सई ताम्हणकरने साऊथ इंडस्ट्रीत देखील स्वत:ची ओळख निर्माण केलीय..

सई ताम्हणकर म्हणजे मराठीतली एक बोल्ड आणि तडफदार अभिनेत्री. तिच्या स्वभावातला तडफदारपणा हा तिच्या कामात सुद्धा कायम उतरतो. तिची कुठलीही भूमिका पाहताना त्या भूमिकेत एक प्रकारचा आत्मविश्वास असतो जो लोकांना भावणारा असतो.

हीच बोल्ड, ब्यूटीफूल आणि बिनधास्त सई आपल्याला सोनी मराठीवरच्या ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर विचारलेल्या प्रश्नांची बिनधास्तपणे उत्तरं देताना दिसणार आहे.

सईला आपण मराठी चित्रपटांमध्ये पाहिलंय, गेल्या वर्षी तिने बॉलीवुडमध्ये सुद्धा आपला डंका वाजवला, ‘मीमी’ या चित्रपटातून एका वेगळ्या धाटणीची भूमिका साकारत ती प्रेक्षकांच्या समोर आली.

या चित्रपटासाठी तिला ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’ या कॅटेगरीत IIFA अवॉर्ड सुद्धा मिळालं.

पण तुम्हाला कदाचित तिच्या साऊथ इंडस्ट्रीतल्या कारकीर्दीविषयी माहीत नसेल. सईने फक्त मराठी आणि हिंदीत नाही तर साऊथमध्ये सुद्धा आपली छाप पाडली आहे. आज आपण तिच्या साऊथ इंडस्ट्रीतल्या कामाविषयी बोलूया. 

सई ताम्हणकर मुळची सांगलीची. तिचं अख्खं बालपण सुद्धा सांगलीतच गेलं. सई शाळेत असताना कबड्डी खेळायची. अशी तशी नाय, तर ती डायरेक्ट स्टेट लेव्हलची कबड्डी प्लेयर होती. शिवाय कराटे चॅम्पियनही होती. सईचे वडील नेव्हीमध्ये होते.

तिच्या घरचं एकंदरीत वातावरण तसं मोकळं होतं, त्यामुळे सिनेमा क्षेत्रात काम करण्याच्या किंवा अॅक्टिंग करण्याच्या तिच्या निर्णयाला कधी कोणी आवर्जून विरोध असा केला नाही. तिला तिच्या घरच्यांनी नेहमी हवं ते करू दिलं आणि तिने अॅक्टिंग हेच क्षेत्र निवडत सांगलीहून मुंबईत येण्याचा निर्णय घेतला.

मुंबईत येऊन तिने हळू हळू मराठी इंडस्ट्रीत आपला जम बसवायला सुरवात केली. २००८ साली आलेला सनई चौघडे, २००९ साली आलेला हाय काय नाय काय, २०१० साली आलेला लालबाग परळ, २०११ साली आलेला झकास, २०१२ साली आलेला नो एंट्री, २०१३ चा दुनियादारी, २०१४ चा प्यार वाली लव्ह स्टोरी, २०१५ चा हंटर, २०१६ चा जाऊद्या ना बाळासाहेब तर २०२० साली आलेला धुरळा अशा सगळ्या मराठी पिक्चर्समध्ये सईने धुरळा उडवला.

शिवाय हिंदीत, गजनी, लव्ह सोनिया, मीमी, हंटर, वेक अप इंडिया या चित्रपटांमध्ये सुद्धा सईने काम केलं आहे.

या यादीवरून आपल्याला लक्षात येतं की सई ताम्हणकरने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत.

तिच्या गाजलेल्या सिनेमांच्या यादीत अजून दोन महत्वाचे सिनेमे अॅड होतात ते म्हणजे २०१७ साली आलेला सोलो हा सिनेमा आणि २०२१ साली आलेली ‘नवरस’ फिल्म.

