‘क्रॉसवर्ड’ मधून तुम्हाला कोणी ‘बाहेर जा’ म्हणून सांगत नाही, हेच त्यांच मार्केटिंग आहे…

पुस्तकांच्या दुकानात एकदा गेलं की तिथून लवकर निघू वाटत नाय. तुमच्या बाबतीत असं होतं का? लय वेळा लय दुकानात “ही लायब्ररी नाही” असं सांगणारा, दुकानाच्या मालकाचा लुक किंवा डायलॉग आपल्या पर्यंत येतोच येतो, पण तरीपण आपल्याला तिथून निघू वाटत नाय.

लायब्ररी थांबायची मुभा देते पण पुस्तकं तिथं विकत घेता येत नाहीत आणि दुकानात हवं ते पुस्तक निवडायला तिथले दुकानदार पुरेल एवढा वेळ देत नाहीत.

पण भिडूनो, भारतातल्या एका नावाजलेल्या पुस्तकाच्या दुकानात मात्र असं नाहीये. या दुकानात तुम्ही हवं तितका वेळ तुमचं लाडकं पुस्तक घेऊन निवांत बसू शकता आणि पुस्तकाची ट्रीप मस्त एंजॉय करू शकता. तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायलाही येत नाही किंवा कोणी लूक्सही येत नाही.

आणि ह्या पुस्तकांच्या दुकानाचं नाव आहे ‘क्रॉसवर्ड’.

आता दुकानाचं नाव आणि दुकानाचा लूक बघून तुम्हाला हा ब्रॅंड भारतातला नाही असं फिक्स वाटू शकतं, पण हा ब्रॅंड अस्सल भारतीय आहे.

क्रॉसवर्ड बूकस्टोअर चेन ही भारतातली सगळ्यात मोठी बूकस्टोअर चेन आहे. मुंबई, भोपाळ, पुणे, नागपूर नाशिक, चेन्नई, दिल्ली, उदयपूर, नवी मुंबई, ठाणे, लखनऊ, बंगलोर, गोवा, इंदोर, हैदराबाद, जयपूर, कोलकत्ता, आणि कुठे नाही, अशा भारतातल्या प्रत्येक शहरात ठीकठिकाणी आपल्याला क्रॉसवर्ड बूकस्टोअर दिसतंच दिसतं.

क्रॉसवर्डची स्थापना चेन्नई मधल्या आर. श्रीराम आणि के. अनीता यांनी १९९२ साली केली. ते आधी हैदराबाद मधल्या एका पुस्तकांच्या दुकानातच काम करत होते. लोकांना दुकानाच्या पुस्ताकात आल्यावर काय आवडतं काय नाही, लोकं दुकानात किती वेळ रेंगाळतात, एकूण किती पुस्तकं चाळतात आणि त्यातली किती विकत घेतात, या सगळ्याचा अभ्यास आर. श्रीराम यांना, त्या हैदराबादच्या दुकानात म्हणजेच जिथे ते कामाला होते तिथे करता आला.

लोकांना पुस्तकाच्या दुकानात आल्यावर बेस्ट कस्टमर सर्व्हिस मिळायला हवी असा त्यांचा कायम प्रयत्न असे.

हैदराबादच्या दुकानात पुरेसा अनुभव मिळाल्यानंतर आर. श्रीराम ह्यांनी मुंबईच्या केम्प्स कोर्नर या एरियात पहिलं क्रॉसवर्डचं दुकान १५ ऑगस्ट १९९२ साली सुरू केलं.

त्यांच्या असं लक्षात आलं की, ग्राहक दुकानात आला आणि त्याने झटकन एखादं पुस्तक खरेदी केलं असं कधी होत नाही. खरा गेम असतो तो ग्राहक, पुस्तक खरेदी करेपर्यंत. पुस्तक शोधून, ते चाळून, होतं त्या जागेवर परत ठेऊन दुसरं पुस्तक हातात घेताना, त्या दरम्यान ग्राहकाला त्याचा वेळ आणि त्याची स्पेस देणं महत्वाचं असतं हे श्रीराम यांच्या लक्षात आलेलं.

