बाळासाहेबांच्या त्या पावसातल्या सभेमुळे सेनेचा ‘भगवा’ कारखान्यात पोहचला

तारीख होती ९ ऑगस्ट १९६८….

या दिवशीची संध्याकाळ मात्र नरे पार्कवर नित्यनेमाने जमणाऱ्या कामगारांसाठी एक आगळीच संध्याकाळ होती. कामगार मैदान आणि नरे पार्कवर कष्टकऱ्यांचे हे जये अनेकदा जमले होते, ते लाल बावट्याचा जयजयकार करण्यासाठी….. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगेंपासून, एस. एस. मिरजकरांपर्यंत अनेक कम्युनिस्ट नेत्यांचे शब्द आपल्या कानावर यावेत म्हणून याच मैदानांवर कामगारांनी कितीतरी वेळा खच्चून गर्दी केली होती….. पण त्या दिवशी पाऊस दणादणा कोसळत असतानाही नरे पार्कवर कामगार जमले होते ते लाल बावट्याचा नव्हे, तर भगव्याचा जयजयकार करण्यासाठी…….ऐकून थोडं विलक्षण वाटत असेल पण इथेच, याच दिवशी एक पावसातली सभा झाली होती…

कुणाची ?? शिवसेनेची ! 

थोडं मागचा पुढचा इतिहास बघूया…शिवसेनेची स्थापना होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला होता.  ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मनात फुलवलेला अस्मितेचा निखारा धगधगत होता. लालबाग-परळ–सात- रस्ता स. म. जोशी मार्ग या गिरणगावात सेनेचं बस्तानही बऱ्यापैकी बसलं होतं. 

पण या पट्ट्यातले शिवसैनिक मानसिक स्तरावर कायम दुहेरी कात्रीत सापडलेले असायचे. गिरण्यांच्या बाहेर शिवसैनिक म्हणून वावरणारे आणि ठाकरे यांनी चालविलेल्या कम्युनिस्टांच्या निंदानालस्तीत सहभागी होणारे हे कामगार, गिरण्यांच्या गेटवर आपल कार्ड पंच करून आत शिरल्यावर मात्र हाती एकदम लाल बावटाच घेत असायचे….हा उल्लेख इतिहासात अनेक ठिकाणी तुम्हाला सापडेल.

कापड गिरण्यांमध्ये फोल्डिंग आणि मेंटेनन्स या दोन विभागात आताच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमधला कोकणी कामगार अधिक होता. आताचा रायगड म्हणजेच तेंव्हाचा कुलाबा जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाच्या वर्चस्वाखालचा जिल्हा होता आणि तिथला कामगार गिरण्यांमध्ये कमी होता. १९६० च्या त्या दशकात मुंबईतल्या कापड गिरण्यांमध्येच नव्हे, तर इतर अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांमध्येही कम्युनिस्टांच्या संघटनांचं अवस्व होतं. 

१९६७ च्या लोकसभा निवडणुकीत कॉ. डांगे आणि साथी जॉर्ज फर्नांडिस असे ज्ञातब्बर कामगार नेते विजयी झाले होते आणि मुंबईच्या कामगार चळवळीवर असलेलं डाव्या, साम्यवादी आणि समाजवादी विचारांचं वर्चस्व संपवून, त्या जागी शिवसेनेचा ‘भगवा’ आणल्याशिवाय साम्यवादाच्या या प्रभावाला छेद देता येणार नाही, हे ठाकरे यांना कळून चुकलं होते. त्याचबरोबर, कम्युनिस्टांचं आपल्या कामगारांवर असलेलं हे वर्चस्व तोडून, या कामगार संघटना मोडीत काढण्यासाठी ठाकरे यांच्यासारखा मराठी मनावर मोहिनी घालणारा एक नेता आयताच उपलब्ध झाल्याचं, कामगारांना कायम वेठीस धरणाऱ्या धनिक उद्योगपतींबरोबरच काँग्रेसच्या राज्यकर्त्यांच्याही लक्षात आलं होतं.

या पार्श्वभूमीवर कामगार क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला होता. त्यामुळेच ९ ऑगस्ट १९६८ रोजीची संध्याकाळ ‘भारतीय कामगार सेना’ या नावान पार्कवर भगवे झेंडे फडकवत गिरणगावाच्या सामोरी आली होती….

आणि इथेच झाली ती भर पावसातली सभा !

त्यापूर्वी अनेकदा छोट्या-मोठ्या कारखान्यांमध्ये चालणारे संप शिवसेनेनं निव्वळ दहशतीच्या जोरावर तोडले होते आणि खुद्द ठाकरे यांनी त्या सायंकाळच्या सभेत अगदी रोखठोकपणारे त्याची कबुलीही दिली होती.

काय म्हणाले होते यावेळेस बाळासाहेब ?