आता मराठी नट नटयांना साधं मराठी बोलायचं असलं तरी बरेचदा बोलता येत नाय तिथे आपली सई मल्याळम आणि तामीळ भाषांचे सिनेमे करून येते, साऊथ इंडस्ट्री गाजवून येते ही अभिमानचीच गोष्ट म्हणावी लागेल. 

सई तिच्या एका मुलाखतीत म्हणते,  की तिला तीचं काम प्रिय आहे. त्यामुळे काम करत असताना समोर येणाऱ्या चॅलेंजेसना ती हसत हसत सामोरी जाते. त्यात एक वेगळं थ्रिल असतं जे कुठलंही काम साकारत असताना तिला अनुभवता येतं, असं ती म्हणते.

मराठी भाषा सोडून इतर भाषांमध्ये काम करण्यासाठी नवीन भाषा शिकून, ती परटिक्युलर भाषा बोलणाऱ्यांचा टोन, त्यांची भाषा शैली, उच्चार, हावभाव या सगळ्या गोष्टी आत्मसात करून सई तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय देत असते. 

२०१७ साली आलेल्या सोलो या चित्रपटात सई ताम्हणकरने सतीची भूमिका साकारली होती. बेजॉय नांबीयार यांनी तमिळ आणि मल्याळम अशा दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा बनवला जो नंतर अथडे या नावाने तेलुगू भाषेत डब केला गेला आणि तत्व या नावाने हिंदी भाषेत डब केला गेला.

या पिक्चरमध्ये महत्वाची भूमिका केलीये दुलकर सलमान याने, आणि या सिनेमाची स्टोरी चार भागात विभागली गेली आहे. 

वर्ल्ड ऑफ शेखर, वर्ल्ड ऑफ शिवा, वर्ल्ड ऑफ त्रिलोक आणि वर्ल्ड ऑफ रुद्र असे हे चार भाग आहेत त्यातल्या वर्ल्ड ऑफ शिव या भागात सई ताम्हणकरने सतीची भूमिका साकारली आहे. 

सईचं दुसरं दाक्षिणात्य काम म्हणजे तिची नेटफ्लिक्सवर आलेली ‘नवरसा’ ही फिल्म. मागच्याच वर्षी ६ ऑगस्टला ही सिरिज नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली होती. नऊ भागांची ही फिल्म नऊ रसांवर आधारित आहे.

या फिल्ममध्ये सईने विजय सेथूपतींसोबत काम केलंय ज्यांची ती खूप आधीपासून मोठी फॅन होती. त्यामुळे या फिल्ममध्ये काम करणं तिच्यासाठी खूप महत्वाचं ठरणार होतं असं ती म्हणते. 

शिवाय आणखीन एका मुलाखतीत सई असंही म्हणते की, “तमिळ भाषा ही माझी मातृभाषा नव्हती, माझ्या ओळखीची भाषा नव्हती त्यामुळे आपल्याला माहीत नसलेल्या इतर कुठल्या भाषेत काम करायचं म्हणजे ते चॅलेंजिंगच काम असतं पण माझं काम मला प्रिय असल्यामुळे मी हे आवाहन पेलू शकले आणि निभावू शकले.

शिवाय, विजय सेथूपती आणि या फिल्मचे दिग्दर्शक बेजॉय नांबीयार यांचीसुद्धा मला तमिळ बोलण्यात खूप मदत झाली, त्यांचं मार्गदर्शन मिळालं म्हणूनही मी हे अवघड काम सहज करू शकले” 

थोडक्यात म्हणजे, सईचा आत्मविश्वास, तिची जिद्द यामुळे ती फक्त मराठीतच नाही तर बॉलीवुड आणि साऊथ इंडस्ट्री सुद्धा गाजवते आहे, आणि आता सोनी मराठीच्या कोण होणार करोडपतीच्या मंचावर येऊन ती काय कल्ला करते हे आपल्याला सहा ऑगस्टलाच पाहायला मिळेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.