भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना हरवून लिझ ट्रस UK च्या पंतप्रधान कशा बनल्या ?

आंतरराष्ट्रीय राजकारणात बहुचर्चित ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची निवडणूक लिझ ट्रस यांनी जिंकली आहे. त्यांनी भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा पराभव केला आहे. लिझ ट्रस उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. 

जुलैच्या पहिल्या आठवड्यात बोरिस जॉन्सन यांनी दिलेल्या पंतप्रधानपदाच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान कोण होणार याबाबत चर्चा चालू होत्या. भारतीय वंशाचे व इन्फोसिसचे नारायण मुर्ती यांचे जावई ऋषी सुनक यांच नाव या स्पर्धेत आल्यामुळे सर्वसामान्य भारतीयांच्या नजरा देखील या निवडणूकीच्या निकालाकडे रोखल्या गेल्या होत्या..

पण असं म्हणलं जातंय कि ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे असले तरीही त्यांच्याऐवजी लिज ट्रस यांचं पंतप्रधान बनणं हे भारतासाठी फायदेशीर ठरणार आहे कसं ते पुढं बघूया…

लिज ट्रस या कोण आहेत ? 

तर एका मिडल क्लास फॅमिलीतून राजकारणात येऊन त्यांनी ठसा उमटवला. त्यांचे वडील पेशाने शिक्षक तर आई नर्स. स्वतः लिज ट्रस या राजकारणात येण्याआधी अकाउंटंट होत्या. त्यांच्या निमित्ताने ब्रिटन ला तिसरी महिला पंतप्रधान लाभली आहे. मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे यांच्यानंतर लिज यांनी ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनण्याचा मान मिळवला. 

तर भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे नारायण मूर्ती-सुधा मूर्ती यांचे जावई तर आहेत या शिवाय, ऋषी सुनक यांच्याबद्दल सांगायचे तर, त्यांचा जन्म हॅम्पशायरमध्ये झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि आई फार्मसी चालवायच्या.  त्यांनी आपले शालेय शिक्षण ब्रिटनमधल्या विंचेस्टर कॉलेजमधून केले, हायर एज्युकेश ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतुन पूर्ण गेले. तर अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून एमबीए पूर्ण केलं. शिक्षणानंतर त्यांनी इन्व्हेस्टमेंट बँक गोल्डमन सॅक्समधून करिअरला सुरुवात केली…आणि २०१५ पासून राजकारणाला सुरुवात केली. 

२०१५ मध्ये पहिल्यांदा ते रिचमंड, यॉर्कशायरचे खासदार झाले. त्यानंतर गेल्याच वर्षी खासदार म्हणून ते दुसऱ्यांदा निवडून आलेत. २०१८ मध्ये त्यांना ब्रिटनचे निवास मंत्री करण्यात आलं होतं. लागलीच त्यांना अर्थमंत्री करण्यात आलं. अर्थ मंत्रालय ब्रिटिश सरकारमध्ये पंतप्रधान पदानंतर दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. ब्रिटनमध्ये अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे ऋषी सुनक हे पहिले भारतीय वंशांचे व्यक्ती आहेत.

ब्रिटनमध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक प्रक्रिया काय असते ? 

येथे दोन प्रमुख पार्टी आहेत. लेबर पार्टी आणि कंझर्व्हेटिव्ह पार्टी. ब्रिटनच्या लोकसभेत कंझर्व्हेटिव्ह पार्टीचं बहुमत आहे. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर कंझर्व्हेटिव्ह पार्टीची सत्ता कायम राहणार आहे मात्र पक्षाला पंतप्रधानपदासाठी दुसरा व्यक्ती नेमण्याची गरज होती. त्यानुसार प्रक्रिया सुरु झाली.

