वफा बेगमने पतीला सोडवण्याच्या बदल्यात कोहिनूर महाराजा रणजित सिंहाला दिला होता

ब्रिटिशांनी जगाला किती जरी लोकशाहीवर लेक्चर दिलं तर तुमच्यावर अजूनही राणीचं राज्यं कसं आहे याचं उत्तर त्यांच्याकडे नसतं. राणीचं राज्य जरी प्रतीकात्मक असलं तरी तुम्ही त्या पदाला तुम्ही अजून का ठेवलं आहे हे इंग्रजांना अजूनही नीट सांगता येत नाही. पण ब्रिटिशांचं दोगलापण फक्त एवढ्यापुरतंच मर्यादित नाहीये. त्यांचं साम्राज्य जेव्हा जगभर पसरलं होतं तेव्हा ब्रिटिशांनी आशिया-आफ्रिकेतील देशातून अनेक मौल्यवान वस्तू नेल्या होत्या. आणि याच लुटीच्या वस्तूंच्या जीवावर आज ब्रिटनमध्ये अनेक म्युझियम्स उभे आहेत.

भारतातून अश्याच ब्रिटिशांनी नेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये सर्वात मौल्यवान गोष्ट आहे कोहिनुर हिरा.

हा ब्रिटिशांनी चोरून नेला असं काहीकाळ म्हंटल जात होत. पण नंतर २०१८ मध्ये भारतीय पुरातत्व विभागने दिलेल्या माहितीनुसार, १८४९ साली लॉर्ड डलहौसी आमणि महाराजा दिलीप सिंह यांच्यामध्ये लाहोर करार संपन्न झाला होता. लाहोरच्या महाराजांनी इंग्लंडच्या महाराणीकडे हा हिरा सोपवला होता. या करारावेळी महाराजा रणजीत सिंह यांचे उत्तराधिकारी महाराजा दिलीप सिंह उपस्थित होते. जे केवळ नऊ वर्षांचे होते. त्यामुळे कोहिनूर हिरा ब्रिटिशांना सोपवण्यात लाहोरच्या राजानेच महत्त्वाची भूमिका बजावली होती.

पण हा हिरा खरं तर मुघल व फारसी राज्यकर्त्यांकडून रणजित सिंहाकडे आला होता.

मोगलांच्या मयूर सिंहासनाला शोभा व मूल्य आणलं ते कोहिनूरने. पण नादिरशहाने जेव्हा दिल्लीची लूट केली तेव्हा कोहिनूर हिरा ही त्या अभिमानाची लूट होती. पुढे हा हिरा अहमदशहा अब्दालीच्या हाती गेला. १८१३ मध्ये तो दुराण्यांचा राजा शाह सूझा याच्याजवळ होता. इ. स. १८०९ मध्ये आपली गादी गमाविल्यावर या सुझा ला काश्मीरमध्ये एक कैदी म्हणून त्याला ठेवण्यात आलं होतं.

आपल्या नवऱ्याच्या शारीरिक छळाच्या वा मृत्यूच्या भयाने सूझाची पत्नी वफा बेगम रणजीतसिंहाला भेटली आणि काश्मीरवरील आपल्या स्वारीत शहाची सुटका करण्याची विनंती रणजित सिंहाला केली.

तिचा पती सोडवण्याच्या बदल्यात तिने कोहिनूर हिरा रणजित सिंहाला देण्याच मान्य केलं.

त्याप्रमाणे आपल्या मोहिमेच्या अखेरीस रणजितसिंहान शाहची सुटका केली. नंतर लाहोरमध्ये मोठ्या समारंभाने त्याच स्वागत केलं. त्याची बेगम आणि इतर अफगाण निराश्रित ज्या राजवाड्यात वास्तव्य करून होते तिथं शाहला त्याच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आले. नंतर ठरल्याप्रमाणे रणजितसिंहान कोहिनूरची मागणी केली. पण कोहिनूरच काय त्याला साधं उत्तरही मिळालं नाही. रणजितसिंहाने आपले दूत अनेकदा पाठविले पण काहीतरी कारण काढून तो कोहिनूर देण्याच वफा बेगम टाळत होती.

अशी उडवाउडवीची उत्तर यायला लागल्यावर रणजितसिंहाने वफा बेगम तिचा नवरा शाह सुझा यांच्यावर कडक पहारा बसवला. त्या दोघांच्या आणि अफगाण नागरिकांच्या निवासस्थानी जाणारा शिधा रणजितसिंहांच्या सैन्याने रोखायला सुरुवात केली. शेवटी हिरा द्यायला शाह आणि त्याची बायको राजी झाले.

त्याप्रमाणे हिरा देण्यासाठी १ जून १८१३ हा दिवस निश्चित करण्यात आला. काही घोडेस्वारांसह रणजित सिंह जातीने उपस्थित राहिला. उभयतांनी एकमेकांना आलिंगन दिले. त्यानंतर शाहच्या एका नोकराने जनानखान्यातून एक गाठोडे आणले व ते रणजितसिंहाला दिले. ते उलगडल्यावर त्यांना आत एक हिरा आढळला. पण खरोखरीच तो कोहिनूर आहे की नाही हे पारखण्यासाठी रणजितसिंहाने तो सोबतच्या मंडळीपैकी एकाला दाखविला. त्याप्रमाणे समाधान होताच, शाहचे आभार वगैरे न मानता किंवा त्याचा निरोप न घेता रणजितसिंह तिथून एकदम निघून गेला.

नंतर रणजितसिंहाने तो हिरा जवाहिऱ्यांना दाखविला. तेव्हा तो कवडी मोल असल्याचे त्यांनी सांगितल. तेव्हा रणजितसिंहाने आपली माणसे पाठवून शाह व त्याच्या कुटुंबीयांजवळचे सगळेच जडजवाहीर काढून आणले. यामुळे शाहच्या कुटुंबियांवर दुःख-विषण्णता पसरली. शाहने तर जेवण करणं सोडले होत असं सांगतात. अशाप्रकारे कोहिनुर हिरा रणजितसिंहांच्या तिजोरीत येऊन दाखल झाला होता.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.