विमानात सिगरेट, नंतर FIR बॉबी कटारियाचं प्रकरण आहे तरी काय?

बॉबी कटारियाविरोधात दिल्ली पोलीसांनी FIR रजिस्टर करून घेतला असल्याची बातमी काल ANI या वृत्तसंस्थेनेमार्फत कळवण्यात आली. आत्ता यात इतकं काय विशेष. असेल कोणतरी बॉबी कटारिया आणि केलं असेल त्यानं कायतरी तर थांबा.. बॉबी कटारिया बद्दल सर्व काही माहित असणाऱ्या आणि त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसणाऱ्या अशा दोन्ही व्यक्तींसाठी ही माहिती उपयोगाची ठरू शकते..

तर सुरवात करूया प्रकरण नेमकं काय आहे… 

थोडक्यात सांगायचं तर सोशल मिडीयावर बॉबी कटारिया नावाचा एक इन्फ्यूएन्सर आहे. म्हणजे इन्स्ट्राग्रामवर रिल्स टाकणे आणि प्रसिद्ध होणं असा त्याचा विषय आहे. या महाभागाने काय केलय तर चक्क विमानात बसून सिगरेट पित असलेला व्हिडीओ शूट केलाय.

हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि गड्यावर FIR दाखल झाली..

आत्ता प्रकरण विस्ताराने पाहूया..

तर असं सांगितलं जातंय की, हा व्हिडीओ 24 जानेवारीला व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी टिका करण्यास सुरवात केली. कारण देखील साहजिक होतं. विमानात सिगरेट पिणं म्हणजे स्वत:सोबत अन्य प्रवाशांचा जीव देखील धोक्यात घालणं.

त्यानंतर स्पाईस जेट कंपनीच्या नजरेस हा प्रकार आला व स्पाईस जेटमार्फत गुरगाव पोलीसांकडे 2 फेब्रुवारीला तक्रार दाखल करण्यात आली होती.

पण झालं अस की टिका होवू लागल्याने बॉबी कटारियाने हा व्हिडीओ डिलीट केला होता.

त्यानंतर या तक्रारीचा देखील पाठपुरावा झाला नाही. कारण अस सांगण्यात आलं की नेमकी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तक्रार दाखल करायची आणि कोणते गुन्हे लावायचे यामध्ये वेळ गेला. वेळ गेला आणि प्रकरण विस्मृतीत गेलं.

पण पुन्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला. यावेळी व्हायरल झालेला व्हिडीओ मागच्या व्हिडीओपेक्षा जोरात होता.

यावेळी हा व्हिडीओ थेट केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यापर्यन्त पोहचला. विमानातील इतर प्रवाशांच आयुष्य धोक्यात घालण्यात येत असल्यानं लोकांनी त्यांना ट्विट करून सांगितलं. त्यानंतर त्यांनीही यावर कारवाई करावी असे आदेश दिले.

यानंतर 13 ऑगस्ट रोजी दिल्ली पोलीसांकडे स्पाईस जेटचे कायदेशीर व्यवहारांचे व्यवस्थापक जसबीर चौधरी यांनी तक्रार दाखल केली. यामध्ये हा व्हिडीओ 20 जानेवारीला शूट करण्यात आला होता असं  सांगण्यात आलं.

बॉबी दूबईहून दिल्लीला येणाऱ्या एसजी 706 या स्पाईस जेटच्या विमानात प्रवास करत होता. त्यावेळी प्रवाशांच लक्ष चुकवून त्याने सिगरेट पितानाचा व्हिडीओ शूट केला असल्याचं सांगण्यात आलय. जसबीर चौधरींनी तक्रार दाखल केल्यानंतर, 16 ऑगस्ट रोजी दिल्ली पोलीसांकडून बॉबी कटारियावर नागरी विमान सुरक्षा कायदा १९८२ अंतर्गत कलम ३ नुसार बॉबी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आत्ता दुसरा मुद्दा तो म्हणजे विमानात बसून सिगरेट पिण्याचं त्याचा व्हिडीओ करून ते शेअर करण्याचं धाडस तरी कसं झालं..? 

यासाठी बॉबी कटारियाचा एकदा इतिहास बघायला लागेल. 

सोशल मिडीयावर फेमस असलेला बॉबी 2017 मध्ये सर्वात पहिल्यांदा चर्चेत आलेला. तेव्हा कारण ठरलेलं गुरूग्राममध्ये झालेला डबल मर्डर. या केसमध्ये त्यांच्यावर सहा गुन्हे दाखल होते. त्याला अटक देखील करण्यात आली होती. तेव्हा पोलीसांच्या विरोधात याने व्हिडीओ करून पोस्ट केला होता.

त्यानंतर मागच्या महिन्यात म्हणजेच 29 जुलै 2022 मध्ये बॉबीचा दूसरा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो उत्तराखंडच्या डेहराडूनच्या आसपास एका रस्त्यावर बसून दारू पित होता. 

हा व्हिडीओ देखील त्याने सोशल मिडीयावर शेअर केला होता. तेव्हा उत्तराखंडच्या डीजीपींनी यांची स्वतःहून दखल घेतली होती. त्यांच्यावर आयपीसी कलम 342, 336, 290, 510 आणि 67 आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आत्ता सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आम्ही या बॉबी कटारियावर ही स्टोरी का लिहिली अन् त्याची माहिती तुम्हाला का सांगतोय.

तर याचं कारण म्हणजे काहीतरी ओव्हर करण्याच्या नादात आपण नियम मोडतोय, कायदा तोडतोय, खूप मोठ्या संकटाला आमंत्रण देतोय याचं नसलेलं भान. म्हणजे आपल्याकडे देखील रिल्सच्या माध्यमातून थेरगाव क्विन या मुलीवर पोलीस केस झाली होती. त्यामुळे रिल्स करा काहीही करा पण कायद्याच्या चौकटीत राहूनच करा..

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.