ABH01291 621x414 1

मग, ग्राहकाने पुस्तक खरेदी करण्यापर्यंतचा त्याचा त्या दुकानात रेंगाळण्याचा वेळ कसा अधिक सुखकर होईल यावर आर. श्रीराम यांनी काम करायला सुरवात केली. पुस्तकांच्या योग्य प्लेसमेंट्स, दुकानातला माहोल, दुकानात जागोजागी बसण्याची सोय, पुस्तक शोधताना किंवा निवडताना ग्राहकाला कमीत कमी कष्ट करावे लागतील असे पर्याय, दुकानात साहित्याविषयी माहिती सांगणारे छोटे छोटे उपक्रम राबावणं किंवा पुस्तकांच्या लेखकांशी डायरेक्ट संवाद साधता येणं अशा अनेक गोष्टी आर. श्रीराम यांनी ट्राय करून पाहिल्या आणि त्यांचे बरेचसे प्रयत्न यशस्वी सुद्धा ठरले.

हळू हळू करत लोकांना या दुकानात येणं आणि तिथे हवं तितका वेळ थांबणं आवडायला लागलं. पुस्तक खरेदी करणं या पेक्षा सुद्धा लोकं इथे एक छान अनुभव घ्यायचा म्हणून येऊ लागली. क्रॉसवर्ड दुकानाचं नाव दिवसेंदिवस मोठं व्हायला सुरवात झाली आणि क्रॉसवर्ड ही भारतातली, पुस्तकांच्या दुकानांची सगळ्यात मोठी साखळी बनली.

आता या दुकानाला ‘क्रॉसवर्ड’ हे नाव कसं पडलं?  

तर क्रॉसवर्ड हा एक कोड्याचा प्रकार आहे. आपण कोडी सोडवताना कसं पूर्ण लक्ष देऊन पण तरी फूल मजा घेत कोडी सोडवतो, तोच ह्या दुकानाचं नाव ‘क्रॉसवर्ड’ ठेवण्यामागचा उद्देश होता.

आता दुकान टाकलं आणि लगेचच लोकं दुकानात यायला लागली असं तर झालं नाही. त्यांना लई लडतरी कराव्या लागल्या. मुळात मुंबईत सुरू झालेलं पहिलं दुकान नजरेत येण्यासारख्या ठिकाणी नव्हतं, त्यामुळे लोकांना दुकानापर्यंत घेऊन येण्यासाठी त्यांनी काही प्रयोग केले. आणि त्यात एक प्रयोग यशस्वी झाला तो म्हणजे लहान पोरांसाठी पुस्तकांचं एक वेगळं सेक्शन सुरू करण्याचा.

क्रॉसवर्ड बूकस्टोअरच्या आधी लहान मुलांसाठी वेगळं पुस्तकांचं सेक्शन कोणत्याच दुकानात सुरू करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरणाराच होता. आणि या प्रयोगामुळे पुस्तकांचा खप २५ ते ३० टक्क्यांनी वाढला.

शिवाय त्यांनी अजून एक शक्कल लढवली, ती म्हणजे, लहान पोरांच्या पुस्ताकांचं सेक्शन त्यांनी दुकानाच्या सगळ्यात शेवटच्या भागात ठेवलं. यामुळे काय झालं, तर मुलांना दुकानात घेऊन येणाऱ्या आई वडिलांचंही दुकान आपोआपच अख्खं फिरून होई.

ह्या सगळ्या लडतरींमध्ये क्रॉसवर्डने अजून एक लय भारी गोष्ट केलेली. ती म्हणजे, जर पुस्तक विकत घेतल्यानंतर, ते वाचून झाल्यानंतर तुम्हाला ते आवडलं नाही किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आहे तसं परत करावंसं वाटलं तर तुम्ही ते परतही करू शकता.. तेही फूल रिफंड घेऊन. आणि या गोष्टीमुळे तर क्रॉसवर्ड बूक स्टोअरची मार्केटमध्ये अजूनच हवा झाली.

काळाप्रमाणे बदलत, योग्य अपडेट्स ठेवत आणि ग्राहकांना अजून अजून चांगला अनुभव मिळावा यासाठी आता या बूक स्टोअरने, बूकस्टोअरमध्येच ग्राहकांसाठी कॉफी स्नॅक्स आणि रेस्ट रूम्स सुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय फक्त पुस्तकच नाही तर या बूकस्टोअर्स मध्ये इतर स्टेशनरी, टी शर्ट्स, डायऱ्या, वॉलेट्स अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. आणि याही गोष्टींचं लोकांना भारी अॅट्रॅक्शन असतं. 

एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की, ‘क्रॉसवर्ड’ बूकस्टोअर हे आता फक्त पुस्तकाच्या दुकानापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये तर एक मोठा लय मोठा ‘ब्रॅंड’ झालंय.

हे ही वाच भिडू: 

Leave A Reply

Your email address will not be published.