वर्ल्डकप हरल्यावरही हसणारा संगकारा, नाईन्टीजच्या पोरांचा लाडका प्लेअर होता

तारीख- २ एप्रिल २०११. वेळ- रात्रीची. ठिकाण- वानखेडे स्टेडियम, मुंबई. आता तुम्ही क्रिकेट पाहत असाल, तर या दिवशी काय झालं हे तुम्हाला वेगळं सांगायला नकोच. महेंद्रसिंह धोनीनं नुवान कुलसेकराला छकडा हाणला आणि भारतानं वर्ल्डकप जिंकला.

नॉन स्ट्राईकला उभ्या असणाऱ्या युवराजनं धोनीला पळत जाऊन मिठी मारली आणि असंख्य कॅमेऱ्यांनी हा क्षण टिपला. हातात बॅट आणि स्टम्प असलेला हसरा धोनी, १२ नंबरची जर्सी घालून घट्ट मिठी मारणारा युवराज या दोघांपेक्षाही जास्त लक्ष वेधून घेत होता कुमार संगकारा.

वर्ल्डकप २०११
हरल्यावर पण हसता येत असतंय भिडू

श्रीलंकेचा कॅप्टन आणि विकेटकिपर असणाऱ्या संगकाऱ्याच्या चेहऱ्यावर वर्ल्डकप हरूनही हसू होतं. ते हसू ना आनंदाचं होतं, ना समाधानाचं, पण खिलाडूवृत्ती जपणारं होतं एवढं नक्की.

कुमार संगकारा म्हणजेच संगा. मुख्य काम विकेटकिपींग पण ओपनिंग, तीन नंबर किंवा मिडल ऑर्डर असं कुठंही खेळवलं, तरी संगा चालणार म्हणजे चालणार. बरं एवढा भारी बॅट्समन पण कधी माज नाही, का कधी मैदानावर राडा नाही. एकदम शांतीत क्रांती.

आपला धोनी, आफ्रिकेचा बाऊचर, ऑस्ट्रेलियाचा गिलख्रिस्ट हे कसे धीरगंभीर विकेटकिपर होते. गिलख्रिस्ट तरी बॅट्समनला स्लेज करायचा, पण उरलेले दोघं हसले तरी खूप. संगा स्लेज करायचा पण निवांतमध्ये आणि त्याची विकेटकिपींग लई फास्ट नसली तरी डोकेबाज होती.

एक किस्सा सांगतो, आपल्या सेहवागचा. आता टुचुक करून सिंगल काढणं हा काय सेहवागचा गेम नाय, तो पडला हाणामारी स्पेशालिस्ट. पण कसं असतंय टीमची सुद्धा गरज असते. तर सेहवाग काय करायचा, एक रन पळायचाय म्हणल्यावर रमतगमत पळायचा. संगानं हे बघून ठेवलेलं. असंच एकदा सेहवाग हळू पळायला लागला, बॉल संगाकडं आला, त्यानं ग्लोव्ह काढला आणि वरच्या स्टम्पमागून परफेक्ट खालचा स्टम्प उडवला. शार्प माईंड एकदम.

संगा आवडायचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे २०१४ चा टी२० वर्ल्डकप. आता तुम्ही म्हणाल, भिडू भारताला हरवून श्रीलंका जिंकली होती. पण कसंय आपण जिंकल्यावर ते हसले, म्हणल्यावर आपण जरा खिलाडूवृत्ती दाखवूयात की. श्रीलंकेनं २००७ चा वनडे वर्ल्डकप, २००९ चा टी २० वर्ल्डकप, २०११ चा वनडे वर्ल्डकप, २०१२ चा टी२० वर्ल्डकप असे चार वर्ल्डकप फायनलमध्ये जाऊन गमावले.

चोकर्स, कायमस्वरूपी उपविजेते असा शिक्का त्यांच्यावर बसला होता. त्यातून संगा, जयवर्धने आणि मलिंगानं त्यांना बाहेर काढलं. २०१४ चा वर्ल्डकप हा संगा आणि जयवर्धनेचा अखेरचा टी२० वर्ल्डकप. त्यांनी टीम बांधून तर ठेवलीच, पण विजेतेपदापर्यंत नेली. सतत फायनल हारणाऱ्या लंकेनं राडा परफॉर्मन्स देत फॉर्मात असलेल्या भारताला हरवून दाखवलं. संगकारानं थाटात टी२० क्रिकेटला अलविदा केला.

आज संगाच्या नावापुढं रेकॉर्ड्स आहेत, विजेतेपदं आहेत. प्रतिष्ठित मेरीलिबोन क्रिकेटचा तो अध्यक्षही होता. खेळायचा तेव्हा दिसायचाही हिरोसारखाच. आता केस आणि दाढी पांढरी झालिये पण चेहऱ्यावरचं हसू मात्र आजही तसंच आहे.

आणि हा आणखीन एक. संगाचा विषय माहेला जयवर्धनेचं नाव घेतल्याशिवाय अपूर्णच राहील. ऑनफिल्ड असेल किंवा ऑफफिल्ड, संगकाराची सगळ्यात मोठी कमाई म्हणजे जयवर्धनेसारखा मित्र. या जोडीनं लंकेचं क्रिकेट उभं केलं आणि थाटात पुढं नेलं.

सचिनसारखा स्ट्रेट ड्राईव्ह, आशिष नेहराचं सेलिब्रेशन, मलिंगा-इरफानसारखी ॲक्शन अशा कित्येक गोष्टी नाईन्टीजची पोरं आयुष्यात विसरत नसतात. कित्येक खेळाडूंच्या कित्येक गोष्टी लक्षात राहिल्या, संगकारा मात्र माणूसच लाडका होता. एकदम जंटलमन!

हे ही वाच भिडू:

1 Comment
  1. wajid sayyad says

    Sangharsh is best srilankan player

Leave A Reply

Your email address will not be published.