कर्नाटकातल्या अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरात पूर येतो, हे खरं आहे का ?

कालपासून पावसाने रौद्ररूप धारण केलंय. कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर आलाय. विशेषतः पंचगंगा कृष्णा नद्यांना महापूर येण्याची शक्यता निर्माण झालीय. आज कोल्हापुरात प्रत्येकजण एकच प्रश्न विचारतोय,

अलमट्टीचं पाणी सोडलं का?

आता प्रश्न पडतो की महापूर आलाय कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात आणि तिथले लोक कर्नाटकातल्या अलमट्टी ची चौकशी का करालेत?

यासाठी आपल्याला जायला पाहिजे २००५ मध्ये. तेव्हा सुद्धा महापूर आला होता.

२००५ सालचा जुलै महिना सरत आला होता. आता आहे तसाच पावसाचा धुमाकूळ सुरु होता. तसं बघायला गेलं तर कृष्णा, पंचगंगाचा पूर आमच्या भागासाठी नवीन नाही. इथे प्रचंड म्हणावा तसा काही पाउस पडत नाही, पण कृष्णा आणि तिच्या कोयना, पंचगंगा, दुधगंगा, वारणा या उपनद्याच्या उगमस्थानी बराच मोठा पाऊस पडतो आणि तो दरवर्षी नदीला पूर घेऊन येतो. नरसोबा वाडीच दत्ताचा मंदिर तर दोन तीन वेळा तरी बुडतच.

पण पुराची एक लाईन ठरलेली असते, पावसाळा सुरु झाला की तिथली लोकं खबरदारीचे उपाय आधीच घेत असतात. प्रशासनसुद्धा सज्ज असते. पण त्यावेळच्या पावसाचा नूरच वेगळा होता आणि त्याही पेक्षा कृष्णा-पंचगंगाचा नूर तर त्याहूनही भयंकर होता.

पाणी पात्राबाहेर आल, शेतात आलं, गावंदरीत आलं, बघता बघता गावात घुसलं. पुराची लाईन कधीच क्रॉस केली होती. कोणालाच काही कळत नव्हत, हे आक्रीत कशामुळे घडलय तेच कळत नव्हत. महापुराची तयारी जवळपास १५ दिवस हे महासंकट राहिलं. अनेक जण बेघर झाले. जीवित आणि वित्तहानीचं नुकसान किती झालं याला गणतीच नव्हती. म्हातारी कोतारी म्हणत होती असा महापूर गेल्या शंभर वर्षात आला नाही.

आणि या सगळ्यासाठीच बोट दाखवलं कृष्णेवर नव्यानेच बांधण्यात आलेल्या अलमट्टी धरणाकडे.

कर्नाटकात बागलकोट-विजापूर जिल्ह्याच्या बाउन्ड्रीवर एक गाव आहे निडगुंदी इथे हे धरण आहे. याची क्षमता आहे १२३.०८ टीएमसी आणि धरणाची उंची आहे ५२४.२६ फूट. धरणाचं मुख्य बांधकाम विक्रमी वेळेत झाले होते आणि खर्च सुद्धा ठरलेल्यापेक्षा कमी आला होता. कर्नाटकातील अनेक दुष्काळी गावांतील शेतजमिनी या धरणामुळे ओलिताखाली येणार होत्या. त्यांच्यासाठी हा अभिमानास्पद प्रोजेक्ट होता.

त्याच उद्घाटन होऊन महिना सुद्धा झाला नव्हतां आणि हा महापूर आला.

खर तर २००५ साली अख्ख्या महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली होती, सगळीकडेचं पूर आले होते. पण यापूर्वी कितीही प्रचंड पाऊस पडू दे कृष्णेतून ते पाणी पुढे वाहून जायचं मात्र त्यावर्षी अलमट्टीने ते पाणी अडवल्यामुळे या पाण्याच्या फुगवट्याचा फटका सीमेवरच्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या गावांना बसला. दोन्ही राज्यांची भाउबंदकी चव्हाट्यावर आली.

कर्नाटकचं म्हणण होत की,

महाराष्ट्रात मोठा पाऊस झाला, कोयना धरणातून मोठा विसर्ग झाला मग तिथे महापूर येणारच आणि सांगली कोल्हापूर पासून अलमट्टी जवळपास दोनशे-अडीचशे किमी दूर आहे, मग या नदीच्या बॅकवॉटरचा असा किती फरक पडतो?

आपलं म्हणण होतं की अलमट्टीमुळे आमच्या इथे पाऊस आला. कर्नाटकातील दुष्काळी गावाना भिजवण्यासाठी महाराष्ट्रातील सुपीक शेती का बुडवायची हा प्रश्न उपस्थित केला गेला. दोन्हीकडचे नेतेमंडळी हमरीतुमरीवर आली. केंद्रात, राज्यात वरून खाली सगळीकडे कॉंग्रेसच सरकार होतं पण कोणीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.

कृष्णा नदीच्या पाणी वाटपाचा वाद या दोन्ही राज्यांमध्ये पुरातन काळापासून सुरु होता. अनेक लवाद बसले आणि निघून गेले पण याच समाधान मिळवून देणारा निकाल कोणीच लावू शकला नव्हता. हा अलमट्टीच्या उंचीचा वाद देखील सर्वोच्च न्यायलयात गेला. तिथे निकाल आला की अलमट्टीची उंची ५२४ फुटावरून ५१८ फुट इतकी करावी.
यानंतर ही पूर आले पण २००५ सारखी कंडीशन परत आली नाही.

पुरक्षेत्रात बांधकामासाठी परवानगी नाकारण्यात आली. आता पावसाळा सुरु झाला की दोन्ही कडचे धरणांचे इंजिनियर्स एकमेकांच्या संपर्कात असतात आणि कोयनेतून पाणी सोडले की अलमट्टीचेही पाणी सोडले जाते.

महाराष्ट्राच्या धरणातून सोडले जाणारे पाणी आणि पुढे अलमट्टीमधून सोडले जाणारे पाणी यातील योग्य समन्वय यामुळे महापूर थांबवला जातो.

आता चौदा वर्षांनी परत यावर्षी अतिवृष्टी सुरु आहे. कृष्णा आणि तिच्या उपनद्यांवरच्या सगळे धरण एकाच वेळी भरले आहेत. त्यांचे दरवाजे उघडले गेले त्यापाठोपाठ अलमट्टीमधून ही जवळपास चार लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय. तरी पूर ओसरायचे नाव घेत नाही आहे. कारण सरळ आहे की पावसाने झोडपायचं थांबवलेलं नाही. शिरोळ तालुक्यांसारख्या सखल भागात कृष्णा- पंचगंगा संगम भागात या नद्यांचा रोरावणारा प्रवाह रोखणे कोणालाच शक्य होणार नाही आहे.

सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही कडचे प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. अलमट्टी आणि कोयना दोन्हीकडचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात राहून पाण्याचा प्रवाहाचं गणित सोडवत आहेत.

यापुर्वीचा इतिहासत १९८९ नंतर २००५ आणि २०१९ साली सांगलीला महापूराचा फटका बसला होता. आत्ता वारंवारता वाढलेय. यंदा पावसाच प्रमाण देखील जास्त असल्याच सांगण्यात येत आहे. अलमट्टी तांत्रिक पातळ्यावर जबाबदार नसल्याच सांगण्यात येत असलं तरी अलमट्टी नंतर पुराची वाढलेली परिस्थिती अलमट्टी धरणाकडेच बोट दाखवायला भाग पाडते हे नक्की… 

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.