उत्तर प्रदेश निवडणुकीत ज्या शब्दाने राजकारण तापलंय ते ‘गजवा-ए-हिंद’ नेमकं काय आहे?

देशात विधानसभा निवडणूका चालू आहेत. पाच राज्यांमध्ये चालणाऱ्या या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची जरा जास्तच चर्चा होताना दिसतेय. याचं कारण म्हणजे युपीच्या निवडणुकीत प्रचारासाठी वापरले जाणारे वेगवेगळे फंडे. सध्या यातच ‘गजवा-ए-हिंद’ या शब्दाचा खूप वापर होतोय. योगी आदित्यनाथ सारखं सारखं या शब्दाचा वापर करत राजकारण पेटवण्याचा प्रयत्न करताय, असा आरोप होतोय.

कर्नाटकच्या हिजाब वादावर ओवैसी यांनी एक व्हिडीओ ट्विट करत म्हणाले की, एक दिवस देशाची मुलगी बुरखा घालून पंतप्रधान बनेल. त्यावर उत्तर देत योगींनी ट्विट करत, ‘गजवा-ए-हिंद’चं स्वप्न पाहणाऱ्यांनी लक्षात ठेवा भारत राज्यघटनेनुसार चालेल, शरियतनुसार नाही, असं म्हटलं होतं. तर इतकंच नाही त्यांनी एका माध्यमाला मुलाखत देतानाही याचा उच्चार केला होता.

मात्र ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा भारत ‘गजवा-ए-हिंद’ हा शब्द ऐकतोय. या आधीही हा शब्द नेहमी वापरात आहे. पुलवामा हल्ला जेव्हा झाला तसंच सीएए विरुद्ध आंदोलन जेव्हा झालं तेव्हा देखील हा शब्द बराच चर्चेत आला होता. हा शब्द असाही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो. जेव्हा केव्हा हा शब्द वापरात येतो तेव्हा मात्र कट्टरतावादी भावना यातून उमटताना दिसतात. 

काय आहे ‘गजवा-ए-हिंद’ ?

याला ते अपूर्ण स्वप्न म्हटलं जातं जे गेल्या १३०० वर्षांपासून इस्लामिक कट्टरपंथीयांच्या डोळ्यात अखंडपणे वावरत आहे. गजवा-ए-हिंद हा जुना शब्द आहे. यामध्ये ‘गजवा’ म्हणजे इस्लामच्या प्रसारासाठी लढलेले युद्ध. म्हणजेच ‘गजवा-ए-हिंद’ म्हणजे असं युद्ध, ज्याद्वारे भारतीय उपखंडातील लोकांना इस्लाममध्ये समाविष्ट करता येईल. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जेव्हा भारतात इस्लामचा विस्तार करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा हा शब्द वापरण्यात आला होता.

मुस्लीम धर्माच्या तत्त्वांनुसार जगाचे ‘दारुल इस्लाम’ आणि ‘दारुल हर्ब’ या दोन भागात विभाजन केले आहे. ज्या देशामध्ये मुस्लिम राहतात आणि मुस्लीम राज्य करतात त्याला ‘दारुल इस्लाम’ म्हणतात. ‘दारुल हरब’ हे असे देश आहेत जिथे मुस्लिम राहतात, परंतु बिगर मुस्लिमांचं राज्य आहे. इस्लामिक सिद्धांतानुसार भारत देखील असाच एक दारुल हर्ब आहे, ज्याला दारुल इस्लामची गरज आहे. तर दारुल हर्ब ‘इंडिया’ला दारुल इस्लाम बनवणं म्हणजे ‘गजवा-ए-हिंद’ असं सांगितल्या जातं.

काय आहे ‘गजवा-ए-हिंद’ चा इतिहास ?

सातव्या शतकात मुहम्मद बिन कासिमने भारतावर आक्रमण केलं होतं. इस्लामचा देशभर प्रसार करण्याचं त्याचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठा प्रयत्न झाला होता. मात्र, तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर इतर देशांतून आलेल्या विदेशी मुस्लिम हल्लेखोरांनीही इस्लामचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हिंसक हत्यार यासाठी वापरलं. लोकांना बेदम मारहाण केली तेव्हा भीतीपोटी अनेकांनी धर्म बदलला.

