म्हणून ‘गली बॉय’ हा फक्त गाण्यांचा नाही, रोजच्या आयुष्यातल्या व्हॅलेंटाईन्सचा पिक्चर आहे…
पिक्चर सुरू होतो, काही पोरं मिळून गाडीची चोरी करतायत या सीनपासून. ही चोरी मजा-मस्तीसाठी नसते, त्यांच्या मूलभूत गरजा याच चोरीतून भागत असतात. तिथून सुरू झालेला पिक्चर धारावीची वस्ती, गरीब-श्रीमंतीच्या दरी पलीकडं गेलेलं प्रेम, आपल्या मोठ्या स्वप्नांचा धसका घेणारा बाप, खस्ता खाऊनही लग्न टिकवणारी आई आणि सगळ्याच्या पलीकडं जाणारी दोस्ती दाखवतो…तो पिक्चर म्हणजे गली बॉय.
आपली येडी जनता अपना टाईम आयेगाची मापं काढत राहिली आणि गली बॉयनं आपल्याला एक लय भारी स्टोरी सांगितलीये हे विसरुन गेली. व्हॅलेन्टाईन्सचा मुहूर्त साधत हीच ती लय भारी गोष्ट…
मुराद आणि सफिना
ही हिरो आणि हिरॉईनची जोडी. मुरादच्या घरात जितक्या खोल्या होत्या, त्यापेक्षा जास्त माणसं होती. ड्रायव्हर बाप आणि घरोघरी टिफिन देणारी आई, त्यातून शिक्षण पूर्ण करणारा मुराद. दुसऱ्या बाजूला सफिना. जिचे वडील डॉक्टर, ज्यांना एक नवा आयपॅड घेणंही जड वाटत नाही. या जोडीचं प्रेम फुलतं, बहरतं. मुरादसाठी सफिना दोन पोरींची डोकी फोडते. तिचं कारण सिम्पल असतं, ‘एकही लाईफ हैं, एकही तू हैं..!’ तिचं डेरिंग तिला मुरादपर्यंत पोहोचवतं आणि आपल्याला वाटत राहतं… आपणही डेरिंग केली असती तर…
मुरादच्या आयुष्यात सफिनाचं स्थान काय आहे, हे तर एका डायलॉगमधून समजतं… ‘सफिना के बिना मेरा जिंदगी ऐसा हो जायेगा, जैसे बिना बचपन के बडा हो गया…’ आपलं लहानपण आपली व्हॅलेन्टाईन होतं भिडू… आपण कधी विचारच केला नाही..!
मुरादची गरिबी आणि त्याची स्वप्न यात अंतर खूप होतं, पण सफिनाचा सल्ला साधा होता.. ‘तुझे जो करने का है तू कर.’ ती स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग सोडत नाही आणि मुरादच्या स्वप्नांचा पूलही बांधून देते.. अगदी सहज.
व्हॅलेंटाईनची गोष्ट इथंच थांबत नाही. मुरादच्या आयुष्यात लय मॅटर झालेले असतात, तो मित्र मोईनकडे मदतीसाठी जातो आणि त्याला म्हणतो, ‘में बहोत मुश्किल में है भाय.’ मोईनचं उत्तर असतं, ‘आसान किसके लिए है?’ मोईन आणि मुरादची गोष्ट ही तितकीच भारी, एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी चोरी करतो, मार खातो पण पोलिस चौकीत नाव फोडत नाही, एकमेकांवर हात उगारुनही त्यांची मैत्री तुटत नाही. दोस्तासारखा पार्टनर नाही भिडू…
मुरादचा दुसरा मित्र म्हणजे एमसी शेर. शेर त्याला हिपहॉपच्या वाटेवर आणतो. त्याला पुढे नेतो, तेही स्वतः एक पाऊल मागे राहून. त्याला अगदी छोट्यात छोटी गोष्ट समजून सांगतो. आपल्या आयुष्यात असे कित्येक मित्र असतील, ज्यांनी आपल्या प्रगतीसाठी एक पाऊल मागे घेतलं आणि आपण यशस्वी झाल्यावर आपल्याला घट्ट मिठीही मारली. आज त्यांना तेवढं हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे म्हणायला विसरू नका भिडू…
मुरादला आणखी प्रोफेशनल करण्याचं, त्याला पैसे मिळवून देण्याचं काम स्काय करते. तिच्या घरातलं बाथरूमही मुरादच्या घराच्या हॉलपेक्षा मोठं असतं. दोघांच्या परिस्थितीत खऱ्या अर्थानं जमीन अस्मानाचा फरक असतो, मुरादची गर्लफ्रेंड स्कायच्या डोक्यात बाटली घालते, मुराद स्कायच्या प्रेमात आहे असं वाटत असतानाच तो तिला सफिनाबद्दल सांगतो. पण मुरादला दिलेली गाण्याची साथ काय स्काय सोडत नाही. आपल्या आयुष्यातही अशी अंतर मिटवणारी, आपल्याला बाहेरच्या जगाची ओळख करुन देणारी एक मैत्रीण असते भिडू… आजचा व्हॅलेंटाईन डे तिचाही आहे…
एमसी शेरची गर्लफ्रेंड फॉरेनर असते, हे बघून आपण हँग झालो, पण शेर त्यांच्या व्हॅलेंटाईनची गोष्ट अगदी सोप्या लाईनमध्ये सांगतो… ‘अपने लोगो में जात-जुत और जबान देखते है, इन लोगो का सिस्टीम कूल है… डायरेक्ट आँख में देखते है.’ विषय एन्ड.
