तीन हुकुमी एक्के हातात असून देखील हा बादशाह इंडस्ट्रीपासून दूर आहे.

हिंदी सिनेमा हा साधारण प्रत्येक दशकात बदलत आलाय. प्रत्येक दशकाच्या सिनेमात, ज्या त्या वेळेच्या राजकीय आणि सामाजिक परिणामांची, तसेच बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाची छाप पडलेली दिसते. ६०, ७०, ८०,९० या प्रत्येक दशकाची स्वतःची एक शैली होती आणि त्या फिल्म्स आजही त्या विशिष्ट काळासाठी पाहिल्या जातात. परंतु, २००० सालानंतर चित्रपटात संहितेच्या, तंत्रज्ञानाच्या आणि वेगळ्या विषयाच्या बाबतीत अमूलाग्र बदल झाले. विशेषतः बऱ्याच तरुण दिग्दर्शकांनी ठरलेले पायंडे मोडून एक नवा सिनेमा द्यायचा प्रयत्न केला, आणि त्यात ते सफलही होत आले आहेत.

अशाच दिग्दर्शकांचा गोष्ट सांगण्याचा प्रयत्न बोलभिडूवर घेण्याचा हा प्रयत्न आहे.

सुरुवात करूया, ‘शिमित अमीन’पासून.

लहानपणापासून चित्रपट पाहत आलेला तिशीतला एक तरुण कसलीही इच्छा नसताना चित्रपटसृष्टीत येतो, पहिल्या तीन बॉलवर तीन षटकार मारतो आणि पुढे गायब होतो. अशी अनेक उदाहरणे ऐकलेली आहेत, मग यात एवढे विशेष असे काय आहे? बॉलिवूडने अनेक वन फिल्म वंडर्स पाहिले आहेत, मग ते नायक असोत, नायिका असोत की दिग्दर्शक. पण त्यानंतर केवळ तेच टिकू शकले, ज्या लोकांमध्ये खरोखर काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती.

तोही त्यातलाच एक असावा, हे खुद्द त्याची फिल्मोग्राफी सांगते. ‘अब तक छप्पन’, ‘चक दे इंडिया’ आणि ‘रॉकेट सिंग, सेल्समन ऑफ द ईयर’ हे ते तीन षटकार आणि ते घडवणाऱ्या अवलीयाचं नाव, ‘शिमित अमीन’.

चित्रपटांच्या प्रेमापायी हॉलिवूडमध्ये लॉस एंजेलीसमध्ये तो स्क्रिप्ट, कॅमेरा असिस्टंट, एडिटिंगची आवड जोपासत होता. एकदा अचानक एका कॉमन फ्रेंडच्या रिक्वेस्टमुळे त्याला राम गोपाल वर्माच्या भूत या चित्रपटाचे एडिटिंग करण्यासाठी मुंबईला बोलावण्यात आले. भूतच्या आधीपासून रामूने शूल, प्यार तुने क्या किया आणि रोड मध्ये स्वतः बॅकफूटवर जात नव्या दिग्दर्शकांना संधी दिल्या होत्या. भूत नंतर आणि रामूची फॅक्टरी ही संस्था येण्याआधी, सहारा / के सरा सरा प्रोडक्शन्स आणि रामू यांनी पुन्हा एकदा नवीन दिग्दर्शकांना संधी दिली, ज्यात मुख्यत्वे श्रीराम राघवन (एक हसीना थी), प्रवाल रमन (डरना मना हैं), सौरभ नारंग (वास्तुशास्त्र) हे दिग्दर्शक होते. त्यात अजून एक नाव ऍड झालं ते म्हणजे शिमित अमीन, आणि चित्रपट होता ‘अब तक छप्पन’.

अब तक छप्पनचा किडा सर्वात आधी शिमितच्या डोक्यात वळवळत होता.

भूतच्या एडिटिंगच्या वेळेस ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’चा विषय शिमितने रामूला बोलून दाखवला. विषय आवडीचा असल्याने अर्थातच त्याला तो आवडला आणि अब तक छप्पन नावाचा अजगर पडद्यावर साकारला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. हा अजगर हळूहळू आपल्याला आजही गिळतोय. जोवर, हा चित्रपट रिपीट रनला पाहत जाणार तोपर्यंत तो गिळत राहणार आणि या इंटेन्स स्लो पॉईझनची नशा हवीहवीशी वाटणारी आहे. स्टोरी, परफॉर्मन्स, संवाद, दिग्दर्शन या सर्वच पातळीवर हा चित्रपट एक कल्ट आहे. नाना पाटेकरच्या अनेक बेस्ट परफॉर्मन्सेसमध्ये याचे स्थान खुप वरचे राहील.

आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावल्याने शिमित अमीन हे नाव प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या परिचयाचं झालं.

चक दे इंडिया प्रत्यक्षात उतरण्याची आणि शिमितला, हॉकी किंवा इतर कोणत्याही खेळात रस नसूनही, तो चित्रपट त्याच्याच पदरात पडण्याची कहाणीही रोमांचक आहे. लेखक जयदीप साहनी ‘बंटी और बबली’ च्या तयारीत असताना, एका वर्तमानपत्राच्या छोट्याश्या बातमीने त्याचे लक्ष वेधले आणि ही कल्पना त्याने आदित्य चोप्राला ऐकवली. आदित्यला अर्थातच ती आवडली आणि त्याने शिमितला बोलावून घेतले. हॉकी, जो खेळ शिमितला आवडत नाही, ज्याबद्दल त्याला आकस नाही, अशा विषयावरची फिल्म करण्यात त्याला रस नव्हता, पण तो जयदीपला भेटायला गेला.