तरीही, देशाची मोठी लोकसंख्या आपल्या मूळ धर्मावर कायम राहिली. एका मोठ्या समूहाचं धार्मिक रूपांतरण करता न आल्याने गाजवा-ए-हिंद करण्याचं कट्टरवाद्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं, असं म्हटलं जातं.

या दारुल इस्लाममध्ये असं सांगण्यात आलंय की, देशाची जमीन मुस्लिमांची असू शकते परंतु मुस्लिम आणि हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, ज्यू, पारशी यांची एकत्रितपणे नाही. म्हणूनच भारताला दारुल इस्लाम बनवण्यासाठी ‘गजवा-ए-हिंद’ करावं लागेल.

इस्लामिक राष्ट्राची मागणी अशा लोकांनी केली आहे ज्यांना विज्ञान आवडत नाही. अशा लोकांना परंपरा बदलायची नसते. स्वतःला धर्माचे ठेकेदार म्हणवून जनतेचं शोषण करायचं असतं, असं म्हटल्या जातं. इस्लामच्या अनुयायांचे दोन मुख्य ग्रंथ आहेत. ‘कुराण आणि हदीस’. कुराणात मुहम्मद साहेबांची शिकवण आहे. पण, सरकार कसं चालवायचं, या विषयावर चर्चा होत नाही.

मुहम्मद साहेबांच्या मृत्यूनंतर २०० वर्षांनी हदीस लिहिली गेली. हदीस हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ अहवाल, रिपोर्ट असा आहे. हदीसचे एकूण ६ संग्रह आहेत. कुराणमध्ये जिहाद म्हणजे तपश्चर्या, पण हदीसमध्ये जिहाद म्हणजे धर्मयुद्ध. गजवा-ए-हिंदचा उल्लेखही हदीसमध्ये प्रथमच येतो.

कट्टर इस्लामला मानणाऱ्यांचं म्हणणं आहे की गझवा-ए-हिंद इतक्या वर्षांत होऊ शकलं नाही कारण याआधी भारतावर आक्रमण करणारे सर्व मुस्लिम आक्रमक इस्लामच्या धर्मांध विचारसरणीने प्रेरित होते, पण त्यांचं खरं स्वप्न भारताची संपत्ती लुटण्याचं होतं.

‘गजवा-ए-हिंद’ बद्दल एक्सपर्ट्स काय सांगतात? 

एक्सपर्ट्सनुसार गजवा याचा अर्थ ज्यात मोहम्मद साहेब स्वतः शारीरिकरित्या उपस्थित होते ते. याचा अर्थ आता गजवा होऊच शकत नाही. आता जर एखाद्या लढाईला गजवा म्हटलं तर ती ‘कत्तल’ समजली जाईल. मात्र मुद्दाम लोकांमध्ये अशांती पसरवण्यासाठी आणि वैमनस्य निर्माण करण्यासाठी आजकाल याचा वापर केला जात आहे. हेच समजून घेणं गरजेचं आहे.

मुस्लिम इतिहासात पैगंबर मोहम्मद यांच्या नंतरपर्यंत हदीसचा कोणताही औपचारिक संग्रह प्राप्त नाहीये. हदीसचं संकलन करताना अनेक ऐकलेल्या गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या. सोबतच काही स्कॉलर्स सांगतात की पैगंबर यांच्या खूप नंतर काही शासक व्यक्तींकडून मुद्दाम ते लिहून घेतल्या गेलं ज्याने ते त्यांचं आक्रमण आणि नीतीला मुस्लिम तत्त्वांनुसार योग्य ठरवू शकतील.

म्हणजेच मुद्दाम वातावरण दूषित करण्यासाठी मुस्लिम तत्त्वांचा चुकीचा प्रचार केला जात असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

शिवाय भारतीय लोकांमध्ये याबद्दल भीतीचं वातावरण पसरवल्याने द्वेष निर्माण होतोय. अशी भीती आतंकवादी संघटनांकडून मुद्दाम दिल्या जाते, कारण यानेच त्यांचे हेतू साध्य होत असतात. पाकिस्तानसारख्या इतर भारतीय देशावर राज्य करण्याचं स्वप्न पाहणारे देश या संज्ञेचा वापर करत असल्याचं दिसतं. मात्र भारताच्या राजकारणात या संज्ञेचा वापर होत असल्याने नेमकं ‘गजवा-ए-हिंद’ काय हे समजून घेणं गरजेचं आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.