साडेतीनशे वर्षांपासून पूर्व विदर्भात पाणीपुरवठा होतो त्यामागे गोंड राजांची दूरदृष्टी आहे..

आपण शाळेमध्ये असतांना वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या नावांसमोर त्या जिल्ह्याची विशिष्ट ओळख जोडायचो. त्यातीलच एक तलावांचा जिल्हा भंडारा. राज्यात झालेल्या मुसळधार पावसांनंतर भंडाऱ्यासह पूर्व विदर्भात एकाच वाक्य बोललं जातंय..

बाप्पा..!! काहो तो पाणी आला.. एका दिसात तळ्याचा सलंग निघला.. 

सध्या पूर्व विदर्भातील अनेक गावांमध्ये हे वाक्य ऐकू येईल. भरपूर पाऊस झाल्यावर तलाव तुडुंब भरलं आणि तलावाचा सांडवा वाहू लागला कि तळ्याचा सलग निघाला असं म्हटलं जातं. सध्या पूर्व विदर्भातील सर्वच तळ्यांचा सलंग निघालाय.

परंतु आज तुडुंब भरलेल्या या शेकडो तलावांमागे बराच मोठा इतिहास आहे. हा इतिहास आहे गोंड राज्यांच्या दूरदृष्टीचा, ब्रिटिश काळातल्या मालगुजारीचा आणि कोर्टात चाललेल्या खटल्याचा..

नागपूरचा शुक्रवारी, चंद्रपूरचा रामाळा आणि गडचिरोलीचा रामसागर तलाव..

कधी नागपूरला गेल्या तर जुन्या नागपूरमध्ये गांधी सागर हा मोठा आयताकृती तलाव दिसेल. चंद्रपूरला अगदी परकोटाच्या बाजूला रामाळा तलाव आहे, भंडाऱ्याच्या मधोमध खाम तलाव आहे तर गडचिरोली शहरात भलामोठा रामसागर तलाव आहे.

परंतु ही शहरंच नाही तर या पाच जिल्ह्यातील अनेक गावं सुद्धा तळ्यांच्या शेजारी वसलेली आहेत. यातील बरेचसे तलाव आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असले तरी, गावात असलेले हे तलाव वर्षानुवर्षे पूर्व विदर्भातील शेतीला आणि लोकांना पाणी पुरवत आहेत. 

तलावांची निर्मिती करणारे गोंड राजे.. 

चंद्रपूर, शिरपूर, दंतेवाडा, कांकेर, गढ मांडला, जबलपूर, अंबागढ, या सगळ्या गोंडवनावर गोंड राजांचे दीर्घकाळ शासन राहिले आहे. 

इ. स. १२०० मध्ये राजा भीम बल्लाळ सिंग यांनी शिरपूर राजगादीची स्थापना केली होती. त्यांच्यापासून चंद्रपूरचे शेवटचे राजे नीलकंठ शहा यांच्यापर्यंत आत्राम राजघराण्याने पूर्व विदर्भावर शासन केले होते. तसेच अंबागड-नागपूर गादीच्या शहा घराण्याने सुद्धा नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांवर राज्य केले होते. 

दीर्घकाळ चालेल्या शासनकाळात गोंड राजांनी आपल्या राज्यातील प्रत्येक गावात तलाव बांधण्याचा संकल्प केला होता. आणि या संकल्पातूनच पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात शेकडो तलावांची निर्मिती केली होती. 

गोंड राजांची संकल्पना ‘गाव तिथे तलाव’

साडेपाचशे वर्षांच्या काळात अनेक राजांनी आपापल्या परीने तलावांची निर्मिती केली होती. यात अनेक राजांनी प्रत्येक गावात तलाव बांधले जावे यासाठी काम केले होते. त्याच्यातुनच अनेक गावांमध्ये तलावांचे बांधकाम करण्यात आले होते. 

राजा बिरशाह आत्राम यांच्या मृत्युनंतर राणी हिराईने पंधरा वर्ष चंद्रपुरवर राज्य केले होते. प्रजावत्सल राणी हिराईने आपल्या शासनकाळात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अनेक तळ्यांची निर्मिती करून शेतीला पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था केली होती. 

तर अंबागढच्या राजांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तलावांची निर्मिती करून भंडारा जिल्ह्यातील काळ्या कसदार मातीला भाताच्या शेतीने संपन्न केले होते. सध्या अस्तित्वात असलेले तलाव प्रामुख्याने अडीचशे ते साडेतीनशे वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते. 

 

तलावाच्या निर्मितीमागे सुद्धा बरेच नियोजन होते..

साधारण उंचवटा असलेल्या जागेवरून वाहत असलेल्या या ओढ्यांवर मातीची पाळ घालून तलाव बांधला जायचा. ओढ्याच्या सुरुवातीच्या भागात तलाव बांधले असल्यामुळे तलावात गरजेपेक्षा जास्त पाणी साठत नव्हते. तलाव बांधतानाच मर्यादेपेक्षा जास्त पाणी साठणार नाही याची दक्षता घेतली जायची. 

तसेच यातून अधिकचे पाणी बाहेर पाडण्यासाठी सांडवे तयार करण्यात आले होते. त्यामुळे हे तलाव आजही टिकून आहेत. या तलावांमधून दोन लहान पाट काढून खालच्या उतार भागात भाताची शेती केली जायची तर तलावाच्या वरील कोरडवाहू भागात ज्वारीची शेती केली जायची. 

