खतरनाक अमर नाईकला विजय साळसकरांनी वन ऑन वन चकमकीत मारलं होतं

मुंबई. मायानगरी, स्वप्नांचं शहर. मुंबईला इतिहास आहे, अर्थकारणाची चाकं आहेत, राजकारणाचं केंद्रस्थान आहे… तशीच आणखी एक पार्श्वभूमी आहे…ती म्हणजे अंडरवर्ल्डची. मुंबईमधल्या गल्ली-बोळांनी भुरटे चोर असणाऱ्या गुंडांना अंडरवर्ल्डचे बादशहा होताना पाहिलं, याच बादशाहांचा ऱ्हासही पाहिला. याच गल्ली बोळांमध्ये कित्येक डॉनचा अंत प्रतिस्पर्धी टोळ्यांकडून किंवा जिगरबाज पोलिसांकडून होतानाही पाहिलं.

अमर नाईक, हेच एक गल्ली बोळातून पुढं येऊन डॉन झालेलं नाव. 

अमर नाईकला मुंबईचा पाब्लो एस्कोबार आणि रावण अशा टोपणनावांनी ओळखलं जायचं. सामान्य घरातून आलेला अमर गुन्हेगारी विश्वाकडे वळला. हाती आलेली ताकद व सामर्थ्य या गोष्टींनी त्याला स्वस्थ बसू दिलं नाही आणि अमर कुख्यात गँगस्टर बनला.

सुरुवातीला अमरकडे बंदूकही नव्हती, चाकू आणि डेरिंगच्या जीवावर अमर मोठं व्हायला बघत होता. थेट अरुण गवळीच्या विरोधात दुष्मनी पत्करत अमरनं मोठं पाऊल उचललं होतं. १९९४-९६ या काळात तर त्यानं मुंबईवर अधिराज्य गाजवलं होतं.

परदेशातून त्याच्यासाठी बंदुकी येऊ लागल्या, हप्ते वसुली आणि राजकीय वरदहस्त या दोन्ही गोष्टींमध्ये त्यानं गवळी टोळीलाही मागं टाकलं होतं.

गवळी आणि नाईक टोळीतला संघर्ष खटाव मिलचा मालक, सुनीत खटाव याचा नाईक टोळीनं मर्डर केल्यानंतर टिपेला पोहोचला. खटाव कुटुंबीय आणि इतर गॅंगच्या मेम्बर्सनी एकत्र येत, अमर नाईकला मारणाऱ्यास १० कोटींचं बक्षीस ठेवलं होतं. पण तरीही कोणताच शुटर ही रिस्क घ्यायला तयार नव्हता.

अमर फक्त प्रतिस्पर्धी टोळ्यांच्याच नाही, तर पोलिसांच्या रडारवरही होता. उच्चपदस्थांकडून अमरला पकडण्याचे आदेश मिळाले होते. हे आव्हान पेललं एनकाउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांनी.

साळसकर आणि त्यांच्या टीमनं अनेक दिवस प्लॅनिंग करत अमरविरोधात सापळा रचला. मध्यरात्रीनंतर अमर मदनपुरामध्ये येणार अशी टीप त्यांना मिळाली होती. तिथं असलेल्या टीमला एक पांढरी फियाट दिसली, पण त्यात अमरच आहे हे कसं ओळखणार? म्हणून उपनिरीक्षक दिनेश अहिर यांनी फियाटमधून उतरलेल्या माणसाला आवाज दिला, ‘अरे अमर तू इथे?’ तो माणूस चमकला… कारण तो अमरच होता.

त्यानं आपल्याकडच्या ग्लॉक पिस्तुलीमधून साध्या वेशातल्या पोलिसावर गोळी चालवली.

आता चकमक होणार, हे अमरला कळून चुकलेलं त्यामुळं तो पळत सुटला. साळसकरही अलर्ट होतेच त्यांनी गाडी काढली आणि ते अमरचा पाठलाग करु लागले.

त्यांनी अमरला थांबण्याच्या सूचना केल्या, पण अमर सुसाट पळत होता. साल्वेशन आर्मीपासून तो वायसीएमच्या रस्त्याकडे वळला. नेमकी साळसकरांची गाडी फूटपाथवर चढली आणि त्यांनी गाडीतून खाली उडी मारली.

अमरने हीच संधी साधली आणि साळसकरांवर गोळ्या झाडल्या. सुदैवानं त्यांच्या अंगावर बुलेटप्रुफ जॅकेट होतं. फुटपाथवर झोपुन साळसकरांनी अमरला गोळी मारली, पायावर धरलेला नेम चुकला आणि गोळी पाठीत लागली. अमर तरीही पळत राहिला, पण आता वेग कमी झालेला…

साळसकर त्याच्याकडे चालत गेले, आपलं पिस्तुल त्यांनी अमरवर रोखलेलं. तेवढ्यात अमर उलटा फिरला आणि त्यानंही आपल्या जवळची ग्लॉक बंदूक साळसकरांवर रोखली. दात ओठ खाणारा, चिडलेला अमर आणि करारी साळसकर असं ते दृश्य होतं…

आता ही वन ऑन वन चकमक होती. अमरनं काही हालचाल करायच्या आधीच क्षर्णाधात साळसकरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. अमर जमिनीवर कोसळला आणि मुंबईच्या रस्त्यांवर दहशत माजवणाऱ्या आणखी एका कुख्यात गुंडाचा मुंबईच्या रस्त्यांवरच अंत झाला.

संदर्भ – भायखळा ते बँकॉक, एस. हुसेन झैदी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.