देश संकटात असताना गोटाबाया राजपाक्षेंसारखंच हे राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळाले होते

श्रीलंकेत आलेल्या आर्थिक संकटानंतर अन्नधान्य, औषध, इंधन या जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याने आणि महागाईने त्रासलेल्या नागरिकांनी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपाक्षेंच्या विरुद्ध आंदोलन सुरु केलंय.. नागरिकांनी सुरु केलेल्या या आंदोलनामुळे गोटाबाया राजपाक्षेंनी देश सोडून मालदीवमध्ये पळ काढला आहे..

परंतु राष्ट्राध्यक्षांविरुद्ध सुरु झालेल्या विद्रोहानंतर देश सोडून पळ काढणारे गोटाबाया राजपाक्षे हे काही पहिलेच राष्ट्राध्यक्ष नाहीत. श्रीलंकेच्या गोटाबाया राजपाक्षेंच्या आधी सुद्धा अनेक राष्ट्राध्यक्षांनी देश सोडून दुसऱ्या देशात पळ काढला आहे. 

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी.. 

अफगाणिस्तान हा गेल्या वर्षात जगभर चर्चा झालेला देश होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  अमेरिकेचे सैनिक अफगाणिस्तानातून माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडनने हा निर्णय कायम ठेवून अमेरिकेच्या सैनिकांनी माघारी बोलवायला सुरुवात केली.

अमेरिकेच्या सैनिकांनी अफगाणिस्तान सोडायला सुरुवात केली केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानला त्यांच्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती. अफगाणिस्तानच्या ३४ प्रांतांपैकी १८ प्रांतांवर तालिबानने कब्जा केला होता.

तालिबान काबूलवर कब्जा करेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती..

या १८ प्रांतांवर तालिबानने कब्जा करतांना अफगाणी सैनिकांनी सुद्धा तालिबानचं समर्थन करायला सुरुवात केली. त्यामुळे तालिबान लवकरच काबुलवर सुद्धा कब्जा करेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

त्याचदरम्यान संपूर्ण भारतात १५ ऑगस्ट रोजी देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होत असतांना अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी अफगाणिस्तान सोडून अमेरिकेत चालले गेले. 

अशरफ घनी आणि त्यांचे सहकारी देश सोडतांना चार महागड्या कार आणि लाखो डॉलरची कॅश घेऊन गेले अशी बातमी आली होती. मात्र नंतर ही बातमी खोटी असू शकते असे सांगण्यात आले होते. 

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच.. 

युक्रेन आणि रशियामध्ये सध्या युद्ध चालू आहे. परंतु हे युद्ध होण्याला दोन प्रमुख करणे आहेत. यातील पहिलं कारण म्हणजे युक्रेनने युरोपियन युनियनचा सदस्य होण्यासाठी केलेले प्रयत्न आणि दुसरं कारण म्हणजे नाटो मध्ये सहभागी होण्याचा करार करण्याचे प्रयत्न..

२०१४ मध्ये व्हिक्टर यानुकोविच हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष होते. यानुकोविच राष्ट्राध्यक्ष असतांना युक्रेनने युरोपियन युनिअनचा सदस्य होण्यासाठी करार करावा अशी मागणी युक्रेनच्या नागरिकांनी केली होती.

लोकांची मागणी युरोपियन युनियनची आणि राष्ट्राध्यक्ष रशियाच्या बाजूने..

राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच हे रशियाच्या बाजूने होते. रशिया आणि युरोपियन युनिअन हे जागतिक राजकारणातील दोन टोकाचे ध्रुव असल्यामुळे, युक्रेन युरोपियन युनियनचा सदस्य व्हावा अशी रशियाची इच्छा नव्हती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी यानुकोविच यांना हा करार करण्यापासून रोखले.

व्हिक्टर यानुकोविच यांनी हा करार न केल्यामुळे युक्रेनच्या नागरिकांनी देशभर त्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाला समाप्त करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांनी एक करार केला. परंतु हा करार यशस्वी होईल कि नाही यावर विश्वास नसल्याने राष्ट्राध्यक्ष यानुकोविच यांनी देशातून पळ काढला आणि रशियाला गेले.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांना युक्रेनची राजधानी किंव मधून रशियात नेण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे सल्लागार व्लादिमिर लुकीन यांनी मदत केली होती. 

युगांडाचे राष्ट्राध्यक्ष ईदी अमीन..

ईदी अमीन हे मुळात लष्करी अधिकारी होते. युगांडा ही ब्रिटिशांची वसाहत असतांना ईदी अमीन ब्रिटिश लष्करात भरती झाले होते. १९६२ मध्ये युगांडा ब्रिटिश साम्राज्यातून स्वतंत्र झाला आणि देशात राष्ट्रपतींच्या हातात सत्ता आली.

युगांडाचे फिल्ड मार्शल असलेल्या ईदी अमिनने सरकारविरुद्ध मिलिटरी कु केला. या मिलिटरी कु मध्ये ईदी अमीनने देशाचे दुसरे राष्ट्रपती मिल्टन ओबोटे यांची सत्ता उलथवून टाकली आणि स्वतःला राष्ट्रपती घोषित केलं.

आणि ईदी अमीन युगांडाचा हुकूमशहा झाला..

मिल्टन ओबोटे यांची सत्ता उलथवून लावल्यांनंतर ईदी अमीनने आठ वर्षे युगांडावर राज्य केलं होतं. त्याच्या सत्ता काळात अमीनने देशातील जनतेवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले. त्याच्यावर मानवाधिकाराचं उल्लंघन, भ्रष्टाचार, बेकायदेशीर हत्या, राजकीय दडपशाही, वांशिक अत्याचार आणि युगांडाची अर्थव्यवस्था उध्वस्त केल्याचे आरोप केले जातात.

युगांडातील विद्रोही आणि टांझानियाच्या सैनिकांनी आघाडी केली.. 

आधीच जनतेत अमिनबद्दल राग होता, त्यात अमिनने शेजारील टांझानिया देशाच्या कंगोरा प्रांतावर आक्रमण करून त्याला जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. अमिनच्या कंगोरा प्रांतावर आक्रमण केल्यामुळे, टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष ज्युलिअस नेरेरे यांनी टांझानियाच्या सैनिकांना अमिनचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले.

युगांडात अमिनच्या विरोधात लढणारे विद्रोही आणि टांझानियाच्या सैनिकांनी आघाडी करून युगांडाची  राजधानी कंपाला शहरावर हल्ला केला. त्यामुळे ईदी अमीनला देश सोडून पळ काढावा लागला..

ईदी अमीन देश सोडून पहिल्यांदा लिबियाला गेला, त्यांनतर इराक आणि नंतर सौदी अरेबियात गेला. ईदी अमीनच्या राजवटीत जवळपास ४ लाख लोकं मारले गेले होते..

देशातील आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील नागरिकांच्या विरोधामुळे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपाक्षे देश सोडून पळाले आहेत. यापूर्वीसुद्धा अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच आणि युगांडाचे हुकूमशहा ईदी अमीन यांना सुद्धा देशातील नागरिकांमुळे देश सोडून पळावं लागलं होतं..

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.