पाकिस्तानी अधिकाऱ्यांमुळे अपहरण करण्यात आलेल्या ६६ भारतीयांचा जीव वाचला होता…!!!

१० सप्टेबर १९७६.

आणीबाणीचा काळ. सकाळचे साधारणतः साडेसात वाजले असतील. ‘इंडियन एअरलाईन्स’च्या बोईंग ७३७ या विमानाने दिल्लीतील पालम विमानतळावरून ६६ प्रवाशांना घेऊन जयपूरच्या दिशेने उड्डाण केलं होतं. जयपूरहून विमान आपल्या इप्सित स्थळी म्हणजे मुंबईला पोहोचणार होतं. कमांडर बी.एन. रेड्डी आणि आर.एस. यादव हे विमानातील पायलट होते.

विमानाचं अपहरण

विमानाने उड्डाण घेतलं आणि काही वेळेतच असं काहीतरी घडलं की विमानाचा जयपूरकडे जाणारा मार्ग बदलून विमानाने पाकिस्तानातील लाहोरच्या दिशेने भरारी घेतली. काही लोकांनी विमानाचं अपहरण केलं होतं. सय्यद अब्दुल हमीद दिवानी, सय्यद रफिक, मोहोम्मद  एहसान, अब्दुल रशीद मलिक, गुलाम रसूल आणि ख्वाजा गुलाम नबी हे ६ लोक या षड्यंत्राचे प्रमुख होते.

अपहरणकर्त्यांनी आर.एस. यादव यांना विमान लिबियाच्या दिशेने उडविण्याचा आदेश दिला होता. अशा कठीण प्रसंगी देखील आर.एस. यादव यांनी प्रसंगावधान राखलं आणि अपहरणकर्त्यांना ठामपणे सांगितलं की विमान लिबियाच्या दिशेने घेऊन जाण शक्य नाही, कारण त्यात पुरेसं इंधन नाही. फार फार तर जयपूरपर्यंत जाता येईल किंवा दिल्लीकडे परत जायला लागेल.

साहजिकच अपहरणकर्त्यांना यादव यांच्यावर विश्वास असण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यांनी एअर होस्टेस कडून ही बाब विचारून घेतली. एअर होस्टेसने देखील मोठ्या धैर्याने प्रसंगावधान दाखवत यादव यांच्याशी  सहमती दर्शविली. आता अपहरणकर्त्यांचा नाईलाज होता, पण त्यांनी जयपूर किंवा दिल्लीपेक्षा विमान पाकिस्तानात उतरविण्याची तयारी दाखवली आणि विमान लाहोरच्या दिशेने उडायला लागलं.

तोपर्यंत अपहरणकर्त्यांनी कमांडर बी.एन. रेड्डी यांना कॉकपिटमधून बाहेर काढत विमानाच्या टॉयलेटमध्ये बंदिस्त केलं होतं. प्रवाशांमध्ये दहशतीचं वातावरण होतं. विमान ज्यावेळी लाहोर विमानतळाच्या कक्षेत आलं त्यावेळी पायलट आर.एस. यादव यांनी लाहोर विमानतळावरील अधिकाऱ्यांना विमानतळावर विमान उतरू देण्याची परवानगी मागितली. सुरुवातीला अधिकाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला परंतु अपहरणकर्त्यांनी धमकावल्यानंतर शेवटी विमान लाहोर विमानतळावर उतरविण्यात आलं.

पायलट आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दाखवलं प्रसंगावधान

लाहोर विमानतळावर इंधन भरल्यानंतर आता विमान लिबियाच्या दिशेने घेऊन जाण्याचं फर्मान सोडण्यात आलं. परंतु पायलट आर.एस. यादव यांनी इथे एक चाल खेळली. त्यासाठी आपल्याला लिबियाच्या दिशेने जाणाऱ्या हवाई मार्गाचा नकाशा लागेल असं त्यांनी अपहरणकर्त्यांना सांगितलं. हा पाकिस्तानी अधिकाऱ्यांसाठी एक इशारा होता, जो ते तात्काळ समजून गेले. लाहोर विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्याने सध्या इथे हा नकाशा उपलब्ध नाही. तो कराची विमानतळावरून मागवावा लागेल आणि त्यासाठी वेळ लागेल, असं लाहोर विमानतळावरील अधिकाऱ्यांनी अपहरणकर्त्यांना सांगितलं.