या गोष्टीतल्या अजून दोन गोष्टी सांगायच्या राहिल्या…
रझिया अहमद- मुरादची आई. आपला ड्रायव्हर नवरा घरात सवत आणून ठेवतो आणि रझियाचा धीर सुटतो. बापाच्या दुसऱ्या लग्नावर मुराद एक शब्दही बोलत नाही, पण हाच बाप जेव्हा आईवर हात उचलतो… तेव्हा बापाला मारण्यात मुराद पुढचा मागचा विचार करत नाही. कारण याच आईनं त्याला त्याच्या कलेचं कौतुक केलेलं असतं, त्याच्या स्वप्नाला जपलेलं असतं… स्वतःला स्वप्न बघायची भीती वाटत असूनही. जेव्हा मुराद जॉबला लागतो तेव्हा त्याच्या ताटात बोटी वाढताना ती हात आखडता घेत नाही, कारण तिची भीती मेलेली असते. रझियानं कधी व्हॅलेंटाईन डे साजरा केला असेल काय? तिला कधी कुणी हॅपी व्हॅलेंटाईन डे म्हणलं असेल… अगदी मुराद तरी? नसेल म्हणला.. तर म्हणायला हवं भिडू…
मुराद सगळ्यात खास गोष्ट म्हणजे त्याचं स्वप्न, रॅपर बनायचं!
त्यासाठी तो काय करत नाही? घराच्या माळ्यावर रात्री-बेरात्री लिहीत बसतो, जबरदस्त अपमान पचवूनही पुन्हा स्वतःच्या स्वप्नासाठी उभा राहतो, बापाची नोकरी जाऊ नये म्हणून ड्रायव्हरचं काम करतो, कित्येक चुका करतो पण प्रयत्न करणं सोडत नाही. हाताशी आलेली नोकरी सोडतो, श्रीमंत आणि तयारीच्या रॅपर्स समोर छाती ठोकत उभा राहतो आणि म्हणतो…
मुराद से लेके गली बॉय तक, की मेहनत मैने बहोत है..!
आपल्या स्वप्नांवर मुरादनं इतकं प्रेम केलं होतं की, त्यानं स्वतःशी एक गोष्ट ठरवली होती…
में मेरा सच्चाई बदलेगा, जो मेरे सपनेसे मेल खायेगा…
त्याचं स्वप्न, त्याची व्हॅलेंटाईन होतं. आपलंही असायला हवं भिडू. कारण लोकांनी कितीही क्रिंज म्हणलं तरी, अपना टाईम आयेगा हे स्वतःला बजावत राहिलं पाहिजेच की. स्वप्न पाहणं ही सुद्धा लय भारी गोष्ट आहे, अगदी प्रेम करण्यासारखीच..! हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे.. ज्यांना म्हणायचं राहिलंय त्यांना म्हणून टाका..
हे ही वाच भिडू:
- दोघांमधलं ‘प्रॉमिस’ टिकण्यामागचं कारण ‘युनिनॉर’चं सिमकार्ड होतं…
- मार्केटमध्ये सिल्क आली आणि चॉकलेट डे खिशाला महाग पडू लागला…
- UPSC वाला शेवटी तलाठी होतो इतक खरं “नेमाडे” सांगतात.