मुळशी पॅटर्नचा….नवा अध्याय कुठेही घडू शकतो !

काल प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट पाहिला. बऱ्याच वर्षानंतर अंतर्मनाला भिडणारा आणि वास्तवतेवर भाष्य करणारा एक दर्जेदार मराठी चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले.

शेती ‘विकायची नसते, तर कर्तृत्वाने ती राखायची असते’ असा मॅसेज देतानाच गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणाईच्या आणि शेतकऱ्यांची कुचंबना करणाऱ्या व्यवस्थेच्या कानाखाली जाळ काढण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकाने केला आहे.

या चित्रपटातील गोष्ट जरी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांची असली तरी या कथेचा एकसमान धागा सर्वत्रच असल्याचे जाणवतो. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी कॉर्पोरेट कंपन्या, बिल्डर लॉबी, दलाल, एजंटांनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या. मात्र शेतजमिनीच्या विक्रीतून मिळालेला पैसा संपल्यानंतर तेथील शेतकऱ्यांची व त्यांच्या कुटुंबांची झालेली परवड आणि संघर्षाची परिस्थिती, त्यातून तरुण पिढी कशी गुन्हेगारीकडे वळते याचं वास्तवदर्शी चित्र मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून झालेला आहे.

हा चित्रपट पडद्यावर पाहत असताना माझ्या डोळ्यासमोर मात्र आमच्या तासगाव-कवठे-महंकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर असणाऱ्या काही गावातील शेतकऱ्यांचे चित्र डोळ्यासमोर उभे राहत होते.

दहा-पंधरा वर्षापुर्वी सुझलॉन एनर्जी नावाच्या कंपनीने पवनचक्या उभारण्यासाठी घाटमाथ्यावरील गावांचा सर्व्हे केला आणि बघता-बघता या भागात शेतजमीनी खरेदी-विक्री करणाऱे दलाल, एजंटांच्या टोळ्या या भागात घिरट्या घालू लागल्या. या कंपनीत मोठ-मोठे राजकारणी, अधिकाऱ्यांची भागिदारी असल्याची चर्चाही त्यावेळी झाली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही स्थानिक गाव पुढाऱ्यांना, गावटग्यांना हाताशी धरुन येथील शेतकऱ्यांच्या जमिनी चढ्या भावाने खरेदी करण्याचा सपाटाच लावला.

सुझलॉन कंपनी येण्यापूर्वी या भागातील जमिनीचा भाव अगदी २०-२५ हजार रुपये एकर असा होता.

मात्र कंपनीकडून या जमिनी थेट दीड-दोन लाख रुपये भाव मिळू लागल्याने इथल्या शेतकऱ्यांच्याही तोंडाला पाणी सुटले आणि पैशाच्या अमिषापोटी, दलाल, एजंटाच्या भूलथापांना बळी पडून येथील शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात जमिनी विकल्या.

काल पर्यंत शेतीतून मिळेल त्या उत्पन्नात गुण्यागोविंदाने राहणारी गावे आणि गावातील माणसं हाती ताजा-ताजा पैसा पडताच, उंडारल्यागत करु लागली, पैशाच्या उपलब्धतेमुळे कालपर्यंत सायकलचं पायडंल हाणत फिरणाऱ्या पोरांच्या बुडाखाली टू व्हिलर आणि बैलगाडीतून फिरणाऱ्या बापाच्या बुडाखाली फोरव्हिलर आली.

घरटी गाड्या खरेदी करण्याच्या स्पर्धेने घाटमाथ्यावरच्या गावात नुसता धुरळा उडू लागला.

जमीनीच्या खरेदी-विक्रीवरुन गावातील शांतता जाऊन वर्चस्ववाद निर्माण झाला, पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन कुटंबामध्ये, नातेवाईकांमध्ये कलह निर्माण होऊ लागले. लोक पोलीस स्टेशन आणि कोर्ट कचेऱ्याच्या पायऱ्या झिजवू लागले, कंपनीच्या कत्रांटावरुनच टोळीवाद निर्माण झाला. राजकीय नेत्यांनी देखील येथील कार्यकर्त्यांचा पुरेपुर राजकारणासाठी वापर करुन घेतला.

