गोटाबाया राजपक्षे यांच्यासमोर दोन पर्याय होते, ‘भारत आणि मालदीव’ ; त्यांनी मालदीव का निवडलं?

श्रीलंकेत सुरु असलेल्या गोंधळात भर पडली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आज १३ जुलैला पदाचा राजीनामा देणार हे ठरलं होतं. त्यानुसार सगळे वाट बघून होते. मात्र दिवस उजाडला आणि तितक्यात बातमी मिळाली

‘राष्ट्रपती राजपक्षे देश सोडून पळून गेले आहेत. रात्रीच हा प्रकार घडला आहे.’

बस्स…  जशी ही माहिती मिळाली श्रीलंकेचे नागरिक तापून उठले.

हजारोंच्या संख्येने निदर्शक कोलंबोच्या रस्त्यावर उतरले आहेत आणि राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्रतेने केली जातीये. तर या घडामोडीनंतर श्रीलंका सरकारने आणीबाणी जाहीर केली आहे, असं एएफपी या वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे. हे वृत्त त्यांनी पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या कार्यालयातील सूत्रांच्या माहितीनुसार दिल्याचंही स्पष्ट केलं आहे. 

देशाला अतिशय खराब अवस्थेत सोडून राष्ट्रपती गोटाबाया देश सोडून पळून गेले आहेत. श्रीलंका सोडून ते ‘मालदीव’मध्ये गेले असल्याची माहिती मिळत आहे. म्हणून त्यांनी मालदीव का निवडलं? हा प्रश्न पडतो. 

गोटाबाया यांनी देशाच्या बाहेर जाण्याचा विचार केला तेव्हा सुमडीत निघणं गरजेचं होतं, हे तर स्पष्टच आहे. अचानक कुणालाही कळू न देता देशाच्या बाहेर पडायचं असेल तर अशा स्थितीत पहिल्या टप्य्यात जवळचा देश निवडणं हाच एकमेव पर्याय असतो. 

श्रीलंकेचा नकाशा बघितला तर समजतं भारत आणि मालदीव हे दोनच देश त्यांच्या जवळ आहेत. म्हणजे दोनच पर्याय. 

भारताबद्दल सांगायचं तर भारताने आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं आहे की, 

‘भारत श्रीलंकेच्या ‘नागरिकांच्या’ सोबत आहे. आमची वचनबद्धता, आमचा पाठिंबा श्रीलंकेच्या जनतेला आहे. त्यांना काही मदत लागली तर भारत तत्पर आहे.’ 

भारताने गेल्या काही महिन्यांमध्ये श्रीलंकेला जी मदत पुरवली आहे ती भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. 

भारताची ही भूमिका बघता भारत श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षाला असं पळून जाण्यासाठी मदत करण्याची रिस्क घेणार नाही. कारण एकतर याने भारतावर भूमिका बदलाचा ठप्पा लागेल. श्रीलंकेच्या नागरिकांनी आक्षेप घेत जर भारताविरुद्ध आंदोलन केलं, भारताला प्रश्न विचारले तर उत्तर नसणार. 

दुसरं म्हणजे याने भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा धुळीत मिळू शकते. लोकसंख्येच्या बाबतीत मोठा असलेला देश भारत आणि आंतरराष्ट्रीय देशांच्या बैठकीत चांगली प्रतिमा असलेल्या भारतावर जर इतर देशांनी यामुळे आक्षेप घेतला तर भारताला मोठा डॅमेज होऊ शकतो. 

तेव्हा भारताची ही भूमिका लक्षात घेता भारत मदत करेल हा पर्यायच गोटाबाया यांच्यासाठी बंद होतो.

आता उरतो मालदीव…

मालदीवबद्दल बघितलं तर या देशाने भारतासारखी कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये. म्हणून मालदीव सरकारने मदत केली हे समजल्यावर त्यांच्यावर श्रीलंकेचे लोक आक्षेप घेण्याची चिन्हं नसल्यासारखी आहे. थोडंफार बोललं गेलं तरी मालदीवची लोकसंख्या बघता जी जवळपास ५.४ लाख इतकी आहे, त्यांना जास्त डॅमेज याने होणार नाही.

म्हणून गोटाबाया यांनी मालदीव हा देश निवडला असावा, असं सांगितलं जातंय.

आता पुढचा प्रश्न हा पडतो की, ते आज राजीनामा देणार होते. मग तो देण्याआधी ते देश सोडून का गेले? राजीनामा देऊन जाऊ शकत नव्हते का?

आज श्रीलंकेची जी अवस्था आहे त्यासाठी पूर्णतः राजपक्षे घराण्याला दोषी ठरवले जात आहे. त्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे देश या स्थितीमध्ये पोहोचल्याचं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

लोकांचा रोष किती वाढला आहे हे गेल्या दोन-तीन दिवसांच्या सलग घडामोडीतून आपण बघू शकतो. राष्ट्राध्यक्षांच्या घरावर अतिक्रमण करणं, पंतप्रधानांचं घर जाळणं… अशात राजपक्षे यांना राजीनाम्यानंतर जर सुरक्षित राहायचं असेल तर देशातून जाणं क्रमप्राप्त झालं होतं. कारण आतापर्यंत ते देशात त्यांच्या ‘पदामुळे’ सुरक्षित होते. 

राष्ट्रपती या नात्याने गोटाबाया राजपक्षे यांना विशेष अधिकार मिळतात…

पाहिलं म्हणजे राष्ट्रपती या नात्याने राजपक्षे हे संरक्षण दलांचे सर्वोच्च कमांडर आहेत. याच अधिकाराने राजपक्षे यांनी डिफेन्सला दिलेले आदेश पूर्ण करणं डिफेन्स फोर्सला ‘बंधनकारक’ आहे. मात्र एकदा का ते या पदावरून पायउतार झाले की त्यांचे सगळे अधिकार संपुष्ठात येतील आणि त्यानंतर त्यांना देश सोडून बाहेर जाता येईल, अशी शक्यताच उरत नाही.  

