‘निर्जरा’ सिंगल स्क्रिन थिएटरची शेवटची हिरोईन होती.
भूमिका चावला आठवतेय…?
आता तुम्ही म्हणाल की ना ती श्रीदेवीसारखी भारी डान्सर, ना माधुरीसारखी मोठी स्टार. ना ऐश्वर्यासारखं दैवी सौंदर्याची देण, ना काजोलसारखी जबरदस्त अभिनयक्षमता. मग तिच्या वाढदिवशी ‘बोल भिडू’न तिच्यावर अख्खा लेख लिहावा असं काय आहे तिच्यात..?
अहो कारण नाही का म्हणता?
पंधरा वर्षांपूर्वी तिचा ‘तेरे नाम’ नव्हता का आला..? बघता-बघता १५ वर्षे लोटली.
१५ ऑगस्ट २००३ रोजी ‘तेरे नाम’ रिलीज झाला होता. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रिलीज झालेल्या या चित्रपटाचा देशभक्तीशी दूरदूरपर्यंत कसलाही संबंध नव्हता.
‘ब्युटी’ आणि ‘बिस्ट’ या सुप्रसिद्ध संकल्पनेवर आधारित ‘सेतू’ या साऊथच्या मुव्हीचा ‘तेरे नाम’ रिमेक होता. सलमानने साकारलेल्या ‘राधे’ नावाचा कॉलेजमधला टपोरी आणि भूमिकाची साधी सरळ ‘निर्जरा’ यांची ही प्रेमकथा.
भूमिका चावला फक्त एवढाच रोल साकारण्यासाठी जन्माला आली होती की काय, अशी शंका यावी इतकी ती ‘निर्जरा’ म्हणून शोभली होती. आधी हा रोल आमिषा पटेल करणार होती म्हणे. पण नशिबाने हा रोल भूमिकाकडे आला आणि तिने पण त्याच सोनं केलं. तिला स्वतःला पण हा पिक्चर एवढा हिट होईल असं वाटलं नसेल.
सलमानचं तिच्यासाठी वेडं होणं आणि तिची त्याच्यासाठी होणारी घालमेल या दोहोंची केमेस्ट्री पडद्यावर चांगलीच जुळून आली. साथीला होतं हिमेश रेशमियाच आर्त म्हणावं असं संगीत. “क्यू किसिको” असो की “तुमसे मिलना बाते करणा”असो सगळी गाणी तुफान हिट झाली. हिमेश रेशमिया नावाच्या ताऱ्याचा याच चित्रपटातून चित्रपटसृष्टीत उदय झाला होता. अर्थात त्याचं चकाकण अल्पकाळ ठरलं हा भाग वेगळा.
नव्याने आलेल्या मोबाईल फोनमध्ये या पिक्चरची गाणी रिंगटोन म्हणून वाजत होती. पिक्चर पाहून बाहेर येणारा प्रत्येक जण डोळ्याला रुमाल लावूनच बाहेर येत होता. जणू काय हा आमच्या पिढीचा ‘रोमिओ ज्युलियट’च होता. खरं सांगायचं झालं तर हा पिक्चर काही ग्रेट वैगेरे नव्हता. होता तो साधा नॉर्मल मसाला मुव्हीच, पण खूप दिवसांनी ग्रामीण आणि निमशहरी भागातल्या मुलांच्या भावनेला वाट करून देणारा हा पिक्चर सुपरडुपर हिट ठरला.
‘तेरे नाम’ पूर्णपणे सलमानचा सिनेमा होता. एका पाठोपाठ एक सलग फ्लॉप, काळवीट हत्या प्रकरण, ‘हिट अँड रन’ केस अशा अनेक गोष्टींमुळे त्याची इमेज पूर्ण ढासळली होती. त्याच्या विचित्र वागण्यामागे ऐश्वर्याशी झालेल्या ब्रेकअपचं कारण देण्यात येत होतं. विवेक ओबेरॉय सोबतच भांडण, शाहरुख-ऐश्वर्याच्या ‘देवदास’च्या सेटवर खऱ्या देवदास सारखं दारू पिऊन जाणं अशा कित्येक गोष्टी सलमान कामाच्या बाबतीत सिरीयस नसल्यावरच शिक्कामोर्तब करत होत्या.
