या महान भारतीय पक्षी तज्ञापासून प्रेरित आहे २.० मधील अक्षय कुमारची भूमिका !  

दिग्दर्शक शंकर यांचा रजनीकांत आणि अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला २.० नावाचा पिक्चर सध्या थेटरात येऊन धडकलाय. रजनीकांत आणि अक्षय हे दोघेही सुपरस्टार, दोघांचाही डेडीकेटेड असा फॅन फॉलोअर्सचा वर्ग. त्यामुळे पिक्चर सुपरडुपर हिट होणार हे सांगायला कुणाही सिनेतज्ञाची गरजच नाही.

सुरुवातीच्या २ दिवसात पिक्चरला मिळालेला प्रतिसाद देखील तसंच काहीसं सूचित करणारा आहे. प्रेक्षकांकडून पिक्चरमधील अक्षय कुमारच्या भूमिकेचं विशेष कौतुक करण्यात येतंय. पण तुम्हाला माहितेय का की या साय-फाय पिक्चरमध्ये अक्षय कुमारने साकारलेली भूमिका ही देशातल्या एका अतिशय प्रतिष्ठीत अशा पक्षी तज्ञाच्या आयुष्यावरून प्रेरित आहे.

अक्षयने या पिक्चरमध्ये साकारलेली ‘पक्षीराजन’ ही भूमिका भारताचे महान पक्षीतज्ञ आणि ज्यांना आपण ‘बर्डमॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखतो, त्या डॉ. सलीम अली यांच्या आयुष्यावर बेतलेली असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अर्थात पिक्चरचा जॉनर साय-फाय असल्याने निर्मितीच्या दृष्टीने आणि कथानाकाची गरज म्हणून चित्रपटामध्ये अनेक बदल देखील करण्यात आलेले आहेत.

कोण होते डॉ. सलीम अली..?

भारतात आज पक्ष्यांवर म्हणून जे काही संशोधन होतंय, तशा प्रकारच्या संशोधनाची सुरुवात करणारा माणूस म्हणून सलीम अली यांच्याकडे बघितलं जातं. १२ नव्हेंबर १८९६ रोजी मुंबईतील एक सुलेमानी बोहरा मुस्लीम परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला होता. बालपणीच त्यांच्यावरील आई-वडलांचं छत्र हरवलं होतं. त्यामुळे त्यांच्या मामांनीच त्यांना लहानचं मोठं केलं.

लहानपणी एकदा छर्रयाच्या बंदुकीने त्यांनी एक चिमणी टिपली. त्यावेळी तिच्या गळ्यावर एक पिवळा ठिपका होता. सगळ्या चिमण्यांपेक्षा ती वेगळी असल्याने त्यांची या चिमणीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. त्यांनी या चिमणीविषयी आपल्या मामांकडे विचारणा केली. परंतु मामाला देखील त्याविषयी नीटशी माहिती नसल्याने ते सलीम यांना घेऊन ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे सचिव डब्ल्यू.एस.मिलार्ड यांच्याकडे गेले.

मिलार्ड यांनी सलीम अलींच्या शंकेचे समाधान केले आणि त्यांना पक्षांच्या वेगळ्या प्रजातींविषयी माहिती दिली. तेव्हाचपासून सलीम अलींच्या मनात वेगवेगळ्या पक्षांविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आणि पक्षांमधला त्यांचा रस दिवसेंदिवस वाढतच गेला. ‘फॉल ऑफ ए स्पॅरो’ या आपल्या आत्मचरित्रात सलीम अलींनी या प्रसंगाविषयी आणि आपल्या जीवन प्रवासाविषयी लिहिलंय.

आपल्या भावाला व्यवसायात मदत करण्यासाठी म्हणून त्यांना म्यानमारला जावं लागलं आणि त्याचं शिक्षण अर्धवट सुटल ते सुटलच. पण भावाच्या व्यवसायात देखील त्याचं मन लागत  नव्हतं. त्यांचा बहुतांश वेळ हा पक्षाचं निरीक्षण करण्यातच जात असे. त्यामुळे भावाने त्यांना परत मुंबईला पाठवून दिलं आणि सलीम अलींनी ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’मध्ये नोकरी करायला सुरुवात केली.

