश होते. राजकारणाच्या आजच्या दलदलीत ते शक्य तेवढे चारित्र्यवान असे राहिले.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.