त्या प्रक्रियेनुसार, कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदाराला पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी किमान २० सहकारी खासदारांचा पाठिंबा हवा असतो. तेंव्हाच ते पंतप्रधान पदासाठी पात्र उमेदवार ठरतात.  त्यानंतर दोन टप्प्यात निवडणूक होते. पहिल्या टप्प्यात खासदार उमेदवारांना गुप्त मतपत्रिकेद्वारे मतदान करतात. प्रत्येक फेरीनंतर ज्यांना सर्वात कमी मतं मिळतात त्यांना बाहेर काढलं जातं. जोपर्यंत शर्यतीत २ उमेदवार उरत नाहीत तोपर्यंत मतदान होतं आणि शेवटी दुस-या टप्प्यात, कार्ड घेऊन  पक्षाचे सदस्य शेवटच्या दोन उमेदवारांना मतदान करतात.

नेमका निकाल काय लागला ? 

तर बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यांनंतर त्यांच्या पंतप्रधान पदासाठी आठ नावं समोर आली होती. या आठ नावातून फायनल दोन नावं कन्झरवेटिव्ह पार्टीचे खासदार निवडणार होते. त्यासाठी खासदारांच्या मतदानाच्या पाच फेऱ्या झाल्या आणि प्रत्येक फेरीत सर्वात कमी मतं मिळवणारा उमेदवार बाहेर पडत गेला आणि शेवटी ऋषी सुनक आणि लिज ट्रस हे दोघंच राहिले. या पाचही राऊंडमध्ये ऋषी सुनक पहिल्यापासूनच टॉपला राहिले. तर लिज ट्रॉस यांना शेवटच्या फेरीपर्यंत झगडावं लागलं.

शेवटच्या राऊंडमध्ये ऋषी सुनक यांना १३७ खासदारांनी पाठिंबा दिला तर लिज ट्रॉस यांना ११३ मतं मिळाली. आता या दोघांना कन्झरवेटिव्ह पक्षाचे जे जवळपास एक लाख साठ हजार नोंदणीकृत सदस्य आहेत त्यांच्यामधून निवडून यायचं होतं. इथंही सुरवातीला आपली उत्कृष्ट वक्तृत्वशैली, बुद्धीमत्ता आणि अर्थमंत्रीपदाचा अनुभव या जोरावर ऋषी सुनक सुरवातीला बाजी मारतील अशी शक्यता निर्माण झाली आणि मात्र उत्तरोउत्तर ऋषी सुनक यांच्या विरोधात वातावरण तयार होत गेला आणि ते मागे पडत गेले.

खासदारांच्या मतदानाच्या दरम्यान ऋषी सुतक यांच्या बाजूने राहिलेल्या अनेक मोठ्या नेत्यांनी ऋषी सुनक यांची साथ सोडली आणि लिझ ट्रस यांना पाठिंबा जाहीर केला. आज वेगवेगळ्या संस्थांमार्फत जे सर्वे आणि पोल जाहीर होत आहेत त्यामध्ये लिझ ट्रस यांनी ऋषी सुनक यांना मोठ्या फरकाने पछाडल्याचं अनुमान मांडण्यात येत आहे.

ऋषी सुनक कुठे मागे पडले ?

ऋषी सुनक हे ब्रिटनमध्ये सर्वात लोकप्रिय राजकारणी मानले जातात.  लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांनी बोरिस जॉन्सन यांनाही मागे टाकलं होतं. ते उत्कृष्ट वक्ते आहेत. असा अंदाज लावला जात होता कि येत्या काळात ते भारतीय वंशाचे पहिले ब्रिटिश पंतप्रधान बनतील. पण तरीही ते या शर्यतीत मागे पडले. का पडले तर त्यांची राजकारणातली प्रतिमा ही श्रीमंत टेक्नोक्रॅट राजकारणी अशी आहे. 

त्यांचे मार्गदर्शक असणारे बोरिस जॉन्सन यांनी जेंव्हा पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला तेंव्हापासून पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार म्हणून ऋषी सुनक पुढे आले. त्यांची राजकीय महत्वाकांक्षा लपून राहिली नाही. असंही म्हणलं गेलं कि, ऋषी सुनक यांनी बोरिस जॉन्सन यांच्या पाठीत खंजीर खुपसला. 

