जेव्हा डॉन ब्रॅडमन मुंबईकरांची माफी मागून बाळासाहेबांबद्दल चौकशी करतात…

सर डोनाल्ड ब्रॅडमन उर्फ डॉन. क्रिकेट जगतातले सगळ्यात भारी फलंदाज अशी त्यांची ख्याती. रेकॉर्ड्सची भलीमोठी यादी त्यांच्या नावामागं आहे. आजही पार सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंत प्रत्येक फलंदाज ब्रॅडमनना आदर्श मानतात. आपल्या कसोटी कारकिर्दीतल्या अखेरच्या सामन्यात ब्रॅडमन शून्यावर आऊट झाले नसते, तर त्यांची कसोटीमधली सरासरी १०० असती.

१९३२-३३ च्या ॲशेस सिरीज दरम्यान इंग्लंडच्या बॉलर्सनं ब्रॅडमन यांचा झंझावात रोखण्यासाठी ‘बॉडीलाईन’ माऱ्याची आखणी केली होती. त्यांचं टार्गेट ऑस्ट्रेलियन बॅटर्सची विकेट काढणं नव्हतं, तर त्यांना जखमी करणं होतं. पण ज्या ब्रॅडमनसाठी त्यांनी ही व्यूहरचना आखली, त्याच ब्रॅडमननी इंग्लिश बॉलिंगची पार पिसं काढली. त्या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सगळ्यात जास्त रन्स ब्रॅडमन यांनीच चोपले.

ब्रॅडमन यांच्यासारखा भारी बॅटर भारताकडे कधी येणार, याची सगळ्या जगाला उत्सुकता होती. हे कोडं पहिल्यांदा सुटलं ते लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्यामुळं. तंत्र या गोष्टीतला सगळ्यात बाप माणूस. वेस्ट इंडिजच्या तोफखान्यासमोर आपल्या पहिल्याच टेस्ट सिरीजमध्ये गावसकरांनी आपली किमया दाखवली आणि क्रिकेटविश्वात नव्या ताऱ्याचा उदय झाला. आजही भारतीय क्रिकेटची परिभाषा बदलणारे खेळाडू म्हणून गावसकरांना ओळखलं जातं.

या दोन क्रिकेट विश्वातल्या दादा फलंदाजांची एकदा भेट झाली तेव्हा दोघांच्या गप्पांमधला विषय होता… मुंबई, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना.

बाळासाहेब ठाकरे यांचं क्रिकेटप्रेम तसं सर्वश्रुत आहे. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर आणि बऱ्याच भारतीय क्रिकेटपटूंशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. क्रिकेट मॅच असेल, तर बाळासाहेब अनेकदा राजकीय बैठकींनाही बगल द्यायचे आणि बिअरचा आस्वाद घेत मॅच बघायचे. उद्धव ठाकरे यांनी क्रिकेटर व्हावं अशी बाळासाहेबांची मनोमन इच्छा होती, मात्र क्रिकेटची जास्त आवड राज ठाकरेंना होती. पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद आपल्या मुंबई भेटीत बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर गेला होता, हे तर सगळ्यांना माहीत आहे.

गोष्ट आहे १९७७-७८ ची भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. वेस्ट इंडिजची बॉलिंग फोडून काढलेल्या सुनील गावसकर यांची तेव्हा बरीच हवा होती. साऊथ ऑस्ट्रेलिया क्रिकेटनं एका शाही मेजवानीचं आयोजन केलं होतं. त्या मेजवानीवेळी गावसकर यांच्या शेजारी स्वतः ब्रॅडमन येऊन बसले. आता गावसकर तसे शांत स्वभावाचे, मितभाषी, पण शेजारी साक्षात क्रिकेटचा डॉन येऊन बसलाय म्हणल्यावर गावसकरही खुलून बोलायला लागले. आपसूकच मुंबईचा विषय निघाला, तेव्हा ब्रॅडमन यांनी एक किस्सा सांगितला.

“१९४७-४८ दरम्यान आमचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर चालला होता. तेव्हा आमचं जहाज मुंबईत थांबलं होतं. चाहत्यांची बरीच गर्दी केली होती. मला भेटायला भारताचे महान क्रिकेटर विजय मर्चंट आले, त्यांनीही सांगितलं की बाहेर तुमचे चाहते आले आहेत, तुम्ही त्यांना नुसतं दर्शन तर द्या. पण माझी तब्येत खराब होती त्यामुळं मी मुंबईकरांना भेटू शकलो नाही याचं मला प्रचंड दुःख होतं.”

त्यानंतर भारताबद्दल दोघांच्या गप्पा रंगल्या आणि विषय निघाला मुंबईचा. डॉन ब्रॅडमन यांना मुंबईबद्दल फार उत्सुकता होती. तेव्हा मुंबईत शिवसेनेची जबरदस्त हवा होती. मराठी माणसाची अस्मिता जपण्याचं काम तेव्हा शिवसेना करत होती. त्यांच्या आंदोलनांची चर्चा संपूर्ण देशभर होती. ब्रॅडमन यांनी गावसकर यांना शिवसेनेबद्दल प्रश्न विचारले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही चौकशी केली.

थोडक्यात काय, तर १९७७-७८ च्या काळात सेनेची कीर्ती फक्त भारतातच नाही तर जगातल्या सर्वोत्तम फलंदाजापर्यंत सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियामध्येही पोहोचली होती.. हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.