फक्त ५०० रुपयांपासून सुरू होणारी गोव्यातली १० ठिकाणं ; ही लिस्ट सेव्ह करुन ठेवा..

सकाळी सकाळी ऑफिसमध्ये एंट्री केली आणि “काय राव, मी काय करतेय इथे” असा आवाज कानी पडला. जरा दचकवणारंच स्वागत होतं म्हणून जवळ जाऊन बघितलं तेव्हा कळलं, आमच्या या भिडूचे सगळे मित्र गोवा फिरायला गेलेत, फुल्ल धमाल करताय, आणि तिला ऑफिस करावं लागतंय. म्हणून जरा नाराजीचे स्वर निघाले.

आता तिला चिल करण्यासाठी सगळ्यांनी “जाऊ दे, आपणही जाऊ” असे स्वर काढले खरं, मात्र परत थोड्यावेळाने त्याच चर्चेत सगळ्यांनी हीच आपबिती मांडली. 

जे बघा ते, मस्त फिरताना दिसताय. आणि उन्हाची झळ लागायला सुरुवात झाल्याने एक ठिकाण त्यात खूप जास्त दिसतंय ते म्हणजे ‘गोवा’. 

गोवा म्हटलं की, भलामोठा समुद्रकिनारा, वेगवेगळ्या शैलीत बांधलेली घरं, निरनिराळे स्वादिष्ट खाद्यपदार्थ, मनोरंजक सण आणि कार्निव्हल, दोन्ही बाजूनी सुंदर आणि उंचच उंच झाडांनी वेढलेले रस्ते, अशा सगळ्या ठिकाणी फोटो काढणं तर येतंच… पण रात्रीचं बीचवर ते गाण्याचे समारंभ, मनमोकळं बिनधास्त नाचणं, आणि शौकिनांना स्वर्गसुख देणारी दारू या गोष्टी प्रामुख्याने आकर्षित करतात. 

पण यात एक मुद्दा असा देखील आहे की, या सगळ्या गोष्टी मित्रांसोबत एन्जॉय करण्यासाठी घरच्यांना गोवा ट्रीपसाठी तयार करावं लागतं. अगदी रडत, कुथत  काही तरी वशिले लावून घरचे तयार झाले की गोवा ट्रीपला भिडू निघतात. पण अनेकदा त्यांना ती मनसोक्त एन्जॉय करता येत नाही कारण गोव्यात राहण्यातच जास्त खर्च होतो. मग बाकीच्या गोष्टींत मन मारावं लागतं. 

म्हणून तर नेमकी हीच अडचण ओळखत आम्ही खास तुमच्यासाठी गोव्यातील असे १० ठिकाणं आणले आहेत, ज्याने खिशाला चंदन लागणार नाही, आणि सगळे गोवा प्लॅन्स तुम्ही पूर्ण करू शकतात. मग तुम्ही एकटे जा किंवा टोळी घेऊन, ही ठिकाणं अगदी परवडेबल आहेत…

 १. द बकेट लिस्ट 

गोव्यातील वॅगेटर इथल्या कौटिन्हो वाड्डो इथे हे हॉस्टेल आहे. अगदी बास्किन रॉबिन्सच्या शेजारीच.  इथलं वातावरण आराम करण्यासाठी, काही नवीन तयार करण्यासाठी, पार्टीसाठी अगदी साजेसं आहे. वेगवेगळ्या रंगानी नटलेलं हे ठिकाण वर्षभर पर्यटनासाठी खुलं असतं. त्यांच्याकडे ग्रुप करून राहण्यासाठी मोठ्या खोल्या तर आहेतच मात्र खाजगी खोल्या देखील आहेत. शिवाय बार आणि एक खास रेस्टॉरंट-कॅफे क्षेत्र आहे, जिथे शेफ-क्युरेटेड मेनूमधील पदार्थ दिल्या जातात. 

वाचक आणि लेखकांसाठी तर इथे पुस्तकांची मेजवानीच आहे. या सुंदर अशा जागेत १०० हून अधिक पुस्तकांची एक मिनी लायब्ररी आहे, काम करण्यासाठी जागा उपलब्ध आहे, विविध कार्यक्रम इथे अरेंज केले जातात ज्यात टॅटू वर्कशॉप्स आणि कराओके नाइट्स देखील असतात.

हे सगळं तुम्हाला मिळतं फक्त प्रति रात्र ५८० रुपयांपासून पुढे. ही जागा बघण्यासाठी लिंक देतोय..

