बॉलीवूडने नुसरत फतेह अली खां साहेबांकडून चोरलेली गाणी !

“नुसरत फतेह आली खान जेव्हा गातो तेव्हा अल्ला सुद्धा काही काळ ब्रेक घेऊन तल्लीन होऊन नुसरतची कव्वाली ऐकतो.”

पाकिस्तानमध्ये ही फेमस आख्यायिका होती. कट्टर पाकिस्तानी इस्लाममध्ये “संगीत ” हे पाप आहे असं म्हणून नुसरतच्या गाण्यांना नाक मुरडत होते. ते तर आपल्याकडचे महाभाग पाकिस्तानी गायक नको म्हणून नुसरतच्या गाण्याकडे दुर्लक्ष करायचे.

धर्म, देश, भाषा अशा कोणत्याही सीमेतअडकणारा त्याचा आवाज नव्हता. तो फक्त पाकिस्तानचा नव्हता तर हिंदुस्तानी कव्वालीला जागतिक संगीतामध्ये आदराच स्थान मिळवून देणारा ग्लोबल सिटीझन होता. त्यांच्यासारख्या कलावंतामुळे जगभरात भारतीय संगीतासाठी कवाडे खुली झाली.

नुसरत फतेह अली खानचा जन्मच ६०० वर्षांची कव्वाल गायकांची परंपरा असलेल्या कुटुंबात झाला होता.

पंजाबमधल्या जालंधर शहरात नुसरतच्या पूर्वजाने कव्वाली शिकली. पुढे अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या सुफी संगीताचा हा ठेवा जालंधरमध्ये खान कुटुंबीयांनी तेवत ठेवला. फाळणीच्या दुर्दैवी घटनेमुळे त्यांना पाकिस्तानमधल्या फैसलाबाद शहरात जावं लागलं. तिथेच १३ ऑक्टोबर १९४८ साली नुसरतचा जन्म झाला.

नुसरतचे वडील फतेह आली खान तेव्हा त्यांच्या कव्वालपार्टीचे प्रमुख होते.  त्या काळात कव्वाल गायकांना समाजात किंमत नव्हती. संगीत क्षेत्रात देखील कव्वाल गायकीला टाकाऊ समजलं जायचं. टिपिकल भारतीय बापाप्रमाणे नुसरतच्या बापानं त्याला सांगितल की “एक तर डॉक्टर बनायचं किंवा इंजिनियर बनायचं. कव्वालीकड फिरकायचं सुद्धा नाही.”

आता वळणाच पाणी वळणावरच जाणार. नुसरतला कव्वालीचीच ओढ होती आणि बाप इंजिनियर हो म्हणत असेल तर पोरग इंजिनियरिंगला फाट्यावर मारणारच अशी आपली परंपराच आहे.

नुसरत बापापासून लपून संगीत शिकू लागला. काकाच्यामागे भुणभुण लावून त्याने तबला शिकून घेतला. शाळेची तशी बोंबच होती. एकदा वडीलांनी त्याला तबला वाजवता वाजवता गाताना ऐकलं. त्याच्या आवाजाची विलक्षण ताकद त्यांना अनुभवायला आली. अखेर त्यांनी नुसरतला गाण शिकवायचं ठरवलं फक्त एका अटीवर “शाळा शिकायचं”.

नियतीच्या मनात काही वेगळच होत. वडीलांचं अकाली निधन झालं आणि नुसरतचं  शिक्षण सुटल. काही गरज पण नव्हती. संगीताची भाषा त्याला जगभरात ओळख करून देणार होती. आपल्या दैवी आवाजान हृदयाची जखम भरून काढणारा डॉक्टर तो बनला.

त्याची मातृभाषा पंजाबी होती. उर्दू आणि पंजाबीमधली त्याची गाणी रेडीओमधून सगळीकडे हिट होऊ लागली. कोणतेही आधुनिक वाद्य नाही. फक्त हामोनीयम, तबला आणि टाळ्याची साथ देणारे तिघे चौघे असा जमानिमा. फक्त एवढ्या भांडवलावरच  नुसरत मैफिलीत स्वर्ग उभा करू लागला.

लंडनमध्ये वर्ल्डम्युझिक फेस्टिवलमध्ये त्याचं गाण झालं आणि तो जगभरातल्या रसिकांच्या  गळ्यातला ताईत बनला. हॉलीवूड चित्रपटासाठी गाण्याच्या त्याला ऑफर आल्या. अनेक पाश्चात्य संगीतकार नुसरतशी कोलॅबरेशन करण्यासाठी धडपडू लागले.

शुद्ध आणि कृत्रिम संस्कारविरहीत असा खर्जातला पहाडी आवाज त्याची ओळख होती. ग्रॅमी पुरस्कारासाठी त्याला दोनदा नामांकन मिळालं.

जेवढ प्रेम त्याला पाकिस्तानात मिळालं तेवढच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम भारतात त्याला मिळालं . त्याचा आवाज और प्यार हो जायेगा, कच्चे धागे, दिल्लगी, धडकन अशा अनेक चित्रपटात वापरला गेला. भारतीय स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ए.आर. रेहमाननी ‘वंदेमातरम्’ अल्बम बनवला होता त्यात गुरुज पिस या गाण्याला नुसरत यांनी आपला आवाज दिला आहे.

१६ ऑगस्ट १९९७ रोजी  त्याचं निधन झालं. पण आपला पुतण्या राहत फतेह अलीच्या रुपात तो आजही भारतीय रसिकांच्या मनावर राज्य करतोच आहे. त्यांची बरीच गाणी परवानगी घेऊन किंवा काही वेळा न परवानगी घेताच बॉलीवूडमध्ये आजही वापरली जातात.

आजच्या नुसरतच्या जन्मदिनी खाली अशीच काही  गाणी देतोय जी मूलतः नुसरत फतेह आली खान यांनी गायली होती.

१.मेरा पिया घर आया ओ रामजी

माधुरीच्या डान्समूळ फेमस झालेलं हे गाण अनु मलिकने नुसरत यांच्या कव्वाली वरून चोरलं आहे.

२.मुझे इक पल चैन ना आये

अनिल कपूर श्रीदेवीच्या जुदाई या चित्रपटात नदीम श्रवण या संगीतकारानी हे गीत चोरून वापरलंय.

३. कितना प्यारा तुझे रबने बनाया

आमीर खान करिश्माच्या राजा हिंदुस्तानी मधलं हे गान सुद्धा नुसरत यांच्या गाण्याची कॉपी आहे. संगीतकार नदीम श्रवण.

४.तू चीज बडी है मस्त मस्त

https://www.youtube.com/watch?v=DdGC7MRpYIo

अक्षय कुमार रविना टंडन यांचं दिलखेचक नृत्य असलेलं गाण हे खरं तर मूळ एक सुफी अध्यात्मिक गाण आहे. विजू शह या संगीतकाराने मोहरा या चित्रपटासाठी नुसरत यांची चाल चोरली.

५.ये जो हलका हलका सुरूर है

https://www.youtube.com/watch?v=VUAk_Hd5dnc

सौतन कि बेटी या चित्रपटात किशोर कुमार यांनी गायलेलं गाण नुसरत यांच्या सुप्रसिद्ध गझलेवरून चोरलेल आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.