हिमालयातल्या कुशीतलं असं गाव, जिथे फक्त महादेवाच्या शपथेवर मिळतं कर्ज !

कुठल्याही बँकेकडून कर्ज घ्यायचं म्हणजे आपल्याला सतराशे साठ विघ्नांचा सामना करावा लागतो. तिकडे विजय मल्या आणि निरव मोदीसारखे लोकं बँकांना करोडोचा चुना लाऊन देशातून पळून जातात, पण तरीही बँका त्यांच्यावर मेहेरबान पण सामान्य माणसाला त्याच्या गरजांसाठी कर्ज द्यायचं म्हंटलं की बॅंकेचे अधिकारी एवढे खेटे मारायला लावतात की विचारता सोय नाही.

आता तुम्ही म्हणाल की आज हे बॅंक अन कर्ज अन याबद्दल का सांगताय…? तर भिडू लोक्स आम्ही आज तुम्हाला ज्या गावाबद्दल सांगणार आहोत ना, ते गाव हेच काम करतंय. कुठलं काम तर व्याजाने कर्जाऊ पैसे वाटायचं. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष कर्जाने पैसे वाटणारे सावकार तर आपल्याकडे पण गावागावात असतात की.

तुमचं म्हणणं खरंय. व्याजाने पैसे वाटणारे सावकार आपल्याकडे पण असतात, पण या गावातले सावकार व्याजाने पैसे देतात त्यावेळी ते कुठलीही वस्तू किंवा ऐवज तारण म्हणून ठेऊन घेत नाहीत. तर फक्त गावात असलेल्या सोमेश्वराच्या मंदिरात पैसे व्याजासहित परत करण्याची शपथ घेतली की तुम्हाला कर्जाने पैसे उपलब्ध करून दिले जातात.

उत्तराखंडमधील टिरी जिल्ह्यातील ‘गंगी’ असं या गावाचं नाव. या गावात असणाऱ्या मोठ्या प्रमाणातील सावाकारांमुळे आता हे गाव संपूर्ण उत्तराखंडमध्ये सावकारांचं गाव म्हणूनच ओळखलं  जातं.

या गावातील सावकारांच्या कर्ज देण्याच्या पद्धतीमुळे हे गाव विशेष चर्चेत आहे. या गावात सोमेश्वराचं एक प्राचीन मंदिर आहे. भगवान सोमेश्वरावर गावातील लोकांची अपार श्रद्धा. त्यामुळे भगवान सोमेश्वरची शपथ हिच त्यांच्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणाची पावती.

एखादा व्यक्ती ज्यावेळी कधी कर्ज घेण्यासाठी या गावातील सावकाराकडे जाते  त्यावेळी त्याला सोमेश्वराच्या मंदिरासमोर दिवा लाऊन शपथ दिली जाते आणि कर्जाचे वाटप केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून गावात अशा पद्धतीने रक्कम कर्जाऊ दिली जाते. त्यामुळे या माध्यमातून गावाची एक वेगळीच अर्थव्यवस्था उभी राहिली आहे.

कर्जाऊ दिलेल्या रकमेतून व्याजाच्या स्वरुपात येणाऱ्या चांगल्या रकमेमुळे असेल कदाचित पण या गावातील लोकांमध्ये साक्षरतेचं प्रमाण खूप कमी आहे, ही गोष्ट मात्र चिंताजनक.

कर्ज देण्याव्यतिरिक्त हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने देखील फिरण्यासाठी एक चांगलं ठिकाण समजलं जातं. हिमालयाच्या कुशीत असलेल्या या गावावर निसर्गाने केलेल्या सौदर्याच्या उधळणीमुळे अनेक लोक या गावाला भेट देतात.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.