२. बंकर कंटेनर

आता तुम्हला जर समुद्र आणि जंगल असं दोन्ही हवं असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे. स्मॉल वॅगेटर बीचपासून फक्त २०० मीटर अंतरावर असलेलं हे हॉस्टेल अपसायकल शिपिंग कंटेनर्सपासून बनवलेले आहे. इथे पण ग्रुप करून राहण्यासाठी मोठ्या खोल्या आणि खाजगी खोल्या तुम्हाला मिळतील. गोंगाट न आवडता शांतपणे निसर्गाच्या सहवासात राहण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.  

शांतपणे बसून सूर्यास्त पाहण्यासाठी खुल्या हवेतील अंगण आणि छत असलेली जागा देखील आहे. अनेक इनडोअर गेम्ससाठी उपकरणे तर आहेतच शिवाय इथे अतिथींसाठी अधूनमधून योगा आणि फिटनेस कार्यशाळा आयोजित केल्या जातात.  प्रति रात्र ७०० रुपयांपासून इथे रेंट असतो. फोटोमधून तुम्हाला समजेलच…

३. ओल्ड क्वार्टर

इथे ग्रुप स्टे आणि खाजगी खोल्यांसोबत, एक सामायिक लाउंज आहे. शिवाय सायकलिंगसाठीही प्रशस्थ जागा आहे. खास पाहुण्यांसाठी इथे इनडोअर आणि आऊटडोअर गेम्स अयोहित केले जातात आणि एक इन-हाउस रेस्टॉरंट देखील आहे. दरवर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी पंजीममधील हे योग्य बजेट डेस्टिनेशन आहे. खूपच चांगल्या प्रकारे पर्यटकांसाठी तयार करण्यात आल्याचं, इथे राहिलेले पर्यटक सांगतात.

पंजीम चर्चपासून फक्त ६०० मीटर अंतरावर असणारं  हे ठिकाण Rua 31 de Janeiro, Fontainhas, पणजी इथे आहे. आणि राहण्याचा खर्च सुरु होतो प्रति रात्र ७०० रुपयांपासून… 

४. वोक हॉस्टेल

मध्यम आकाराचं पण आलिशान असं हे ठिकाण अगदी गोव्याच्या मध्यभागी आहे. पण तरीही परवडणारे आहे. यात एक सामायिक लाउंज, एक बाग आणि खाजगी खोल्या आणि ग्रुप स्टे आहे. हा परिसर सायकलिंग आणि बाइक भाड्याने घेण्यासाठी लोकप्रिय आहे. गोव्यातील सगळ्यात फेमस बागा बीचपासून फक्त १.७ किमी अंतरावर हे हॉस्टेल असून अर्पोरामधील HDFC बँकेच्या मागे दिवाण भाटी इथे ते आहे.

आऊटडोअर स्विमिंग पूल आणि सामायिक स्वयंपाकघर हे या ठिकाणचे सर्वात मोठे आकर्षण आहे. तर  अंजुना बीच, बागा नाईट मार्केट, कलंगुट बीच आणि कॅंडोलिम फुटबॉल अशी गोव्यातली इतर लोकप्रिय ठिकाणे इथून फक्त २ किमीच्या परिघात आहेत. ठिकाणाची बांधणी, वातावरण, खाद्यपदार्थ शिवाय निळे ग्रीक दरवाजे आणि उघडे शॉवर पर्यटकांनी या ठिकाणच्या प्रेमात पडतात. 

सोलो म्हणजे एकट्याने प्रवास करण्यासाठी तर हे ठिकाण परफेक्ट आहे. खर्च काय? प्रति रात्र ६८० पासून पुढे…

 

५. कॅसल हाऊस

कलंगुट इथल्या एका छोट्या गल्लीत लपलेले पण लोकप्रिय राहायचं ठिकाण. इन-हाउस रेस्टो-बार आणि स्विमिंग पूल ही खासियत. मात्र जोडीला एक खुले आणि रुंद रेस्टॉरंट क्षेत्र. या ठिकाणापासून तिबेटी मार्केट आणि कलंगुट बीच रोड मॉल फक्त ५०० मीटरच्या अंतरात आहे.

आउटडोअर पूल व्यतिरिक्त, कॅसल हाऊसमध्ये पिझ्झा बनवण्याचे खास क्षेत्र इथे आहे, जिथे गेस्ट वुडफायरवर पिझ्झा बनवण्याची पारंपरिक कला जवळून अनुभवू शकतात. इथे दोघांचा राहण्याचा खर्च प्रति रात्र २५०० पासून पुढे असतो.