पाकिस्तानकडून सहकार्य मिळत नसल्याचं बघून अपहरणकर्त्यांनी विमान नकाशाशिवाय लिबियाच्या दिशेने घेण्याचा आदेश दिला. परंतु आर.एस. यादव यांनी तसं करण्यास नकार दिला. यामुळे विमान दुसऱ्या कुठल्यातरी विमानाशी धडकू शकतं, असं त्यांनी सांगितलं. तोपर्यंत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी देखील अपहरणकर्त्यांचा विश्वास संपादन केला होता आणि कराचीहून नकाशा येईपर्यंत विमान लाहोर विमानतळावरच थांबवून ठेवण्यास ते तयार झाले होते. कराचीहून नकाशे येईपर्यंत रात्र झाली होती आणि आता लाहोर विमानतळावर मुक्काम करण्याशिवाय अपहरणकर्त्यांकडे दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नव्हता.

शेवटी रात्री २.३० वाजता विमानातील सर्व प्रवाशांना विमानतळावरील लाउंजमध्ये हलवण्यास अपहरणकर्ते तयार झाले. परंतु त्यांनी अशी अट ठेवली की विमानाच्या दोन्ही पायलटपैकी एकाने त्यांच्यासोबत विमानातच राहावं. अपहरणकर्त्यांची ही मागणी असं सांगून नाकारण्यात आली की जर दुसऱ्या दिवशी विमानप्रवास करायचा असेल तर दोन्ही पायलटना पुरेशी झोप आवश्यक आहे. शेवटी दोन्ही पायलटना प्रवाशांसोबत विमानतळाच्या लाउंजमध्ये जाऊ देण्यात आलं, एक अपहरणकर्ता प्रवाशांसोबत विमानतळाच्या लाउंजमध्ये आला.

सकाळच्या साधारणतः ५.३० वाजता पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी कमांडर बी.एन. रेड्डी आणि आर.एस. यादव या दोघांना झोपेतून उठवलं आणि त्यांना सांगण्यात आलं की, “तुम्ही प्रवाशांना घेऊन भारताकडे रवाना होऊ शकता. विमानाची सुटका करण्यात आली आहे. सर्व अपहरणकर्ते जेरबंद करण्यात आले आहेत” त्यानंतर लगेच सर्व विमान प्रवाशांना घेऊन विमान भारताच्या दिशेने झेपावलं आणि भारतीय वैमानिक जोडगोळी बी.एन. रेड्डी आणि आर.एस. यादव यांच्या तसेच लाहोर विमानतळावरील पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या धैर्यामुळे तसेच समयसूचकतेमुळे ६६ भारतीय प्रवाशांचे प्राण वाचविण्यात आले.

रात्रीत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी नेमकं काय केलं..?

पायलट आणि विमान प्रवाशांना विमानतळाच्या लाउंजमध्ये हलविण्यात आल्यावर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अपहरणकर्त्यांसाठी शाही मेजवानीची व्यवस्था केली. फक्त हे करत असताना त्यांनी अपहरणकर्त्यांना देण्यात आलेल्या पाण्यामध्ये बेशुद्धीचं औषध टाकलं. यामुळे पाणी पिल्यानंतर सर्वच अपहरणकर्ते बेशुद्ध झाले आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं. प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी थांबलेल्या अपहरणकर्त्याला देखील ताब्यात घेण्यात आलं आणि प्रवाशांची सुटका झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.