मुख्यमंत्री आपल्या व्यवसायाला लोन मिळावं म्हणून बँकेकडे अर्ज घेऊन निघाले होते

आजकाल रोजच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदासाठी चाललेल्या मारामाऱ्या आपण पाहत असतो. सबंध  राज्याचा कारभार हाकायची संधी देणारी खुर्ची अनेकांचं स्वप्न असते. मुख्यमंत्र्याचा थाटमाट, त्यांच्या खुर्चीची ऐटच काही और असते. मुख्यमंत्री निघाले कि त्यांच्या पुढे मागे असणारा पोलिस गाड्यांचा ताफा या पदाची ताकद दाखवून देणारा होता.

मात्र आपल्या देशात असाही एक मुख्यमंत्री होऊन गेला जो स्कुटरवरून आपल्या ऑफिसला यायचा. आपल्या पदाच अवडंबर कधी त्यांनी केलं नाही. साधेपणा आणि स्वच्छ चारित्र्य ही त्यांची ओळख होती.

तुमच्या लक्षात आलंच असेल. ते मुख्यमंत्री म्हणजे मनोहर पर्रीकर.

पर्रीकर हे राजकारणी तर होतेच पण त्याच्याही आधी ते हाडाचे इंजिनियर होते. 

त्यांचा जन्म उत्तर गोव्याच्या म्हापसा या गावी एका मराठी कुटुंबात झाला. लहानपणापासून शाळेत हुशार होते. वडीलांचं छोटसं दुकान होत. मात्र त्यांची इच्छा होती की मुलाने डॉक्टर अथवा सीए बनावं. पण मनोहर यांचा ओढा इंजिनियरिंग कडे होता.

त्यांना इंजिनियर व्हायचं होतं आणि तेही भारतातल्या सर्वोत्कृष्ट कॉलेजमधून. आयआयटी मुंबई 

आयआयटी मध्ये प्रवेश मिळवणे हे त्याकाळीही मोठं आव्हान असायचं. अत्यंत अवघड समजली जाणारी प्रवेश परीक्षा पास करून या संस्थेत प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील सर्वोत्तम टॅलेंट म्हणून गणलं जातं. कोणतेही क्लासेस वगैरे न लावता फक्त अभ्यासाच्या जोरावर पर्रिकरांनी आयआयटी मुंबईमध्ये मेटालर्जी इंजिनियरिंगच्या पदवीसाठी प्रवेश मिळवला.

मात्र याच आयआयटीमध्ये आपल्या मित्रांना मदत करण्यातून ते विद्यार्थी चळवळीत आले आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीस सुरवात झाली.

अन्याय सहन करण्याची सवय पूर्वीपासूनच नव्हती. तिथल्या होस्टेल मेसच्या जेवणावरून एकदा विद्यार्थ्यांनी जोरदार वाद झाले. मनोहर पर्रीकर यांनी विद्यार्थ्यांना गोळा करून मेसवाल्या विरुद्ध जोरदार आंदोलन केलं व आपला हक्क मिळवला. पर्रीकर पुढे कॉलेजचे जनरल सेक्रेटरी देखील झाले.

आयआयटी मध्ये असतानाच यांच्यातील नेतृत्व गुण सामोरे आले. तिथे एक प्रचंड लोकप्रिय विद्यार्थी नेता म्हणून त्यांना ओळख मिळाली.

पुढे पासआउट झाल्यावर अमेरिकेला वगैरे नोकऱ्यांचे अमिष धुडकावून लावत गोव्याला परत आले. गोव्यातच एक नोकरी करून पाहिली पण त्यात मन रमले नाही. पुढे स्वतःचा व्यवसाय सुरु केला.

१९८१ साली तिथल्या इंडस्टीयल इस्टेट मध्ये गोवा हायड्रॉलिक्स नावाच्या फॅक्टरीची सुरवात केली. या छोट्याशा शेड मध्ये पर्रीकर हायड्रॉलिक इक्विपमेंट, न्यूमॅटिक सिलिंडर, पॉवर पॅकची निर्मिती करत. सचोटीने आणि मेहनतिने काम करायची तयारी पूर्वी पासून होती शिवाय सोबतीला पत्नीची साथ होती. तिच्या खंबीर पाठिंब्यावरच त्यांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरु करण्याचं धाडस केलं होतं.