कारण त्यांना अटक केली जाऊ शकते. राष्ट्रपती असल्याचा दुसरा फायदा म्हणजे गोटाबाया अटकेपासून बचावले जातात. मात्र एकदा का पद सोडलं तर त्यांना अटक केली जाऊ शकते. 

याच गोष्टींचा विचार करून राजपक्षे यांनी काल रात्री संरक्षण अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि लष्करी विमान मागवून घेतलं. पदावर असल्या कारणाने डिफेन्स त्यांना रोखू शकत नव्हतं. शिवाय देश सोडून बाहेर जाईपर्यंत माहिती गोपनीय ठेवण्यासही राजपक्षे यांनी सांगितलं, असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एएफपीला सांगितलं आहे. 

अशाप्रकारे अखेर गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेतून निघाले आणि मालदीवला पोहोचले. राजपक्षे मालदीवची राजधानी माले इथे सकाळी तीनच्या सुमारास पोहोचले. वेलाना विमानतळावर मालदीवच्या एका सरकारी प्रतिनिधीने त्यांचं स्वागत केलं आणि पोलिस बंदोबस्तात त्यांना अज्ञात ठिकाणी देण्यात आलं आहे, अशी मालदीवच्या अधिका-यांच्या सांगण्यानुसार बीबीसीने माहिती दिली आहे. 

तर राजपक्षे मालदीववरुन नंतर पुढच्या देशात जातील, अशी माहिती देण्यात येतीये. 

गोटाबाया राजपक्षे यांना मालदीवमध्ये येण्यास मालदीव सरकारने का मान्यता दिली? असा प्रश्न देखील मालदीव सरकारला विचारला गेला. त्यावर मालदीवच्या सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे…

जेव्हा राजपक्षे यांनी देशात येण्याची विनंती केली तेव्हा ते श्रीलंकेचे राष्ट्रपती होते आणि अजूनही श्रीलंकेचे राष्ट्रपती आहेत. त्यांनी राजीनामा दिलेला नाही किंवा त्यांचे अधिकार कुणाकडे सुपूर्द केले नाहीयेत. अशात त्यांना मालदीवला जायचं असेल तर ते नाकारलं जाऊ शकत नाही, असं मालदीव सरकारने म्हटलं आहे. 

देश सोडून राष्ट्रपती मालदीवला गेले आहेत तेही बरोबर राजीनामा देण्याच्या आदल्या रात्री तेव्हा आता राजीनाम्याचं काय? हा प्रश्न…

राजीनामा आज दिला जाणार, असं गोटाबाया यांनी स्पष्ट केलं आहे असं श्रीलंकेच्या सभापतींनी सांगितलं असल्याची माहिती फर्स्टपोस्ट या वृत्तसंस्थेने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या वेळेनुसार रात्री आठच्या सुमारास राजपक्षे यांचं राजीनामा पत्र सभापती महिंदा यापा अबेवर्धना यांना पाठविण्यात येणार आहे. 

पुढचा राष्ट्रपती कोण होणार?

श्रीलंकेच्या राज्यघटनेच्या कलम ४० नुसार, जर राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपण्याआधी राजीनामा दिला तर संसदेने त्यांच्या जागी संसदेच्या एखाद्या सदस्याची निवड करणं आवश्यक आहे. पद रिकामं झाल्यानंतर एका महिन्याच्या आत निवडणूक होणं गरजेचं आहे. शिवाय ही निवडणूक गुप्त मतदानाने आणि पूर्ण बहुमताने व्हायला हवी. 

पुढचा राष्ट्रपती निवडेपर्यंत पंतप्रधान हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत असतात.

मात्र सध्याची श्रीलंकेची स्थिती बघितली तर पंतप्रधान विक्रमसिंघे यांनीच राजीनामा देण्याचं जाहीर केलं आहे आणि जनताही त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहे. तेव्हा त्यांचा चान्स तर गेला आहे. अशात नियमानूसार सभापती महिंदा यापा अबेवर्धना कार्यकारी अध्यक्षाचा पदभार सांभाळू शकतात. 

श्रीलंकेत २० जुलै ही तारीख पुढच्या राष्ट्रपतींची निश्चित करण्यात आली आहे. 

गोटाबाया राजपक्षे नोव्हेंबर २०१९ मध्ये निवडून आले होते आणि त्यांचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपणार होता. मात्र मध्येच निवडणूका लागल्याने २० जुलै रोजी जो व्यक्ती या पदावर निवडून येईल त्याचा कार्यकाळ २०१४ पर्यंत राहील आणि त्यानंतर परत नव्याने निवडणूक होईल, असं श्रीलंकेचा कायदा सांगतो.

नवीन राष्ट्राध्यक्षांच्या शर्यतीत श्रीलंकेचा मुख्य विरोधी पक्ष ‘समगी जन बालवेगया’ (एसजेबी) चे साजिथ प्रेमदासा आणि जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) पक्षाचे अनुरा कुमारा डिसनायके यांची नावं आघाडीवर आहेत. 

श्रीलंकेचं भविष्य २० जुलैला ठरणार आहे, असं समजतंय. मात्र दरम्यान श्रीलंकेत रोज इतक्या हालचाली होत आहेत, घडामोडी घडत आहेत की केव्हा काय होईल? हे सांगणं  कठीण झालं आहे. तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष श्रीलंकेकडे लागलं आहे…

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.