मैदानावर सुरू झालेला ख्रिस केर्न्सचा स्ट्रगल मैदानाबाहेरही संपलेला नाही…

ख्रिस केर्न्स. धिप्पाड म्हणजे काय हे सांगणारी शरीरयष्टी. माजाचा लवलेशही नाही. अंगात ताकद इतकी की खडेखडे छकडे मारायचा. वेळ पडली की बॉलिंग करायचा, तेही फक्त विकेट्स काढण्यासाठीच. आयपीएलचा जन्म व्हायच्या आधी टेस्ट क्रिकेटमध्ये सिक्स फोरचा पाऊस पाडायचा. जे काही भारतीय नसलेले प्लेअर मनापासून आवडायचे त्यात केर्न्सचा नंबर लई वरचा होता.

मध्यंतरी त्याच्या हार्ट सर्जरीच्या बातम्या आल्या, त्याला पॅरालिसिस झाल्याचं समोर आलं, त्यातून कुठं गडी सावरत होता… तेवढ्यात समजलं की त्याला कॅन्सर झालाय आणि मनात एक विचित्र फिलिंग आली जी शब्दात व्यक्त करणं अवघड आहे.

केर्न्सचे वडील लान्स हे सुद्धा क्रिकेटर. ते न्यूझीलंडकडून खेळलेले. त्यामुळं खेळाचं येड केर्न्सला लहानपणीच लागलेलं. त्यानं एक एक टप्पा पार करत फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पुढं आंतरराष्ट्रीय संघातही स्थान मिळवलं. केर्न्सनं आपल्या डोळ्यांसमोर सर रिचर्ड हॅडलींचा आदर्श ठेवला होता आणि त्यांच्याप्रमाणंच त्याची वाटचालही अगदी तेजतर्रार सुरू होती.

बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्हीमध्ये हुकमी एक्का ठरणारा केर्न्स न्यूझीलंडला अगदी पद्धतशीर मॅचेस जिंकवून देत होता. त्याच्याकडे नेक्स्ट बिग थिंग म्हणून पाहिलं जात होतं, तशी गुणवत्ताही त्याच्याकडे होती. अडसर फक्त एकाच गोष्टीचा होता… ती म्हणजे फिटनेस.

कधी फिटनेसचं कारण, तर कधी अधिकाऱ्यांशी झालेले वाद यामुळं केर्न्सचं संघात आतबाहेर सुरू होतंच. त्यातच १९९५-९६ च्या दरम्यान केर्न्सचा मैदानाबाहेरचा स्ट्रगल आणखी वाढला, त्याच्या बहिणीचं रेल्वे अपघातात निधन झालं. दुखापतींमुळे शरीर साथ देत नव्हतंच पण सोबतच आता, मानसिक ताणही वाढला. दुसऱ्या बाजूला क्रिकेटमध्ये स्पर्धा वाढत होती, नवे खेळाडू अधिक चांगली कामगिरी करत होते.

तरीसुद्धा केर्न्सला संघात स्थान मिळालं, यामागचं कारण होतं… तो फक्त काही ओव्हर्स खेळला तरी असा खेळायचा की मॅचचा निकालच बदलून टाकायचा. इंग्लिशमध्ये ‘visual treat’ म्हणता येईल अशी त्याची बॅटिंग असायची.

त्याला संघात ठेवण्याचं कारण सगळ्या जगानं ऑक्टोबर २००० मध्ये पाहिलं. केनियामध्ये आयसीसी नॉकआऊट ट्रॉफीची फायनल होती. भारत विरुद्ध न्यूझीलंड. मॅच फिक्सिंगच्या आरोपांमधून डोकं वर काढायला बघणाऱ्या भारतासाठी तो विजय गरजेचा होता. पण केर्न्स मैदानावर आला आणि नॉटआऊट १०२ रन्स मारत भारताचं विजेतेपदाचं स्वप्न किरकोळीत मोडलं आणि न्यूझीलंडनं पहिलीवहिली आयसीसी ट्रॉफी जिंकली. 

सईद अन्वर, रिकी पॉन्टिंग, ऍलीस्टर कुक यांच्याप्रमाणेच केर्न्स भारताविरुद्ध खेळायचा म्हणजे खेळायचा.

केर्न्सनं २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला, त्यानंतर तो आयसीएलमध्ये खेळला, टीमचा कॅप्टनही बनला आणि त्याची आयपीएल खेळण्याची स्वप्नं धुळीस मिळाली. जिथं केर्न्स सुपरस्टार झाला असता, त्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधीच त्याला मिळाली नाही.

त्यात मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी त्याच्या आयुष्याला हादरा दिला. कोर्टकचेरी, खटले सुरू झाले, त्यात लई पैसे गेले. सगळ्या आरोपांमधून तो निर्दोष सुटला… पण हातात ना उमेदीची वर्ष उरली ना खेळायची ताकद.

मध्यंतरी बातमी आली की, केर्न्सच्या हृदयाच्या चार सर्जरीज झाल्या. ऑपरेशन टेबलवर असताना त्याला पॅरालिसिसचा झटका आला. त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं. कित्येकांनी श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहिल्या खऱ्या… पण अनेकदा मैदानात कमबॅक केलं तसंच त्यानं आयुष्यातही केलं. त्याचा वॉकरला धरुन चालतानाचा फोटो आला आणि हायसं वाटलं. यातून कुठं सगळं निवांत वाटत होतं, तेवढ्यात समजलं की केर्न्सला कॅन्सर झालाय… थोडक्यात काय, तर केर्न्सच्या आयुष्यात आता नवा स्ट्रगल सुरू झालाय…

पण गडी खमकाय… यातून पण बाहेर येईल… शंभर टक्के!!

हे ही वाच भिडू:

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.