जयदीपला पूर्ण विषयाचा आवाका लक्षात आल्याने, त्याने सर्व कॅरॅक्टर्स त्यांच्या बॅकस्टोरीजसहित शिमितला ऐकवले आणि फायनली शिमित चक दे साठी तयार झाला. मेन लिड शाहरुख असल्याने अर्धी लढाई त्यांनी तिथेच जिंकली होती. चित्रपट आला आणि तुफान चालला. नॅशनलिझम आणि इमोशनच्या जोरावर चित्रपटाने त्या वर्षीचे महत्वाचे अवॉर्डस तर पटकावलेच पण कमर्शियल आणि क्रिटिकल अक्लेम मिळवत एक उत्कृष्ट चित्रपट म्हणून तो अजूनही लोकप्रिय आहे.

अब तक छप्पन आणि चक दे इंडिया या दोन्ही परस्पर वेगळ्या प्रयोगानंतर शिमितने पुन्हा एकदा वेगळी वाट निवडली. रणबीरसारख्या ग्लॅमरस अभिनेत्याला त्याच्या नेहमीपेक्षा वेगळ्या, सरदार हरप्रीत सिंग बेदीच्या भूमिकेत कास्ट करून. ३८% मार्क मिळवणारा तरीही आत्मविश्वासाने जॉब्जच्या मार्केटमध्ये बिनधास्त उतरणारा हरप्रीत, हळूहळू आपल्या स्किल्सच्या जोरावर ते मार्केट काबीज करतो हा चित्रपटाचा विषय. रॉकेट सिंग वेगळा होता, अनयुजूवल होता. टिपिकल हिरोचे सर्व टाईपकास्टेड ठोकताळे मोडणारा होता, शिवाय मिडलक्लासची मूल्ये जपणारा प्रामाणिक प्रयत्न होता.

दुर्दैवाने तो पडदयावर चालला नाही. पण हळूहळू त्याचा एक कल्ट फॉलोविंग तयार झाला आणि काही वर्षांनी तो परत परत पाहिला गेला. कालांतराने तोही शिमितच्या करकीर्दीतला एक सर्वोत्तम सिनेमा म्हणून गणला जाऊ लागला.

साधू आगाशे, कबीर खान आणि हरप्रीत सिंग बेदी ही पात्रे लेखकाने जितक्या कंविक्शनने लिहिली गेली तितक्याच कंविक्शनने शिमितने ती आपल्यासमोर उभी केली, जी आजही तितकीच जिवंत आहेत. फक्त ही तीनच नाही तर अब तक छप्पनमधील नवीन कमिशनर, अंडरवर्ल्ड डॉन, चक दे मधील संपूर्ण हॉकी टीम, रॉकेट सिंग मधील ऑफिस स्टाफ, शिवाय बेरकी आणि प्रॅक्टिकल बॉस पुरी, असे प्रत्येक पात्र हे वेल डिफाईंड आणि लक्षात राहणारं होतं.

रॉकेट सिंग नंतर मात्र शिमित अमीन हे नाव पडद्यावर कधी दिसले नाही. रॉकेटसिंगच्या (पडद्यावरील) अपयशाने तो नाराज झाला, पण याचा अर्थ हा नव्हे की त्याने चित्रपटातून संन्यास घेतला आहे. रॉकेट सिंग नंतर अनेक विषय त्याच्याकडे चालून आले, काही त्याने निवडले, त्यात तो अजूनही प्रयत्न करतोय, पण जोपर्यंत सर्वतोपरी एखादा विषय किंवा फिल्म कन्फर्म होत नाही, तोवर त्यावर बोलत नाहीये, इतकंच.

एका मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत तो एक वूमन सेन्ट्रीक फिल्म प्रोड्युस करत होता. आपले ऍडवर्टायझिंगचे काम सांभाळत शिमितने त्या प्रोजेक्टला आपली दोन वर्षे दिली, पण त्यानंतर त्या स्टुडिओचा हेड बदलल्यामुळे त्यांनी माघार घेतली. दिड वर्षांपूर्वी यशराज सोबत एक फिल्म करत असल्याचे त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकले होते, अजून पर्यंत तरी तशी काही बातमी नाहीये. तो आणि शाहरुख पुन्हा काम करत असल्याचाही बातम्या वाचनात आल्या. पण त्याचीही अजून कुठेच ऑफिशियल अनाऊन्समेंट नाही. 

अखेरीस, खंत इतक्याच गोष्टीची आहे की, अब तक छप्पन, चक दे इंडिया आणि रॉकेट सिंग हे तीन हुकुमी एक्के हातात असून देखील शिमित अमीन नावाचा बादशाह इंडस्ट्रीपासून दूर आहे. ही मधल्या काळातली कसर तो लवकरात लवकर एखादया दमदार चित्रपटासह भरून काढेल अशी आशा करूयात आणि शिमितसाठी ‘आमेन’ म्हणूयात.

– राज जाधव

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.