गांधीनगरमधून निवडून येणाऱ्यांच्या अडचणी वाढतात का ? इतिहास काय सांगतो.

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली, अशी बातमी आली. पण त्याहून अधिक आश्चर्यकारक बातमी होती ती म्हणजे पहिल्या यादीत गुजरातच्या गांधीनगर येथून लालकृष्ण अडवाणी यांचा पत्ता कट झाला याची. गांधीनगर मधून अमित शहा यांना उमेदवारी देण्यात आली.

लालकृष्ण अडवाणी १९९१ ते २०१४ पर्यन्त गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत. आत्ता मात्र नवा गडी नवा राज्य चा फॉर्म्युला वापरत आपल्या पक्षाच्या पितामह भिष्मांनाच घरचा रस्ता दाखवण्याच काम मोदी-शहा यांनी केलं असल्याच बोलण्यात येत आहे. तर दूसरीकडे वयाची चिंता करत त्यांना विश्रांती देण्यात येत असल्याच सांगण्यात येत आहे.

आत्ता कारणे परंपरा काहीही असो,

पण या मुळे चर्चेत आला तो गुजरातचा गांधीनगर मतदारसंघ. बर गांधीनगर चर्चेत येण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापुर्वी देखील अनेक वेळा गांधीनगरचा हा मतदारसंघ चर्चेत आला आहे, किंवा असही म्हणता येईल की याच मतदारसंघाच्या आजूबाजूने फक्त गुजरातच नाहीत तर भारताचं राजकारण देखील घडलं आहे.

त्यापुर्वी गांधीनगर या मतदारसंघाच नेमकं महत्व काय आहे ते पाहणं गरजेचं ठरतं. 

गांधीनगर लोकसभा मतदारसंघात गांधीनगर उत्तर, कलोले, आनंद, घटोलडीया, नारनपुरा, साबरमती, वेजाळपूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. आनंद आणि कलोले सोडता इतर सर्वच ठिकाणी भाजपची सत्ता आहे. १९६७ आणि १९७१ साली येथून कॉंग्रेसचे सोमचंद सोळंखी निवडून आले होते. त्यानंतर १९७७ साली जनता पक्षाचे पुरषोत्तम मावळकर या मतदारसंघातून खासदार झाले. त्यानंतर १९८० साली कॉंग्रेसचे अमृत पटेल आणि नंतरच्या १९८४ सालच्या निवडणुकीत जी.आय.पटेल या मतदारसंघातून निवडून आले होते.

मात्र नोंद घेण्यासारखा पहिला विजय ठरतो तो शंकर सिंह वाघेला यांचा. १९८९ साली गुजरात भाजपचा पाया रोवणारे शंकरसिंह वाघेला याच मतदारसंघातून निवडून आले होते. 

१९९१ सालापासून ते २०१४ पर्यंत लालकृष्ण अडवाणी या मतदारसंघातून निवडून येणारे हक्काचे उमेदवार होते. अपवाद ठरला तो फक्त १९९६ सालचा. १९९६ साली अटलबिहारी वाजपेयी या मतदारसंघातून निवडून आले होते. लखनौ आणि  गांधीनगर या पैकी गांधीनगरच्या जागेवरुन अटलबिहारी वाजपेयी यांनी राजीनामा दिली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे विजय पटेल निवडून आले.

एकमेव अपवाद वगळता पुन्हा गांधीनगर आणि लालकृष्ण अडवाणी हे समीकरण जुळलं. बहुतांश वेळी लालकृष्ण अडवाणी ५० टक्याहून अधिक मते घेत गांधीनगर मधून विजयी झाले. 

तर अशा प्रकारे गांधीनगर मतदार संघासोबत शंकरसिंह वाघेला, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी आणि आत्ता अमित शहा ही नावे जोडली गेली.

आत्ता विषय असा की या मतदारसंघातून निवडून येणाऱ्यांच्या अडचणी खरच वाढतात का?  

गांधीनगर मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे पहिले नेते होते ते म्हणजे शंकरसिंह वाघेला. १९९५ साली गुजरात विधानसभा भाजपने जिंकली. त्यापुर्वी ते गांधीनगर मधून विजयी झाले होते. आत्ता राज्याचा मुख्यमंत्री आपणच होणार याची खात्री त्यांना होती पण मुख्यमंत्री पदाची माळ पडली ती केशुभाई पटेल यांच्या गळ्यात. त्यानंतर त्यांचा पहिला अयशस्वी विद्रोह अटल बिहारी वाजपेयी यांनी मध्यस्थी करून मिटवला होता. 

वाघेला मात्र या घटनेनंतर स्वस्थ बसले नाहीत व त्यांनी १९९६ साली भाजपला रामराम ठोकला. कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर वाघेला मुख्यमंत्री झाले पण ते वर्षभरासाठीच. पुढे १९९८ साली त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला. सध्या त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. मोदींना विरोध करणारे कणखर व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो मात्र ते पुन्हा मुख्यमंत्री होवू शकले नाहीत हा देखील इतिहास विसरला जावू शकत नाही.

त्यानंतर थोड्या कालावधीसाठी गांधीनगरच प्रतिनिधीत्व करण्याचा मान मिळाला होता तो अटल बिहारी वाजपेयी यांना. ते १९९६ साली पंतप्रधान झाले मात्र फक्त तेरा दिवसांसाठीच. लखनौ मधली जागा कायम ठेवून त्यांनी गांधीनगरमधून झालेल्या विजयाचा राजीनामा दिला. पोटनिवडणुकीत विजय पटेल निवडून आले. त्यांनी २००२ च्या दंगलीच्या मुद्यावरून विधानसभेत मोदी सरकारची बाजू मांडली होती. त्यानंतर ते सक्रिय राजकारणात कुठेच दिसले नाहीत. नाही म्हणायला ते बार कॉन्सिलच्या काही पदावर होते.

त्यानंतरचं सर्वात महत्वाच नाव म्हणजे लालकृष्ण अडवाणी. १९९१, १९९८, २००४, २००९, २०१४ या सगळ्या लोकसभा निवडणूक त्यांनी याच जागेवरून लढल्या.

इंडिया शायनिंग ही घोषणा देखील याच मतदारसंघात जन्माला आल्याच सांगितलं जात. मात्र या जोरदार जाहिरातीमुळे देखील भाजप सरकार पुन्हा सत्तेत येवू शकलं नाही. सिंधी समाजातील असल्यामुळे अल्पसंख्याक असल्याची भावना असो की संपुर्ण भारताला तुलनेत मवाळ वाटणारा अटल बिहारी वाजपेयींचा चेहरा म्हणून असो, लालकृष्ण अडवाणी नेहमीच दुसऱ्या क्रमांकावर राहिले. पंतप्रधान पदाची अपेक्षा संपुष्टात आल्यानंतर त्यांना राष्ट्रपती करण्यात येईल अस वाटत असताना देखील त्यांचे नाव या चर्चेत देखील येवू शकलं नाही हे दुर्देव.

आत्ता याच जागेवरुन अमित शहांनी शड्डू ठोकला आहे. गांधीनगरच्या लोकसभेमुळे अमित शहांच्या अपेक्षांमध्ये वाढ झाल्याच तर इतिहासाच्या कालचक्राप्रमाणे कोणत्या घडामोडी घडतील की नेहमीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी अपवादा निर्माण करण्यास ते इथेही यशस्वी ठरतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे ही वाचा भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.