६. समर हॉस्टेल

ओरेम रोडवर हे हॉस्टेल पालोलेम आणि पटनेम समुद्रकिनाऱ्यांदरम्यान आहे. खोलीतूनच तुम्हाला मस्त असा समुद्राचा नैसर्गिक व्ह्यू बघायला मिळतो. समुद्रकिनाऱ्यावर योगाचे वर्ग आणि मोफत नाश्ता इथे दिला जातो. तर इनडोअर आणि आऊटडोअर गेम्स तर हमखास असतात. एकदा आलेले पर्यटक जर परत गोवा भेटीला आले तर इथेच येतात असं तिथला स्टाफ सांगतो. कारण हे कर्मचारी अतिशय विनम्र आणि आनंदित करणारी वागणूक देतात. 

७. ड्रीम्स हॉस्टेल

या वसतिगृहात आतापर्यंतचे सर्वात ट्रीपी सामायिक लाउंज आहे! वॅगेटर बीचपासून सुमारे ४५० मीटर अंतरावर  आणि चापोरा किल्ल्यापासून फक्त ८०० मीटर अंतरावर हे आहे. रंगबिरंगी रंगानी आणि कलाकृतींनी नटलेलं हे हॉस्टेल  शांत आणि आनंददायी अशी फिलिंग देतं.

इथे डॉर्म, खाजगी खोल्या, एक बार आणि एक रेस्टॉरंट आहे. तसंच इनडोअर आणि आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटी सोबतच कला कार्यशाळा यासारख्या इथे घेतल्या जातात. एका रात्रीचं भाडं सुरु होतं  ते ५०० रुपयांपासून.

८. क्राफ्ट हॉस्टेल

अंजुना बीचपासून सुमारे १०० मीटर आणि बागा बीचपासून १.२ किमी अंतरावर हे राहायचं ठिकाण आहे. जिथे काम करण्यासाठी शांत जागा आहे. तर मुख्य आकर्षण म्हणजे सामायिक स्वयंपाकघराची उपलब्धता. सॅटर्डे नाईट मार्केट आणि सेंट मायकल चर्च ५ किमीच्या आत आहे.

अतिशय स्वच्छ अशा खोल्या ते पाहुण्यांना देतातच मात्र त्यांच्या खोली बाहेर नाव लिहून अगदी घराची फिलिंग निर्माण करतात. आहे हे फक्त प्रति रात्र १००० रुपयांच्या पुढे असतं.

९. जंगल हॉस्टेल

मेंडोन्का वाड्डो इथल्या वॅगेटर बीच रोडवर असलेलं ते हॉस्टेल रात्रीच्या पार्ट्या आणि मैफिलींसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. एक रेस्टॉरंट, एक बार, एक बाग, एक सामायिक लाउंज इथे आहे. तर ओझरान बीच फक्त १ किमी आणि मोरजिम बीच २ किमी अंतरावर आहे.नावातूनच याच वैशिष्ट्य झळकत. म्हणजेच सकाळी जंगलातील निसर्गरम्य अनुभूतीसोबत संध्याकाळ संगीत, नृत्य आणि इतर मनोरंजनाच्या पार्ट्यांसाठी ही जागा राखीवच आहे.

काम करताना अगदी सौम्य संगीत बॅकग्राऊंडला ऐकू येतं कारण तशी विशेष तणावमुक्त व्यवस्था केलेली आहेत. आणि हे सर्व फक्त प्रति रात्र ६५० रुपयांपासून सुरु होतं.

१०. वॅंडरर्स हॉस्टेल

जर तुम्हाला रूफटॉप मुव्ही, सोबत अस्सल स्थानिक पदार्थ खायला आणि समुद्राच्या लाटांच्या आवाज बॅकग्राउंडला हवा असेल तर तुमच्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. कारण समुद्रकिनाऱ्यापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मोरजीममध्ये ही जागा आहे. इनडोअर स्विमिंग पूल, आऊटडोअर गेम्स,  आणि प्रशस्त बागेचा आनंद तुम्ही घेऊ शकता. शिवाय रेस्टॉरंट आणि स्नॅक बार सोबत बाहेरील फायरप्लेस देखील इथे तुम्ही अनुभवी शकता.

या ठिकाणची किंमत तशी हंगामावर अवलंबून वेगवेगळी असते पण साधारण ३०० रुपये एक रात्र अशी भांड्यांची सुरुवात होते.

आता सगळं तर सांगितलं आहे… नाऊ एन्जॉय द गोवा बडी..!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.