टायगर हिलवरचं पाकिस्तानी बंकर उडवायला भारताच्या मदतीला इस्त्रायल धावून आला होता

१९९९ सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या कारगिलच्या युद्धातील विजय हा भारतीय सैन्यासाठी आणि भारतीयांसाठी अभिमानाचं प्रतिक आहे. पाकिस्तानने धोक्याने सुरु केलेल्या या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता.

पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना या गोष्टीची कल्पना असेल की भारताच्या या कारगिल विजयामध्ये इस्रायलचा देखील खूप मोठा वाटा होता.

या युद्धातील इस्राइलच्या मदतीची भूमिका इतकी महत्वाची होती की जर ऐनवेळी अमेरिकेच्या दबावाखाली येऊन इस्राइलने भारताला मदत केली नसती तर कारगील युद्धाचा विजय लवकर झाला नसता.

इस्राइलची मदत भारताला मिळाली ती टायगर हिलवरचं पाकिस्तानी सैन्याचं बंकर उडवायला.

‘टायगर हिल’ची उंची बघता जमिनीवरून हल्ला करण्याचा तसाही काही उपयोग नव्हता. त्यामुळे एअर फोर्सच्या मदतीनेच ते लक्ष्य साधनं आवश्यक होतं. या हल्ल्यासाठी लागणारे बॉम्ब भारताकडे होते, पण ते वेगळ्या हल्ल्यासाठी राखीव ठेवण्यात आले होते.

‘टायगर हिल’ मोहिमेसाठी हे बॉम्ब वापरणं म्हणजे येत्या काळातील संभावित मोठ्या युद्धासाठीचा युद्धसाठा संपवण्यासारख होतं.

या संकटसमयी इस्राइल भारतासाठी संकटमोचक बनून आला.

भारताने १९९७ सालीच इस्राइल बरोबर लायटनिंग इलेक्ट्रो ओप्टीकल टार्गेटिंग पोड्सच्या खरेदीचा करार केला होता, परंतु त्याची डिलिव्हरी व्हायला अजून बराच वेळ बाकी होता. असं असतानाही ज्यावेळी भारताने मदत मागितली त्यावेळी इस्राइलने आपले इंजिनिअर पाठवून पॉडसची व्यवस्था करून दिली.

पॉडस तर मिळाले पण आता अडचण होती, की फायर जेटवर पॉड बसविण्यात आल्यानंतर त्यावर बॉम्ब कुठले वापरायचे ही. कारण या पॉडसवर वापरण्यात येणारे बॉम्ब भारताला अमेरिकेकडून मिळणार होते आणि भारताच्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर अनेक प्रतिबंध घातले होते. साहजिकच अमेरिकेकडून कुठलीच मदत मिळणार नव्हती.

मदत मिळणं तर सोडाच इस्राइलने देखील भारताला मदत करू नये, यासाठी अमेरिकेने इस्रायलवर दबाव निर्माण करायला सुरुवात केली होती.

अशा वेळी भारतीय वायू सेनेने तेच केलं जे करण्यासाठी भारतीय प्रख्यात आहेत. वायू सेनेने जुगाड टेक्नोलॉजीचा वापर करायचं ठरवलं. ही जुगाड टेक्नोलॉजी म्हणजे फ्रांसमध्ये बनविण्यात आलेल्या फायर जेटवर इस्राइलने दिलेल्या इलेक्ट्रो ओप्टीकल टार्गेटिंग पॉडस बसविल्यानंतर त्यामध्ये भारतीय वायू सेनेकडे असलेले बॉम्ब वापरण्याची योजना.

भारतीय वायूसेनेकडील बॉम्ब इस्राइलच्या पॉडसवर बसवून त्याची चाचणी त्यापूर्वी घेण्यात आली नव्हती. थेट युद्धातच हा प्रयोग होत होता. त्याशिवाय दुसरा पर्याय देखील उपलब्ध नव्हता. भारतीय वायू सेनेने योजना बनविली आणि टायगर हिलवर हल्ला करण्यात आला. इस्राइलकडून आलेल्या पॉडसमधली सगळ्यात विशेष गोष्ट अशी होती की या पॉडसवरील कॅमेऱ्यामुळे लक्ष्याचा फोटो दिसू शकत होता आणि त्यामुळे अचूक लक्ष्यभेद करणं सोपं होतं.

तारीख होती २४ जून १९९९.

वायू सेनेने ठरवलेल्या योजनेनुसार टायगर हिलवर हल्ला करण्यात आला. वायू सेनेचा हा हल्ला प्रचंड यशस्वी ठरला. या हल्ल्याने टायगर हिल्सवरील पाकिस्तानी बंकर उध्वस्त करण्यात आले. ‘टायगर हिल’वरील पाकिस्तानी बंकरमधील ५ अधिकारी मारले गेले.

या हल्याचं व्हिडीओ फुटेज २५ तारखेला रिलीज करण्यात आलं, जे आजदेखील युट्युबवर उपलब्ध आहे.

हल्ल्याने घाबरलेल्या पाकिस्तानी सैन्याने टायगर हिलवरून आणि इतरही ठिकाणांहून पळ काढायला सुरुवात केली. टायगर हिल्सचा विजय हा भारतासाठी कारगिल विजयामधील महत्वाचा टप्पा होता. तिथूनच पाकिस्तानची पीछेहाट व्हायला सुरुवात झाली. इस्राइलच्या मदतीमुळे भारतासाठी हा विजय सोप्पा झाला होता.

कारगिलपूर्वी देखील १९७१ सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारताला इस्राइलकडून मदत मिळाल्याची माहिती श्रीनाथ राघवन यांनी लिहिलेल्या “१९७१- ए ग्लोबल हिस्ट्री ऑफ क्रिएशन ऑफ बांगलादेश” या पुस्तकात वाचायला मिळते.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.