इंदिरा गांधीना पाकने पाठवलेल्या आंब्याच्या पेटीमुळे भारत-पाक मध्ये राडा झाला होता.
भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणावाच वातावरण आहे. म्हणजे हे वातावरण शांत होण्यास सुरवात झाली आहे अस सध्या म्हणायला हरकत नाही, पण भारत पाकिस्तान म्हणलं की कधीही काहीही होवू शकतं. आत्ता हा विषय देखील तसाच म्हणजे एक आंब्याची पेटी भारत पाकिस्तानच्या वादाला कारणीभूत ठरली होती. बर हि काय साधीसुधी आंब्याची पेटी पण नव्हती, हि पेटी चक्क पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल झिया-उल-हक यांनी गिफ्ट म्हणून इंदिरा गांधीनी पाठवलेली आंब्याची पेटी होती.
आंब्याची पेटी ठरली वादाच कारण.
तर हा किस्सा आहे १९८१ सालचा. त्यावेळी भारताच्या प्रधानमंत्री पदावर विराजमान होत्या इंदिरा गांधी आणि राष्ट्रपती होते नीलम संजीव रेड्डी. आपल्या शेजारी पाकिस्तानच्या अध्यक्षपदावर आरूढ होते जनरल झिया-उल-हक. त्यावेळी झिया-उल-हक यांनी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांना आंब्याची पेटी भेट म्हणून पाठवली होती. शिवाय हे आपल्या देशातील सर्वात चांगले आंबे असल्याचं सांगितलं होतं.
इंदिरा गांधी यांनी हे आंबे खाल्यानंतर त्यांना ते इतके आवडले की इंदिरा गांधींनी जनरल झिया-उल-हक यांना पत्र लिहिलं आणि पत्रात आंब्यांच्या गोडव्याचं खूप कौतुक देखील केलं. ‘फक्त पाकिस्तानात मिळणारे’ हे आंबे आपल्याला खूप आवडल्याचं त्यांनी हक यांना कळवलं.
झालं जशी ही बातमी माध्यमांमध्ये आली त्यानंतर लगेचंच उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील रटौल या गावातील लोकांचा एक ग्रुप इंदिरा गांधींना भेटला आणि पाकिस्तानकडून इंदिरा गांधींना पाठविण्यात आलेल्या आंब्यांची जात कशी मूळ भारतातली आहे ते त्यांनी इंदिरा गांधींना पटवून सांगितलं.
यावरूनच भारत-पाकिस्तान या दोन राष्ट्रात आंब्याच्या या जातीच्या मालकीवरून वाद निर्माण झाला.
मित्रत्वाचे संबंध स्थापन करण्यासाठी पाठविण्यात आलेले आंबे भारत-पाकिस्तान या शेजाऱ्यांना भांडण्यासाठी अजून एक कारण देऊन गेले.
आंब्याची ही जात नेमकी होती तरी कोणती..?
आंब्याच्या ज्या जातीच्या मालकीवरून भारत आणि पाकिस्तानात वाद आहे ती जात भारतात ‘रटौल’ या नावाने तर पाकिस्तानात ‘अनवर रटौल’ या नावाने ओळखली जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात उत्तर प्रदेश मधील बागपत जिल्ह्यातील ‘रटौल’ या गावातील रहिवासी अन्वारुल हक यांनी आंब्याची ही जात विकसित केली आणि गावाच्या नावरून तीला ‘रटौल’ असं नांव दिलं. आंब्याची ही जात अल्पावधीतच उत्तर प्रदेशात खूप लोकप्रिय झाली. १९३६ साली लंडन येथे भरलेल्या आंबा महोत्सवात तर या आंब्यांना ‘जगभरातील सर्वोत्कृष्ट आंबा’ म्हणून देखील गौरविण्यात आलं.
फाळणीनंतर अन्वारुल हक यांचे चिरंजीव अबरारूल हक हे पाकिस्तानात स्थलांतरित झाले. जाताना ते आपल्यासोबत ‘रटौल’ ही घेऊन गेले. पाकिस्तानात जाऊन स्थायिक झाल्यावर त्यांनी त्या भागात ‘रटौल’चं झाड लावलं आणि आपल्या वडिलांच्या सन्मानार्थ त्यांनी आंब्याचं नामकरण ‘अनवर रटौल’ असं केलं. भारताप्रमाणेच पाकिस्तानात देखील हा आंबा खूप लोकप्रिय झाला.
तो इतका लोकप्रिय झाला की या आंब्यावर पाकिस्तानच्या पोस्टाने टपाल तिकीट देखील काढलं. बाकी तो आंबा कुणाचा हे काश्मीर प्रश्नासारखच चिघळत ठेवण्यात आलं.
हे ही वाचा –
- इंदिरा गांधीनंतर सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून आर.के. धवन यांच नाव घेतलं जायचं !
- इंदिरा गांधीचं राष्ट्रपती होण्याचं स्वप्न अपुर्ण का राहिलं?
- इंदिरा गांधींनी आणीबाणी का लागू केली होती..?