महापुरात झालेल्या नुकसानीची भरपाई कशी मिळवायची?

गेले दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने पूर स्थिती निर्माण झाली आहे. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात पुराचे पाणी घुसून वाहने, दुकाने, घरांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होतं आहे.

सगळ्यात आधी एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे कोणत्याही नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी विमा असणे गरजेचे असते. मात्र नैसर्गिक आपत्ती असेल आणि विमा नसला तरीही सरकारकडून जाहीर करण्यात येते. या मदतीतून नुकसान भरपाई मिळू शकते.

मात्र त्यासाठी दोन्ही गोष्टींमध्ये नागरिकांनी काही काळजी घेणे गरजेचे असते.

नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईसाठी पंचनामा अत्यंत महत्वाचा असतो

नैसर्गिक आपत्तीत नुकसानभरपाई मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, मामलेदार कचेरी यांच्याकडून करण्यात येणाऱ्या पंचनामा हा महत्वाचा पुरावा असतो. कोणत्याही नैसर्गिक आपत्ती नंतर जिल्हाधिकारी पंचनामा करण्याचे आदेश देतात. महसूल व्यवस्थेतील तलाठी, मंडल अधिकारी आणि शहरात सिटी सर्वे ऑफिसरकडून या नुकसानीचे पंचमाने करण्यात येतात.

यावेळी पोलीस कर्मचारी सुद्धा उपस्थित असतात.

नुकसान भरपाई मिळवून देण्यास पंचनामा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. त्यामुळे तलाठी पंचामना करण्यासाठी आले असता नागरिकांनी नेमके काय नुकसान याची सविस्तर माहिती देणं गरजेचं असते. पुराचे पाणी ओसरल्यानंतर तत्काळ त्या परिसरातील पंचनामे करण्यात येतात. पंचनामे कधी सुरु होणार याची माहिती स्थानिक माध्यामतून देण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी याकडे लक्ष ठेवून असायला हवे.

तसेच पुरामुळे वाहनाचे, दुकानाचे, घराचे नुकसान झाल्यास फोटो, व्हिडीओ काढून ठेवणे महत्वाचे असते. मात्र पंचनामा नसेल तर नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांनी पंचनामा करतांना सविस्तर माहिती द्यायला हवी.

वाहनाचा विमा करण्यासाठी काय करावे? 

अचानक आलेल्या महापुरा मध्ये हजारो वाहनाचे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई मिळवायची असेल तर त्यासाठी वाहनाचा विमा गरजेचं असतो.

वाहनाचा विमा दोन प्रकारचा आहे. एक थर्ड पार्टी (तृतीय पक्ष) व दुसरा कॉम्प्रेहेन्सिव्ह (फुल्ल) विमा. थर्ड पार्टी विमाधारकाला अपघातात किंवा नैसर्गिक आपत्तीने वाहनाचे नुकसान झाल्यास ते मिळत नाही. आपल्याकडून दुसऱ्याचे नुकसान झाल्यास त्याला भरपाई मिळते.

फुल्ल विमा पॉलिसीमध्ये सर्व प्रकारच्या नुकसानीची भरपाई मिळू शकते. मात्र त्यातही नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास अधिक प्रीमियम भरलेला असणे गरजेचे असते. विमा घेतांना ही काळजी घ्यावी लागते.

पुरात वाहनाच नुकसान झालं तर सर्व प्रथम विमा कंपनीला कळवाव लागते. त्यांतर विमा कंपनीचा क्लेम फॉर्म भरून द्यावा लागतो. त्यासाठी गाडीचे कागदपत्रे, लायसन्स, विमा पॉलिसी झेरॉक्स अशी कागदपत्र द्यावी लागतात. त्यानंतर कंपनीकडून पाहणीसाठी ‘सव्‍‌र्हेअर’ पाठविण्यात येते.

गाडीचे किती नुकसान झाले याचा तो आढावा घेतो. जर जागेवर आढावा घेणे शक्य नसेल तर गाडी टो करून गॅरेजला पाठवली जाते. नुकसानीचा अंदाज कंपनीला कळवून विमा खर्चातून गाडी दुरुस्त करून देण्यात येते.

गाडी पुरात अडकली तर काय काळजी घ्यावी?

गाडी पाण्यात जागेवरच उभी असेल तर ती तशीच ठेवावी. जर वाहून ती दुसऱ्या जागेवर गेली असेल तर धक्का मारून रस्त्याच्या बाजूला उभी करावी. पण अशा वेळी अनेकांकडून एक चूक करण्यात येते. विमा कंपनीचा सव्‍‌र्हेअर येण्याआधीच पाण्यातच गाडी सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.