पक्षांवरील प्रेमापोटी केला सातासमुद्र पार

डॉ. इर्विन स्ट्रेसमॅन हे त्याकाळातलं पक्षांविषयी संशोधन करणारं जगभरातलं प्रख्यात नाव. ते जर्मनीचे. सलीम अलींच्या पक्षांविषयीच्या ओढीने त्यांना डॉ. इर्विन स्ट्रेसमॅन यांच्याकडे आकर्षित केलं नसतं तर नवलच. अलींनी थेट जर्मनी गाठली आणि स्ट्रेसमॅन याचं शिष्यत्व पत्करलं. डॉ. इर्विन यांच्या मार्गदर्शनाखाली अलींनी जवळपास वर्षभर पक्षांच्या विविध प्रजातींचा अभ्यास केला आणि नंतर ते भारतात परतले.

भारतात परतल्यानंतर त्यांची ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’मधली नोकरी तर गेली होती, पण त्यांना ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चा एक प्रकल्प मिळाला. भारतातील स्वदेशी पक्षांचा अभ्यास करून एक अहवाल सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. या प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर देशातले महत्वाचे पक्षी संशोधक म्हणून त्यांच्या नावाचा उदय झाला. देश-विदेशात त्यांच्या कामाची चर्चा व्हायला लागली.

अमेरिकन गुप्तचर संघटना ‘सीआयए’चे एजंट असल्याचा आरोप

१९४१ साली सलीम अली लिखित ‘द बुक ऑफ इंडियन बर्डस’ प्रकाशित झालं. पक्षी संशोधनामधलं हे अशा प्रकारचं पहिलच काम होतं. पक्षी संशोधनामध्ये सलीम अलींनी किती व्यापक प्रमाणावर काम करून ठेवलंय याचा अंदाज आपल्याला यावरून यावा की भारत आणि पाकिस्तानमधील पक्षांविषयीच्या त्यांच्या ‘हँडबुक ऑफ बर्डस ऑफ इंडिया अँड पाकिस्तान’ या पुस्तकाचे १० भाग प्रकाशित आहेत. भारत आणि पाकिस्तानातील कुठलाही पक्षी असो, त्याविषयीची इत्यंभूत माहिती तुम्हाला या पुस्तकात मिळणार म्हणजे मिळणारच.

‘हँडबुक ऑफ बर्डस ऑफ इंडिया अँड पाकिस्तान’ हे १० वर्षे अथकपणे केलेल्या संशोधनाचं अपत्य होतं. हे पुस्तक त्यांनी सिडने डिलन रिप्ले यांच्याबरोबर मिळून लिहिलं होतं. परंतु यांमुळे त्यांच्यावर अमेरिकन गुप्तचर संघटना ‘सीआयए’चे एजंट असल्याचा आरोप देखील झाला होता. कारण रिप्ले यांनी त्यापूर्वी  ‘ऑफिस ऑफ स्ट्रेटेजिक सर्व्हिसेस’साठी हेरगिरी केली होती.

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान-सन्मान

सलीम अली हे पक्षांना बंदिस्त करण्याच्या विरोधात होते. माणूस आणि पक्षी यांच्यातील सहचर्याने मानवाने पक्षाचं संरक्षण केलं पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. भरतपूर पक्षी अभयारण्याच्या निर्मितीमध्ये देखील त्यांची अतिशय महत्वाची भूमिका राहिली होती.

आपल्या भावाला व्यवसायात मदत करायला म्यानमारमध्ये जावं लागल्याने त्याचं शिक्षण मधातच सुटल होतं, तरीसुद्धा पक्षी संशोधनात त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन अलिगढ मुस्लीम विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ आणि आंध्र विद्यापीठाने सलीम अलींना मानद डॉक्टरेटने सन्मानित केलं होतं.

भारत सरकारने देखील ‘पद्मविभूषण’ देऊन त्यांच्या संशोधकीय कार्याचा यथोचित गौरव केला होता. ते असे पहिलेच भारतीय होते, ज्यांना ‘ब्रिटीश ओर्निथोलॉजिस्ट युनिअन’ने सुवर्णपदकाने सन्मानित केलं होतं. १९८७ साली त्याचं कॅन्सरने निधन झालं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.