लवकरच पर्रीकरांच्या फॅक्टरीचा जम बसला. आणखी एक युनिट त्यांनी सुरु केलं. जवळपास २० जण येथे काम करत होते. हे सगळं सुरु होतंच मात्र सोबत त्यांनी सामाजिक भान देखील जपलेलं होतं. मापश्यातील लोकांचे छोटे मोठे प्रश्न ते मांडत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तर त्यांचा लहानपणापासूनच संबंध होता.

अशातच रामजन्मभूमीचे आंदोलन सुरु झाले व पर्रिकर या आंदोलनातून भारतीय जनतापार्टीकडे व एकूणच  राजकारणाकडे ओढले गेले.

पोर्तुगीजांचा छाप असलेल्या गोव्यात रामजन्मभूमीचे आंदोलन  रुजवण्यात मनोहर पर्रीकर यांचा मोठा वाटा राहिला. अयोध्येमध्ये कारसेवकांवर झालेल्या पोलिसांच्या हल्ल्यात पर्रिकर देखील जखमी झाले. पण तिथून ते गोव्यात परतले एक लोकप्रिय नेता बनूनच.

भाजपचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते प्रमोद महाजन यांनी ओळखल की या तरुणांना प्रोत्साहन दिल तर गोव्यात राजकीय चमत्कार घडू शकतो. रामजन्मभूमीच्या आंदोलनात काम जीव तोडून करणाऱ्या, गोव्याच्या कानाकोपऱ्यात भाजपला पोहचवणाऱ्या मनोहर पर्रीकर यांच्यातील क्षमतेचा प्रत्यय आला होता. महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी गोव्यात सरकार भाजपचे स्थापन करण्यासाठी सर्वपरीचे प्रयत्न सुरु केले.

मनोहर पर्रीकर यांना पाठींबा दिला व पक्षातर्फे लागेल ती सगळी मदत पुरवली गेली.

याचाच परिणाम गोव्यात येत्या दहा वर्षात भाजपच सरकार आलं व मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री बनले.

मात्र मुख्यमंत्री झाल्यावरही पर्रिकरांचा उदरनिर्वाह आपल्या व्यवसायावरच सुरु होता. राजकीय घडामोडीमध्ये त्यांच काही काळ कारखान्याकडे दुर्लक्ष झालं होतं. मात्र पुढे त्यांची मुले या व्यवसायात आली व त्यांनी कंपनीचा विस्तार घडवून आणला. तरी देखील पर्रिकरांचे बारीक लक्ष कारखान्याच्या कामकाजाकडे असायचेच.

पत्रकार नितीन भालेराव यांनी एबीपी माझावर सांगितलेला किस्सा.

ते त्याकाळात गोव्यामध्ये  हे एकदा कुठल्या तरी चर्चेच्या विषयावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची बाईट घेण्यासाठी सरकारी निवासस्थानावर गेले होते. मुख्यमंत्र्यांना कुठेतरी बाहेर जाण्याची गडबड होती. भालेराव यांनी फक्त दीड मिनिटाच्या बाईटची विनंती केली. नाही होय म्हणता म्हणता पर्रीकर तयार झाले. ठरल्याप्रमाणे थोडक्यात बाईट दिली.

निघता निघता सहज बातमी मिळेल म्हणून भालेराव यांनी त्यांना कुठे एवढ्या गडबडीने निघालात असा प्रश्न विचारला. यावर पर्रिकर म्हणाले,

” अरे नितीन, माझा स्वतःचा व्यवसायपण आहे. त्यासाठी मी बँकेत कर्जासाठी अर्ज केलाय आणि त्या बँकेच्या मॅनेजरने मला मुलाखतीसाठी मला बोलावलंय. तिथे वेळेत पोहोचायचे आहे.”

एखादा मुख्यमंत्री आपल्या व्यवसायासाठी कर्जाचा अर्ज करतो आणि त्यासाठी बँक मॅनेजरशी मुलाखतीसाठी वेळेत जाण्याची धडपड करतो. हे त्या पत्रकाराला देखील धक्कादायक होतं.

पर्रिकरांचा साधेपणा हा फक्त दिखाऊ नव्हता तर तो त्यांच्या जगण्याचा भाग होता. म्हणूनच  आजूबाजूला राजकीय धुळवड सुरु असूनही कधी भ्रष्टाचाराचे शिंतोडे त्यांच्या चारित्र्यावर उडले नाहीत. हेच कारण आहे की त्यांच्या मृत्यूला दोन वर्षे उलटूनही गोवन जनतेमधील त्यांची लोकप्रियता देखील कमी झालेली नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.