मग इंजिनमध्ये पाणी घुसते आणि इंजिन खराब होते. मग, खर्च वाढतो आणि तो चालकाच्या चुकीमुळे (मूळ कारणापेक्षा इतर कारणाने झालेले नुकसान) या प्रकारात गणला जातो. त्यामुळे इंजिनासाठी येणारा खर्च विमा कंपन्या देत नाहीत. त्यामुळे भरपाई मिळते पण, त्यात गाडीचे काम होत नाही, आणि खिशातून पैसे टाकावे लागतात.

त्यामुळे पाण्यात बुडलेली गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू नये. हवी तर गाडी ढकलत बाजूला करावी. पण यातही जर आपण इंजिनाचा स्वतंत्र विमा काढला असेल तर मग कंपनीला विमा रक्कम द्यावी लागते.

विम्यासाठी कंपनीला पंचनामा, विम्याचे कागदपत्रे, जो माणूस क्लेम करतोय त्याची कागदपत्रे आणि पंचनामा कार्यालयात नेऊन द्यावीत.

घर किंवा दुकानचे पुरात नुकसान झाल्यास विमा नुकसान भरपाई कशी मिळवावी?

दुकानदारांनी मालाचा विमा काढला असेत तरच नुकसान भरपाई मिळते. नसेल तर सरकार जाहीर करेल त्यातून मदत मिळते. मात्र विमा असेल तर सगळ्यात आधी पंचनामा करून विमा कंपनीला झालेल्या नुकसानीची माहिती कळवणे गरजेचे असते. त्यानंतर विमा कंपनीकडून सव्‍‌र्हेअर पाठविण्यात येतो. त्यानंतर पाहणी करून सव्‍‌र्हेअर ही सर्व माहिती विमा कंपनीला कळवतो.

यातही पंचनामा महत्वाचा असतो. मात्र सर्वात महत्वाचे म्हणजे स्थानिक शासनाला पुरात झालेल्या नुकसानीची माहिती देणे गरजेचे असते. पूर ओसरल्यानंतर नुकसान झाले त्या वस्तूचे फोटो, व्हीडीओ काढून ठेवणे महत्वाचे असते.

विमाचा क्लेम, पंचनामा, पुरावे म्हणून फोटो विमा कंपनीला पाठवणे गरजेचे असते. त्यानंतर विमा कंपनीकडून वस्तूंचा घसारा काढून भरपाई देण्यात येते.

पंचनामा नसेल तर नुकसान भरपाई मिळत नाही.

पुरामुळे शेती नुकसान झाल्यास काय करावं?

विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीक पंचनामा महत्वाचा आहे. तसेच २४ तासाच्या आत ऑनलाईन माहिती विमा कंपनीला पाठविणे बंधनकारक असते. तसेच नुकसानी नंतर तलाठी, कृषी सहाय्यक हे पंचनामा करण्यासाठी आले असता त्यांना झालेल्या नुकसानाची सविस्तर माहिती द्यायला हवी.

हीच माहिती शासकीय मदत मिळून देण्यासाठी महत्वाची असते. जर पुरात जनावरे मूत्यू पावले असतील तर पंचनाम्यात त्याचा उल्लेख येणे महत्वाचे असते.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतीचे पंचनामा कागद महत्वाचा आहे. पंचनामे झाल्यानंतर शासनाकडून हेक्टरी मदत जाहीर करण्यात येते. त्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळते.

याबाबत ‘बोल भिडू’शी बोलतांना ऍड. रोहित माळी यांनी सांगितले की,

विमा काढला असेल तर कंपनीकडून नुकसानभरपाई मिळते. मात्र वाहन सोडता नागरिकांकडून विमा काढण्यात येत नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती मध्ये सरकारकडून मदत जाहीर करण्यात येते. त्यातून नागरिकांना नुकसान भरपाई मिळते. मात्र त्यासाठी पंचनामा महत्वाचा असतो.

नागरिकांनी पंचनामा करून घेणे महत्वाचे असते. तसेच जीवितहानी झाल्यास एफआयआर नोंदवणे गरजेचे असल्याचे रोहित माळी यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्ती हे ऍक्ट ऑफ गार्ड म्हणून पूर गणला जातो. त्यामुळे अशा वेळी विम्याचा एक्स्ट्रा प्रीमियर भरला तर विमाच्या फायदा मिळतो.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.