सात-बारा उतारा आला तरी कुठणं ?

सातबारा. ह्यो आकडा उभ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जीव की प्राण. तलाठी नावाच्या डॉन माणसाच्या हातात हा जीव असतो.

आमच्या इकडं लग्नाला पोरी देताना पोरग्याचा शिक्षण नोकरी न्हाई त्याच्या बापाचा सातबारा उतारा बघत्यात. आता पुण्यामुंबईचे भिडू इचारात पडले असतील.

हे सातबारा हाय तरी काय नेमक प्रकरण? 

शाळेत असताना आमच्या एका सरानी ऑफ तासाला गोष्ट सांगितलेली.

“अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या प्रजेला प्रत्येक घरटी १२ फळझाड अंगणात लावायला दिलेली. त्यातली सात झाडं प्रजेची आणि ५ झाड सरकारची. प्रजेन झाडाची निगा राखायची आणि सात झाडाची फळ खायची. उरलेल्या पाच झाडाची फळ सरकार दरबारी जमा करायची. ही सगळी नोंद ज्या कागदावर केलेली त्याला पुढ सात-बारा म्हणायला लागले.”

आता या गोष्टी पूर्वापार सांगत चालत आलेल्या. एमपीएससीचा अभ्यास करताना सातबाराचा लिखित इतिहास कळाला.

सात-बारा उतारा आला कुठणं ?

तर १९४८ ला एक कायदा आपल्या राज्याच्या विधीमंडळान पास केलेला. बॉम्बे लँड अॅक्वीजीशन अॅक्ट. या कायद्याच्या ७व्या आणि १२व्या सेक्शनमध्ये जमिनीच्या मालकीच्या संदर्भातन उल्लेख आहे. या  ७ आणि १२ कलमामुळे जमीन मालकीच्या कागदाला सात-बारा उतारा म्हणत्यात.  तेव्हा महाराष्ट्र राज्य नव्हत तर बॉम्बे राज्य होत.यात गुजरात येत होत. म्हणून ह्यो सात-बारा तुम्हाला गुजरात मध्ये पण दिसंल.

महाराष्ट्र राज्य बनवल्यावर या कायद्यात अजून सुधारणा केल्या आणि आला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६.

या कायद्याखाली जमिनीच्या हक्काच्या सगळ्या नोंदी रजिस्टरबुक मध्ये लिवलेल्या असत्यात. यात कुळाचे मालकी हक्क, जमिनीच मालकी हक्क, त्या जमिनीमधल्या पिकाच मालकी हक्क असल्या सगळ्या गोष्टी असत्यात. या बुकाबरोबर असत्यात २१ प्रकारचे गाव नमुने. या गाव नमुन्यमध्ये असत्यात ७ नंबरचा गाव नमुना आणि १२ नंबर चा गाव नमुना.

७ नंबरचा गाव नमुना ह्यो असतो अधिकारपत्रक आणि १२ नंबर असतो पिक पाहणी पत्रक.

बरं चला मानलं. पण या सात-बाऱ्याच्या कागदात लिवलं असतय काय?

तर यात असतय जमीन मालकांची, कुळाची , भोगवटाधारकाची नावं. जमीनीचा पत्ता, सर्व्हे नंबर, एरिया, शेजारच्या हद्दी वगैरे. फक्त एवढंच नाही तर जमीन पाण्याखाली आहे की जिरायती आहे हे पण सांगितलेलं असतय.

तुमच्या जमीनीच मूळ, तुम्हाला तुमची जमीन विकता येते की न्हाई हे पण त्यात असतय. सगळ्यात महत्वाच तुमच्या जमिनीवर बोजा किती आहे? म्हणजे तुम्ही जमिनीच्या नावावर बँकेचं कर्ज किती उचललं आहे? हे पण असतय.

आता तुमचं कुळ आणि मूळ सगळ तेच्यात मांडल्यावर पोरीकडचे पाव्हणे तुमचा सातबारा बघून तुम्ही किती पाण्यात हायसा ते ओळख्त्यात. 

असा ह्यो सातबाराचा कागद सरकारी दप्तरात अनेक गोष्टीसाठी दाखवावा लागतो. प्रत्येकवेळी तो ताजा काढून आणावा लागतो. एक काळ हुता जेव्हा आपला सातबारा मिळवण्यासाठी चावडीवरच्या तलाठ्याच पाय धरावं लागायचं. पाच-पन्नासची नोट सरकवली की उतारा मिळायचा.

आता मागच्या फडणवीस सरकारनं ऑनलाईन सातबारा मिळवून द्यायची सोय केली.

त्या माजी मुख्यमंत्र्याला आम्ही शेतकरी बाकीच्या गोष्टीला किती का नावं ठेवेना पण त्यान सातबाराच तेवढ एक काम बेस केलं. त्यानं त्यो कागद कोरा केला असता तर ते पुन्हा आलं पण असतं. असो

तर भिडूहो असा ह्यो सातबारा आमच्या जिव्हाळ्याचा कागद.

ह्याच्यासाठी सुरु झालेली भांडण कोर्टाच्या पायरीवर चढत्यात . या कागदात एवढी ताकद असते की आम्ही शेतकऱ्याची पोर त्याच्या जीवावर पुण्यामुंबईला पण हातपाय मारतो. आता त्या कागदाला कोणी हात घातला तर मुळशी पॅटर्न सारखे पिक्चर येत्यात.बरोबर ?

हे ही वाचा भिडू.

1 Comment
  1. Hanumant Shenmare says

    माहिती खूप छान आहे भिडू
    एकदा आडनाव कशी आली हे पण जर विस्ताराने सांगितलं तर बरं होईल,
    म्हणजे माझं आडनाव आहे शेनमारे मग हे आडनाव कस आलं असेल .

Leave A Reply

Your email address will not be published.