“आजवर आमची युनियन नव्हती, तरी एकजुटीच्या ताकदीवा कामगारांच्या हितावर निखारे ठेवणारे संप आम्ही दांडगाईने तोडले. आता तर आमची युनियन आहे. मालक चांगला असेल, तर त्यास आमचा नमस्कार! कामगारांना नीट वागवले तर शेकहॅण्ड…अन जर का तसं नाही झालं तर मग मात्र शेकवायचे!’ हे ठाकरे यांचे या सभेतील उद्गार होते. (मार्मिक, १८ ऑगस्ट १९६८)

भारतीय कामगार सेना स्थापन करण्याचा निर्णय जाहीर झाला तेव्हाच हि संघटना म्हणजे कम्युनिस्टांना नेस्तनाबूत करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि उद्योगपती यांच्या संगनमतानं उभं करण्यात आलेलं एक पिल्लू आहे, असा आरोप होऊ लागला होता. ठाकरे त्यामुळे अस्वस्थ झाले होते आणि संघटनेच्या स्थापनेचा नारळ फोडतानाच त्यांनी इतर कामगार संघटनांवर जोरदार हल्ला चढवला.

‘सध्याच्या ट्रेड युनियन नेत्यांनी कामगारांची वर्गणी स्वतःच्या खिशात कोंबून, कामगारांना मात्र वाऱ्यावर सोडण्याचा धंदा चालवला आहे; पण राजकीय हेतूंसाठी नि वर्गणीसाठी आम्ही कामगारांना कधीही राबवणार नाही. जो मालक तो वाईट, ही आमची भूमिका नाही. दिलदार आणि चांगल्या मालकांशी आमचं वैर नाही आणि महाराष्ट्राच्या तसंच कामगारांच्या हिताशी समरस झालेल्यांच्या कारखान्यात आम्ही कधीही संप करणार नाही; पण राजकारणासाठी संप पुकारायचे नाहीत आणि वर्गणी जमवून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी कामगारांना खड्ड्यात लोटणारे लढे उगाचच द्यायचे नाहीत, कारण ट्रेड युनियनिझम’ हा आपला धर्म आहे.’ असं ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या घणाघाती पद्धतीने बजावून टाळ्या घेतल्या होत्या.

भारतीय सेनेचं अध्यक्षपद दत्ताजी साळवी यांच्याकडे आलं होतं, तर सरचिटणीसपदाची माळ तेव्हा सेनेत नुकतेच दाखल झालेले उत्साही कार्यकर्ते अरुण मेहता यांच्या गळ्यात पडली होती.

भर पावसात ठाकरे यांच्या सभेला गिरणगावातील कामगारांनी केलेली गर्दी निव्वळ कुतूहलापोटी जरूर होती; पण ठाकरे यांच्या भाषणाचा एकूण नूर आणि सभेचा थाट यामुळे त्या कामगारांच्या मनात कम्युनिस्ट संघटनांविषयी असलेल्या आत्मीयतेला थोडा फार धक्का बसला होता, हे मान्य करावंच लागतं…

आणि याच पार्कवर याच दिवशी भारतीय कामगार सेना स्थापन झाली…

असं असलं तरी या आधीच बी.म. धूत नावाच्या एका शिवसैनिकाने ठाकरे यांचं नाव घेऊन अंधेरीत कामगार क्षेत्रात काही हालचाली सुरु केल्या होत्या…असो पण ९ ऑगस्ट १९६८ रोजी अधिकृतरित्या कामगार संघटनेची नोंदणी झाली. 

नरे पार्कवरील मेळाव्यात वाजतगाजत स्थापना झाली आणि युनियनचं काम धडाक्यात सुरू झालं. पण त्यामुळे एक मात्र बरं झालं होतं. कामगार क्षेत्रात तरी मराठी-अमराठी असा भेद शिवसेनेला दूर ठेवावा लागला होता. दुसरीकडे मुंबई-ठाणे परिसरात झपाट्यानं झालेल्या शाखांच्या उभारणीमुळे सेनेचं जाळं मुंबईभर पसरलं होतं आणि शाखांवर वर्दळ सुरू झाली होती. 

एखाद्या कामगारावर अन्याय होत असल्याचं गाऱ्हाणं कानावर आलं, की लगोलग त्याच्याशी संपर्क साधला जाई, तक्रार समजून घेतली जाई, त्या कारखान्यातील अन्य कामगारांना गाठण्यात येई. संघटनेचा ‘भगवा’ कारखान्यात नेला, तर त्या कामगाराचं गान्हाणं तडीस नेण्याचं आश्वासन दिलं जाई. हळूहळू भारतीय कामगार सेनेच्या पाठ्या शहरातील छोट्या-मोठ्या कारखान्यांच्या गेटवर झळकू लागल्या. मालकवर्गही कम्युनिस्ट कामगार संघटनांच्या वर्चस्वाला कंटाळलेलाच होता. कारखान्यात दुसरी युनियन स्थापन होत असेल, तर कम्युनिस्टांचं वर्चस्व आपोआपच मोडलं जाऊ शकेल, याची त्यांना जाणीव होती. साहजिकच अरेरावी, दंडेली आणि दहशतवाद यांच्या जोरावर कारखान्यात प्रवेश मिळवण्यासाठी भारतीय कामगार सेना करत असलेल्या प्रयत्नांकडे मालकवर्ग कधी दुर्लक्ष करत असे, तर कधी त्यांना साथही देत असे… पण हे सर्व शक्य झालं सेनेच्या विस्तारमुळे अन बाळासाहेबांच्या त्या पावसातल्या सभेमूळे….

 हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.