भारताच्या गीर, नेल्लोर गाई सातासमुद्रापार नेल्या आणि ब्राझील टॉपचा बीफ उत्पादक देश झाला

ॲमेझॉन म्हटल्याबरोबर ॲनिमल प्लॅनेट किंवा डिस्कवरी चॅनेल बघणाऱ्यांना लगेच ॲमेझॉनचे किर्रर्र घनदाट जंगल आठवते. त्यासोबत कायम पाऊस पडणाऱ्या जंगलातून वाहणारी ॲमेझॉन नदी आणि जंगलातील दुर्लभ पशु पक्षीही आठवतात. 

पण या ॲमेझॉनच्या देशात म्हणजे ब्राझीलमध्ये इतकी जैवविविधता असली तरी, सध्या बीफ उत्पादनाच्या बाबतीत भारताला पिछाडणाऱ्या ब्राझीलची गुरं मात्र अमेझॉनमधली नाहीत. 

सद्या जगातील सगळ्यात जास्त दूध आणि बीफ उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीवर नजर टाकली तर आपल्याला अमेरिका, ब्राझील आणि चीनचे नाव सगळ्यात वर दिसते. हे तीनही देश मिळून जगातील जवळपास निम्मं बीफ उत्पादन करतात. मात्र एकेकाळी जगातील २० टक्के बीफ उत्पादन करणारा भारत मात्र यात मागे पडत आहे.

२०२० मध्ये भारतात जगातील बीफ उत्पादनाच्या केवळ ६.२१ टक्केच बीफ उत्पादन झालय. परंतु ब्राझील मात्र १६.६७ टक्के उत्पादन करून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. परंतु ब्राझीलला बीफ उत्पादनात इतकं संपन्न करणारी गुरं ब्राझीलियन नसून चक्क भारतीयच आहेत.

हे वाचल्यावर आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल कि भारतातील गुरांचा या ब्राझीलशी काय संबंध आहे? आणि भारतातील गुरं दोन महासागरं ओलांडून इतक्या दूर गेली कशी असाही प्रश्न पडला असेल तर चला समजून घेऊयात काय आहे यामागचा किस्सा.  

या भारतीय गुरांचा ब्राझीलशी संबंध इतिहासात दडलाय..

ब्राझील ही मुळात पोर्तुगीज लोकांनी जिंकलेली भूमी होय. जेव्हा पोर्तुगीज ब्राझीलमध्ये गेले तेव्हा पशुपालनासाठी पोर्तुगालमधील आपली गुरं सुद्धा घेऊन गेले. पण ब्राझीलची जमीन आणि वातावरण काही या गुरांना सूट झाली नाही. पोर्तुगीजांनी यासाठी अनेक खटपटी केल्या. या गुरांसाठी विशिष्ट गवत सुद्धा आणला परंतु गुरांपासून हवं तसं  उत्पादन मिळेना.

पोर्तुगीजांनी मार्ग पकडला तो भारताचा..

मग काय ब्राझीलच्या भूमीत तग धरू शकतील अशा गुरांचा शोध सुरु झाला. पोर्तुगीजांना भारत काही अनोळखी देश नव्हता. मग काय लागलीच त्यांनी वाट धरली आपल्या भारताची. भारतात येऊन पोर्तुगीजांनी गुरांच्या उत्तम प्रजातींची शोधाशोध सुरु केली. या शोधात त्यांना आवडलेली पहिली प्रजाती म्हणजे नेल्लोर..

भारतातील गुरांमध्ये पहिली पसंत ठरली नेल्लोर  

आंध्रप्रदेशतील पांढऱ्या रंग, दमदार शरीर असलेली आणि आखूड शिंग असलेली ही स्थानिक गाईंची  प्रजाती आहे. ही प्रजाती मुळची आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील आहे यामुळे या प्रजातीचं नाव नेल्लोर पडलंय.

१८९० मध्ये सगळ्यात पहिल्यांदा नेल्लोर बैलांना ब्राझीलमध्ये नेण्यात आलं. 

या नेल्लोर बैलाचं  स्थानिक प्रजातींसोबत संकर करून झेबू ही गाईंची पहिली हायब्रीड प्रजाती तयार करण्यात आली. 

ही प्रजाती ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय आणि महागडी प्रजाती बनली. याच प्रजातीपासून ब्राझील सगळ्यात जास्त मांस उत्पादन करतो. 

मांस उत्पादन सुरु झालं होतं पण दुधाच्या बाबतीत अजूनही शोध सुरूच होता..

नेल्लोर प्रजातीपासून झेबू या हायब्रिड प्रजातीची निर्मिती झाली खरी. पण भरगोस दूध देणारी जात आजून शोधायची होती. याचा शोध घेतांना पोर्तुगीज पुन्हा भारताकडे वळले आणि गुजरात आणि राजस्थानात दोन प्रजाती सापडल्या.

यासाठी पहिल्यांदा राजस्थान आणि गुजरातच्या भागात आढळणारी कांकरेज ही गुरांची प्रजाती निवडण्यात आली. 

दमदार शरीर आणि लांब व उंच शिंगे असलेली ही प्रजाती मजबूत आणि उष्ण वातावरणात टिकणारी होती. यामुळे हीचा संकर करण्याची योजना आखण्यात आली. 

कांकरेज बैलासोबत गीर गाईचीसुद्धा निवड झाली..

पोर्तुगीजांनी कांकरेज बैल तर निवडलेच परंतु यासोबतच गुजरातमधील सौराष्ट्रातली गीर गाय सुद्धा ब्राझीलला नेण्यासाठी निवडण्यात आली. कांकरेज आणि गीर गाईंचे स्थानिक प्रजातीशी संकर करण्यात आले. या संकरातून गुज्जरा या नवीन हायब्रीड प्रजातीचा जन्म झाला. या हायब्रीड प्रजातींवर आणखी नवनवीन प्रयोग करण्यात आले. 

या प्रयोगांमधून आणखी जास्त दूध व मांस उत्पादन होऊ शकेल अशा प्रजाती तयार करण्यात आल्या. या प्रयोगांमुळे ब्राझील आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बीफ उत्पादक देश बनलाय.

भारतीय गुरांच्या बळावर ब्राझील जागतील अग्रेसर बीफ उत्पादक झालाय परंतु भारतात आणण्यात आलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे भारताचे बीफ उत्पादन घातले आहे. यामुळे भारतातून मध्य पूर्व आणि खाडीच्या देशांना होणारी बीफची निर्यातही थांबलीय. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.