अफूची शेती केल्याने जेलवारी फिक्स आहे, तरी ती का आणि कशी केली जाते?

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या अटकेच्या बातम्या कानी पडतायेत. यावरून तुम्हाला वाटेल, आता कोणतं आंदोलन सुरु झालं ज्याने शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात अली आहे? असं वाटणं साहजिक आहे कारण सध्या राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या छोट्या छोट्या हक्कासाठी देखील आंदोलन केल्याशिवाय आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये.

पण या अटकेच्या बातम्या बेकायदेशीर कामं केल्याप्रकरणी समोर येतायेत. कोणती? तर अफूची शेती करणं. महाराष्ट्रात अफूची शेती बेकायदेशीर आहे. अशात जास्त पैसे मिळवण्याच्या नादात शेतकरी अफू पिकवण्याची रिस्क घेताय. भुईमूग आणि लसणाच्या शेती पिकांत आंतरपीक म्हणून अफूची झाडं लावली जातायेत. त्यात पकडले गेले की चांगलाच भुर्दंड मग बसतो.

मात्र अफू पिकवणं सम्पूर्ण भारतात बेकायदेशीर नाहीये. औषध उद्योगासाठी अफूची कायदेशीर लागवड भारताच्या निवडक भागांत केली जाते. शिवाय या उद्देशासाठी अफूची लागवड करणारा भारत जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने वैद्यकीय वापरासाठी अफूची कायदेशीर लागवड करण्यास परवानगी दिलेल्या १२ देशांपैकी भारत एक आहे. तर जगातील जवळपास ८५ टक्के अफूचं उत्पादन अफगाणिस्तानमध्ये होतं.

भारतात अफूची कायदेशीर लागवड प्रामुख्याने मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात केली जाते. म्हणजे पीक म्हणून खसखस पेरता येते. त्यासाठी आधी नोंद करावी लागते आणि आलेलं सर्व उत्पादन शासन खरेदी करतं.

अफू हे ६० ते १२० सेंमी. उंचीचं झुडूप आहे. त्याची लागवड हिवाळ्यात केली जाते. साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान हे पीक पेरलं जातं. मुख्य पिकांसोबत आंतरपीक म्हणून खसखस घेतली जाते. त्यासाठी सगळ्यात आधी शेत जमीन लागवडीस योग्य करावी लागते. ३-४ वेळा चांगली नांगरणी करून त्यात भरपूर शेणखत मिसळलं जातं. कारण जमिनीत पुरेसं पोषण असणं आवश्यक असतं नाहीतर अफू लागवडीसाठी मिळालेल लायसन्स रद्द होऊ शकतं. 

पुढे जाण्याआधी महत्त्वाचा मुद्दा असा की, अफूच्या लागवडीचं लायसन्स देतं कोण?

अफू लागवडीचा परवाना अर्थ मंत्रालय जारी करतं. ठराविक ठिकाणीच लागवडीसाठी परवाना दिला जातो. त्याचबरोबर तुम्ही किती क्षेत्रावर शेती करू शकता, हेही आधीच ठरवलं जातं. अंमली पदार्थ विभागाच्या अनेक संस्था अफूवर संशोधन करतात, तिथून अफू लागवडीसाठी बियाणे मिळतात. भारतात जवाहर अफू-१६, जवाहर अफू-५३९ आणि जवाहर अफू-५४० या जाती खूप लोकप्रिय आहेत. तर प्रति हेक्टर ७ ते ८ किलो बियाणे या लागवडीसाठी ​​लागतात.

पण एक गोष्ट परत लक्षात असू देणं गरजेचं ती म्हणजे, तुम्हाला कुठूनही अफूच्या बिया ​​मिळाल्या तरी तुम्ही त्या शेतात लावू शकत नाही. कारण परवान्याशिवाय अफूचं एकही रोप उगवल्यास, कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.

परत आपल्या मूळ मुद्याकडे येऊया…

तर… जवळपास दीड महिन्यांच्या अंतराने झाडाला फुलं येतात. त्यानंतर हळूहळू ही फुलं गळून पडतात आणि १५ ते २० दिवसांत या झाडाला बोंड येतात. या झुडूपाच्या बोंडात ज्या बिया असतात त्यांनाच खसखस म्हणतात. आता असते काढणीची वेळ. अफूची काढणी एका दिवसात होत नाही तर अनेक वेळा केली जाते. 

बोंड कच्चे असताना त्याला चिरा पाडल्या जातात. दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान हे काम केलं जातं. या चिरा पाडल्यानंतर त्यातून एक विशिष्ट प्रकारचा रस पाझरतो. या रसापासूनच अफू तयार केली जाते. या रसाला रात्रभर पाझरण्यासाठी सोडून दिलं जातं. दुसऱ्या दिवसापर्यंत हा रस बोंडांवर घट्ट होतो. त्याला नंतर एकत्र केल्या जातं. रस बाहेर येण्याचं थांबेपर्यंत ही प्रक्रिया अनेक वेळा केली जाते.

जेव्हा रस बाहेर येणं थांबतं, तेव्हा पीक कोरडं होऊ दिलं जातं आणि नंतर बों तोडून बिया काढून टाकल्या जातात. आता ही प्रक्रिया काही शेतकऱ्यांच्या शेतात किंवा घरी होत नाही. तर एकदा पीक निघाल्यावर शेतकऱ्यांकडून ही अफूची बोंडं विकत घेतली जातात. शासन ही संपूर्ण खरेदी करतं. 

दरवर्षी एप्रिल महिन्यात अंमली पदार्थ विभाग म्हणजेच नार्कोटिक्स विभाग शेतकऱ्यांकडून अफू खरेदी करतो.

खरेदीच्यावेळी शासनाकडून खूप दक्षता पाळली जाते. अफूच्या परवाना धोरणानुसार, उत्पादनाचं निव्वळ वजन हे अफूचा परवाना देताना सरकारने ठरवून दिलेल्या प्रति हेक्टरी प्रमाणापेक्षा कमी असेल, तर शेतकरी आपला अफू लागवडीचा परवाना गमावू शकतात. 

यात असा प्रश्न उपस्थित राहतो की, असं या पिकात काय आहे की, लायसन्स मिळालं नाही तर शेतकरी लपून याची शेती करतात?

तर अशा या अफूच्या शेतीमध्ये कमी लागवड खर्चात भरपूर नफा मिळतो. अफूची बियाणे १५० ते २०० रुपये प्रतिकिलो दराने मिळतात. तर एक हेक्टरमधून सुमारे ५० ते ६० किलो अफूचे लॅटेक्स गोळा केले जाते. हे लॅटेक्स बोंडामधून निघणाऱ्या रसाच्या घट्ट होण्याने तयार होते. यासाठी शासनाकडून सुमारे १८०० रुपये प्रतिकिलो भाव दिला जातो, तर काळ्या बाजारात याला ६० हजार ते १.२ लाख रुपये असा भाव मिळतो. 

लॅटेक्स व्यतिरिक्त, शेतकरी बोंडातील बियाणे म्हणजेच खसखस बाजारात विकून देखील पैसे कमावू शकतात. 

अफूच्या कायदेशीर शेतीतून शेतकऱ्याला जास्त नफा मिळत नाही. मात्र त्याचवेळी जर काळ्या बाजारात माल विकला तर त्याला भरमसाठ पैसा मिळतो. म्हणून शेतकरी जास्त पैशांच्या हव्यासापोटी अफूची शेती करताना आढळत आहेत. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.