फिल्म इंडस्ट्रीतला ‘बॅड बॉय’ म्हणून सलमान ओळखला जाऊ लागला होता. पण एक गोष्ट मात्र तेव्हाही कुणाला नाकारता येत नव्हती की पिक्चर जरी पडत होते, तरी त्याचा फॅन बेस मात्र अजिबातच कमी झाला नव्हता. अभिजनांनी कितीही नाके मुरडली असली तरी हा पिक्चर सुपरहिट झाला.
‘तेरे नाम’ पिक्चरच्या स्टोरीला लोकांनी सलमानच्या रिअल लाईफ स्टोरीशी रिलेट केलं. ऐश्वर्याशी झालेल्या ब्रेकअपमागे तीच कशी दोषी आहे वगैरे चर्चा कॉलेजच्या कट्टयावर झडू लागल्या. वैयक्तिक जीवनात तो कसा “बाहर से सखत मगर अंदरसे बडे दिलवाला है” अशी इमेज बनली. त्याच्या सगळ्या चूका पदरात घेतल्या गेल्या.
इंडस्ट्रीचा ‘बॅड बॉय’ एका झटक्यात फॅन्सचा लाडका ‘भाई’ झाला. युपी बिहारच्या कानाकोपऱ्यापासून मुंबईच्या रस्त्यापर्यंत केसांचा मधला भांग पाडलेले ‘तेरे नाम’ स्टाईलचे ‘राधे’ सर्वत्र दिसायला लागले. ते आपल्याला भाव न देणाऱ्या पोरींना पडद्यावरच्या ‘निर्जरा’मध्ये शोधत होते.
पिक्चरला तुफान व्यावसायिक यश देखील मिळालं. सलमानपासून हिमेशपर्यंत सगळ्यांना फायदा झाला पण मग हिरोईन असणाऱ्या भूमिका चावलाचं काय झालं? म्हणावं तर भूमिकाला पिक्चरचा फायदा झाला, म्हणावं तर तिला पिक्चरचा तोटा झाला. ‘तेरे नाम’ने तिला तिचा एकमेव सुपरहिट पिक्चर दिला. मात्र या यशानंतर तिला लोकांनी टाईपकास्ट केलं. ‘गांधी माय फादर’ सारखा चित्रपट पण तिच्या करियरला सावरू नाही शकला. साऊथमध्ये तिला काही हिट मिळाले पण हिंदीत ती स्पर्धेतून बाहेर फेकली गेली.
या वयात नायिकांचं ‘हिरोईन’ म्हणून फिल्मी करियर संपलेलं असतं. हिरो-हिरोईनच्या आई किंवा बहिणीचे रोल यायला लागलेले असतात. भूमिकासुद्धा महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकमध्ये त्याच्या बहिणीच्या रोलमध्ये दिसली होती. मात्र तिची आयुष्यभराची ओळख ‘तेरे नाम’ची निर्जरा म्हणूनच राहील.
आजही ‘तेरे नाम’चं टायटल सॉंग कुठे वाजलं तर कित्येकांच्या काळजात बारीकशी कळ उठते. उदित नारायणचा आवाज आणि भूमिकाचा निरागस चेहरा जुन्या आठवणी जाग्या करत राहतो.
हे ही वाचा.
- बिच्छु, बादल आणि जीवन मामा..
- तब्बू आज ४७ वर्षांची झालीये, अन ह्या वयात सुद्धा तिचं लग्न न करता राहणं मला चोरटं सुख देतं.
- आमीरसारखां दिसत नाही म्हणून शाहरूखला नकार देणारी जुही.