त्यांचे आर्थिक वाद देखील समोर आलेले. निवडणुकीच्या प्रचारात वंचित शहरी भागांतून पैसे घेतल्याचं त्यांनी मंजूर केलेलं.  

ते पिछाडीवर पडण्याच्या कारणांमध्ये सुनक-मूर्ती दाम्पत्याची मालमत्तेची कारणं आहेत. त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना संडे टाइम्सने इंग्लडच्या महाराणीपेक्षा श्रीमंत दाखवलं. जे ऋषी सुनक यांना परवडलं नाही. याशिवाय ब्रिटनमध्ये जशी महागाई वाढत गेली तशी त्यांची अर्थमंत्री म्हणून असणारी लोकप्रियता घटत गेली…

लिज ट्रॉस आघाडीवर कशा राहिल्या ?

बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यांनतरही लिज बोरिस यांच्या बाजूने राहिल्या. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वात शेवटी सहभागी झाल्या आणि फायनल पर्यंत पोहचल्या. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. 

निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी आयकरात १.२५% कपात करण्याचे आश्वासन दिलं होतं. शिवाय कॉर्पोरेशन टॅक्स मागे घेण्याचेही आश्वासन दिलं. सर्वात महत्वाची भूमिका त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळेस घेतलेली. या युद्धासाठी व्लादिमीर पुतीन यांना जबाबदार ठरवण्यात विदेशमंत्री असलेल्या लीज यशस्वी ठरल्या होत्या त्याचा परिणाम म्हणजे त्या प्रत्येक टप्प्यावर हुशार राजकारणी म्हणून पुढं येत राहिल्या. 

लीज ब्रिटनच्या पंतप्रधान बनल्या पण त्याचा भारताला काय फायदा होणार ? 

ऋषी सुनक यांच्याऐवजी लिज ट्रस पंतप्रधान बनणं हे भारतासाठी फायदेशीर ठरेल. बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने ब्रिक्झिटचा पर्याय स्वीकारत युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनला यूरोपच्या बाहेर आपला त्यांचे व्यापारी आणि इतर अर्थीक संबंध वाढवण्यासाठी एका मोठ्या अर्थव्यवस्थेची गरज होती आणि त्यासाठी ब्रिटनने भारताकडे मोर्चा वळवला. 

बोरिस जॉन्सन यांनी भारताला काही महिन्यनपूर्वी दिलेली भेट याचा योजनेचा भाग होता. हे सर्व नेगोशिएशेन्स चालू असताना परराष्ट्रमंत्री बोरिस यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री असलेल्या लिज यांचा मोठा वाट होता.

युक्रेन रशिया युद्धादरम्यान भारतावर युरोपियन देश रशियाकडून तेल घेऊ नये म्हणून दबाव टाकत असताना लिज ट्रस यांनी ब्रिटन भारतावर असा कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणार नसल्याचं म्हटलं होतं. 

शिवाय लीज यांनी मागेच असं विधान केलेलं की, भारतासोबतचे सुरक्षा संबंध मजबूत करण्याची यूकेकडे खरी संधी आहे. त्या म्हणालेल्या कि, भारत सध्या रशियन शस्त्रांवर 60% अवलंबून आहे परंतु साहजिकच भारत आता रशियाच्या, चीनबरोबरच्या धोरणात्मक संबंधांबद्दल पुर्नविचार करेल त्यामुळे यूकेकडे भारतासोबतच भागीदारी करण्याची खरी संधी आहे. म्हणजेच दोन्ही देशांमध्ये सुरक्षा संबंध मजबूत होईल. भारत आणि ब्रिटनसह इतर देशांनी चीनसारख्या हुकूमशाही राजवटींच्या कर्जात बुडू नये यासाठी यूकेने आणि भारताने एकत्र काम करावे अशी इच्छा लीज यांनी बोलून दाखवली होती.

सोबतच दोन्ही देशांमध्ये संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती इत्यादी सर्वच क्षेत्रातील व्यापार मजबूत होईल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं…म्हणूनच लीज यांचं ब्रिटनच्या पंतप्रधान बनणं भारतासाठी महत्वाचं आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.