तलाव बांधण्याची माथा ते पायथा पद्धत.. 

तलाव बांधण्याच्या पहिल्या पद्धतीसोबतच आणखी एका पद्धतीनुसार तलाव निर्माण केले जायचे. पाण्याचा प्रवाह कंट्रोल केला जाऊ शकेल अशा जागी उतारानुसार माथा ते पायथा अशा पद्धतीने तलावांची निर्मिती केली जायची.

ओढ्याच्या सुरुवातीला पहिला तलाव, त्यांनतर दुसरा तलाव आणि त्यांनतर तिसरा तलाव बांधला जायचा.एखाद्या उतारावर किती तलाव बांधायचे ते वाहणाऱ्या ओढ्याच्या प्रवाहावर ठरवले जायचे. यात एकाच ओढ्यावर एकापाठोपाठ एक ७ तळे सुद्धा  बांधलेले दिसून येतात.

गोंड राजे गेले, मराठे गेले आणि मालगुजार आले..

रघुजी भोसले नागपूरला आल्यानंतर अनेक गोंडराजे नाममात्र प्रमुख राहिले होते. नागपूरकर भोसल्यांनी विदर्भ, छत्तीसगढ, आणि नर्मदेच्या दक्षिणेच्या मध्य प्रदेशावर राज्य केले होते. त्यांनतर १८१६ मध्ये रघुजी भोसले द्वितीय यांचा मृत्यू झाला आणि १८५४ मध्ये नागपूर संस्थान खालसा झाले.

नागपूर संस्थानाला खालसा केल्यानंतर ब्रिटिशांनी पूर्व विदर्भात जमीनदारी  म्हणजेच मालगुजारी पद्धत अस्तित्वात आणली. मालगुजारी पद्धतीत इंग्रजांकडून गावांचा लिलाव केला जायचा आणि यात श्रीमंत व्यक्ती गावांना खरेदी करून आणि गावातून महसूल गोळा करत होते.

मालगुजारी पद्धत लागू झाल्यांनतर हे तलाव मालगुजारांच्या ताब्यात गेले. ब्रिटिश राजवटीत अनेक मालगुजारांनी सुद्धा नव्याने तलावांची निर्मिती करून यात नवीन तलावांची भर घातली होती.

भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तलावांच्या मालकीची केस कोर्टात गेली..

ब्रिटिश राजवटीत चालत असेलली मालगुजारी पद्धत १९५० मध्ये बंद करण्यात आली. १९५० च्या संपत्ती हक्क कायद्यानुसार या तलावांची मालकी राज्य शासनाकडे गेली. राज्य सरकारने हे तलाव ताब्यात घेऊन यावर कर लावल्यामुळे मालगुजारांनी याची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

त्यांनतर निस्तार अधिकारानुसार पाणी वापराचे हक्क शेतकऱ्यांना मिळाले. सोबतच तलावावर मासेमारी करण्याचे अधिकार परंपरागत मासेमारी करणाऱ्या भोई आणि ढिवर समाजाला मिळाले होते. 

१९६३ मध्ये राज्य शासनाने पाणीवाटपाचा बर्वे आयोग नेमला होता. त्यामुळे यातील पाणीवाटपावर सरकारने कर लावले होते. सरकारच्या या निर्णयाला लोकांनी विरोध केला होता. मात्र याकडे सरकारने दुर्लक्ष केले आणि तलावांची दुरवस्था व्हायला लागली.

या तलावांची मालकी मागुजारांच्या हातून शासनाकडे गेली त्यामुळे या तलावांना माजी मालगुजारी म्हणजेच मामा तलाव असे नाव मिळाले.  

मामा तलाव सव्वा लाख हेक्टर जमिनीला पाणी पुरवतात..

पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात एकूण ६८८२ मामा तलाव आहेत. या तलावांमुळे जवळपास सव्वा लाख हेक्टर जमीन म्हणजेच ३ लाख १५ हजार एकर जमिनीला पाणीपुरवठा केला जातो.

या जिल्ह्यांमध्ये आघाडीवर आहेत गोंदिया आणि चंद्रपूर..

सर्वाधिक तलाव गोंदिया जिल्ह्यात आहेत. गोंदिया जिल्ह्यातील १७८६ तलाव ३५ हजार १७४ हेक्टर जमिनीला पाणीपुरवठा करतात. सोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील १७२९ तलावांमधून ३८ हजार ६०५ हेक्टर जमिनीला पाणीपुरवठा केला जातो. 

गडचिरोली जिल्ह्यातील १६६९ तलावांमधून २४ हजार ४४० हेक्टर जमिनीला पाणीपुरवठा करतात. भंडारा जिल्ह्यातील १४६२ तलावांमधून २१ हजार ६८१ हेक्टर जमिनीला पाणीपुरवठा करतात तर नागपूर जिल्ह्यातील २१६ तलाव ६०८५ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाची सुविधा पुरवतात. 

लोकसहभागातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर तलावाची निर्मिती करण्याचे हे दुर्लभ उदाहरण आहे. गोंड राजांनी बांधलेल्या आणि मालगुजारी काळात त्यात भर घालून संरक्षण करण्यात आलेले तलाव आजही पूर्व विदर्भातील भाताच्या शेतीला पाणीपुरवठा करत आहेत. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.