भाजपला सत्ता मिळवून देण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते ते पन्ना प्रमुख कोण असतात

२०२२ हे वर्ष बऱ्याच महिन्यांपासून वाट पाहायला लावणारं ठरलं…अखेर नवीन वर्ष आलं आणि सोबतच बहुचर्चित ५ राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा देखील घेऊन आलं आहे. अर्थातच आता सर्वच राजकीय नेते आप-आपल्या पक्षाचा प्रचार करण्यास मैदानात उतरलेत. भाजप पक्ष देखील विशेष रणीनीती सहित निवडणुकीत उतरला आहे.

ज्या ५ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यात यूपी, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब यांचा समावेश आहे. या पाच राज्यांपैकी पंजाबमध्ये काँग्रेसची तर उर्वरित चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजप व्यस्त झालं आहे..पण भाजपच्या निवडणुकीच्या प्लॅन मध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे पन्नाप्रमुख. आणि असं म्हणलं जातंय कि, आत्ताच्या २०२२ च्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळवून देण्यात पन्नाप्रमुख सर्वात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. 

ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण भाजपच्या निवडणूक जिंकण्याच्या रणनीतीचा पन्नाप्रमुखही एक महत्वाचा भाग आहे.

आगामी निवडणुकींच्या दृष्टीने भाजपचे नेतेही विविध राज्यांतील पन्नाप्रमुखांच्या बैठका घेत आहेत. भाजपच्या निवडणुकीच्या रणनीतीसाठी पन्ना प्रमुख महत्त्वाचे आहेत. मतदारांशी बोलण्यापासून ते मतदानाच्या दिवशी मतदार मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतील याची खात्री करण्यापर्यंत ते काम करतात.

उत्तर प्रदेशातील २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि यूपीची सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी भाजप ‘मैं हूं पन्ना प्रमुख’ मोहीम राबवत आहे.  उत्तर प्रदेशमध्ये पन्नास लाख पन्ना तयार करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

पन्ना प्रमुख म्हणजे नेमकं कोण असतात ते काय काम करतात ?

पन्नाप्रमुख म्हणजे एक कार्यकर्ता असतो, त्याच्याकडे मतदार यादीच्या एका पानाच्या ३० मतदारांची जबाबदारी असते. तो मतदार यादीच्या एका पानाचा प्रमुख आहे. आणि म्हणून त्याला पन्नाप्रमुख म्हणले जाते. भाजप आपल्या कार्यकर्त्यांना पन्ना प्रमुख बनवते. पन्ना प्रमुख यांची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या ३० मतदारांशी बोलून त्यांच्याशी संपर्क साधून सर्वांनी मतदान करून भाजपच्या बाजूने मतदान करावे असे ठरवावे.

प्रत्येक राज्यातील मतदार यादीच्या प्रत्येक पानासाठी भाजपचा कार्यकर्ता पन्ना प्रमुख असतो. एका पानावर सुमारे ३० मतदारांची नावे आहेत. त्यांच्या पेजवर नोंदणी केलेल्या मतदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी त्या-त्या पन्ना प्रमुखांची असते. आपल्या मतदारसंघातील सर्व मतदार मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जातील याची खात्री पन्नाप्रमुख करत असतो.

इतकंच नाही तर त्या त्या यादीतील मतदारांशी संपर्क साधून त्यांना भाजपची बाजू सांगून भाजपच्या बाजूने मतदान करण्यासाठी राजी करण्याची जबाबदारीही पन्नाप्रमुखांची आहे. मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच पन्नाप्रमुखांना फोन करून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून मतदारांना त्यांच्या पन्नाची आठवण करून देण्याचे काम करत असतात. 

आपल्या मतदार संघातील किती लोकांनी मतदान केले याची यादी पन्ना प्रमुख अपडेट करत असतात. या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न असतो. किमान त्यांच्या समर्थक मतदारांनी मतदान करायला जावे याची ते जरूर खात्री करतात. 

मतदानानंतर पन्नाप्रमुख त्यांच्या मतदार संघातील किती लोकं मतदानासाठी गेले याची यादी देतात,आणि पन्नाप्रमुखांच्या याच अहवालाच्या आधारे तिथे काय निकाल लागू शकतात याचे अंदाज लावले जातात.

गेल्या वर्षाच्या अखेरीस गुजरात भाजपने पन्ना प्रमुखांची यादी तयार केली तेव्हा तत्कालीन गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही पन्ना प्रमुख बनवण्यात आले होते. गुजरातमध्ये भाजपचे १५ लाख पन्नाप्रमुख आहेत. तेंव्हा भाजपच्या च गृहमंत्र्यांना पन्नाप्रमुख बनविले तर, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल. यासोबतच पन्नाप्रमुखांना त्यांच्या जबाबदारीचे महत्त्वही समजेल.

भाजप हा कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष आहे असं बोललं जातं, त्यात पन्नाप्रमुख म्हणून प्रत्येक कार्यकर्ता लक्ष घालून काम करेल तर वास्तवदृष्ट्या पक्षासाठी काहीतरी जबाबदारी म्हणून देखील पार पडेल. आपणही कष्ट करून मोठे नेते बनू शकतो, लोकांमध्ये जाऊन जनमताचा अंदाज घेऊ शकतो, या अनुभवाचा फायदा पुढे जाऊन कमी येऊ शकतो म्हणून भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पन्नाप्रमुख होण्यास उत्सुक असतो.

भाजपच्या निवडणूक रणनीतीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतात. हे पन्नाप्रमुख असलेले कार्यकर्ते पन्ना प्रमुख या पदाच्या, जबाबदारीच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचतो. यावरून पक्षाविषयीचा अभिप्रायही मिळतो. पक्षाबद्दल कोणाच्या मनात चुकीची धारणा असेल, तर त्याच्याशी बोलून ती दूर करण्याचा प्रयत्न केला जातो….

बदलत्या काळानुसार, भाजपचे रणनीतीकार या पन्नाप्रमुखांची जेवढा तंत्रज्ञानाचा वापर करतो तितका बेस्ट म्हणून तशी ट्रेनींग दिली जाते. फक्त टेक्नॉलॉजीपुरतेच भाजप मर्यादित राहत नाही तर पक्ष तेवढेच लक्ष मूलभूत गोष्टींवरही देते. मूलभूत गोष्टी विसरून केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करता येत नाही. निवडणुकीच्या वेळी अनेक ठिकाणी कॉल सेंटर्सही सुरू केली जातात, जेणेकरून सर्व पन्ना प्रमुखांच्या संपर्कात राहून निवडणूक रणनीती ज्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे, त्याची योग्य अंमलबजावणी करता येईल….आणि हि सर्व राणीनीती अगदी काटेकोर पणे अंमलात आणली जाते. त्यामुळे भाजपच्या यशाचे हे खरे गमक म्हणता येईल.. 

 

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.