पुर्वी गावात जत्रेला कसाबसा एखादा होणारा तमाशा आणि ऑर्केस्टा ऐवजी आता गटातटाचे राजकारणातून आणि सत्ता स्पर्धेतून दोन-दोन तमाशे, ऑर्केस्ट्रॉ आणि त्यात भरीसभर म्हणून लावण्यांचे कार्यक्रम होऊ लागले. त्यामुळे एकप्रकारे गावातील शांतता जावून दहशतीचे वातावरण निर्माण झाले, त्यातून या भागात हाणामाऱ्यांचे प्रकार घडू लागले.

कधीही गुन्हेगारीची पार्श्वभूमी नसणाऱ्या गावांमधून आतापर्यंत पाच-सहा लोकांचे मुडदे पडले गेले.

अनेक तरुणांवर गुन्हे नोंद झाले, त्यामुळे त्यांचे शैक्षणिक व नोकरीचे भवितव्य अंधारमय बनले. ज्या युवकांचे खून झाले त्यांचे संपूर्ण कुटूंबच उघड्य़ावर पडले. खुनाच्या आरोपात तुरंगात गेलेल्या एका व्यक्तीची तर त्यावर्षी चार एकर द्राक्षबाग सुकून गेली. लाखो रुपयांचे त्याचे नुकसान झाले. पोलीस स्टेशन आणि कोर्ट कचेरीच्या हेलपाट्याने दोन्ही बाजूची मंडळी पुरती बेजार होऊन गेली. एकदंरीतच त्यावेळी परिस्थिती खूपच कठीण बनली होती.

तरुण पिढी मोठ्याप्रमाणात गुन्हेगारीकडे वळाली होती.

आज या ठिकाणी याला हाणला, त्याला तुडवला, त्याने तमाशाच्या स्टेजवरच गाडी घातली, आज तालुकाप्रमुखाला बडविला, त्याला भोसकला अशा बातम्या रोजच ऐकायला आणि पेपरमधून वाचायला मिळू लागल्या…

घाटमाथ्यावरची गावे शांतता हरवून बसली. काळ्या आई समान जमिनी येथील लोकांनी विकून खाल्ल्या. आज इतक्या वर्षांनी मागून वळून पाहिलं की आजची परिस्थितीत लोकांच्या हाती आलेला पैसा संपून गेला. विकलेल्या जमिनीत आता भिरभिरणाऱ्या पंख्याशिवाय दुसरे काहीच नाही, नवीन उद्योग नसल्याने युवकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे.

ज्या जमिनी शिल्लक होत्या आता त्यांच्या वाटण्या होऊन भावा-भावात तुकड्या-तुकड्यात वाटल्या गेल्या आहेत. त्यात उरल्या शेतीलाही दुष्काळामुळे पाणी नाही, शिकलेल्या पोरांच्या हाताला रोजगार नाही. सुरुवातीला पवनचक्कीवर वॉचमन म्हणून काम करणाऱ्यांना शेतकऱ्यांना आता सुझलॉन कंपनीने घरचा रस्ता दाखविला त्यामुळे त्यांचाही रोजगार बुडाला आहे.

आज घाटमाथ्यावरची हजारो एकर जमिन कंपनीच्या ताब्यात आहे. त्यावर पवनचक्क्या फिरत आहे. आज जरी या जमिनीवर पवनचक्क्या फिरत असल्यातरी कदाचित उद्या या कंपनीकडून नवीन उद्योग देखील भागात उभारले जाऊ शकतात. त्यावेळी मुळशी पॅटर्न सारखीच परिस्थिती येथील स्थानिक शेतकरी आणि कंपनी यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही….

अशा वेळी एखादा राहूल्या उद्विग्न मानसिकतेतून……….

नांगरासकट बैलजोडी तयार ठेवून व्यवस्थेविरोधात लढायलाही तयार होऊ शकतो आणि मुळशी पॅटर्नचा नवा अध्याय याभागातही घडू शकतो.

 – अभिजीत झांबरे.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.