कोहिनुर हिरा असलेला हा क्राउन आता ब्रिटनच्या या राणीकडे जाणार आहे
ब्रिटिशांनी जगाला किती जरी लोकशाहीवर लेक्चर दिलं तर तुमच्यावर अजूनही राणीचं राज्यं कसं आहे याचं उत्तर त्यांच्याकडे नसतं. राणीचं राज्य जरी प्रतीकात्मक असलं तरी तुम्ही त्या पदाला तुम्ही अजून का ठेवलं आहे हे इंग्रजांना अजूनही नीट सांगता येत नाही. पण ब्रिटिशांचं दोगलापण फक्त एवढ्यापुरतंच मर्यादित नाहीये. त्यांचं साम्राज्य जेव्हा जगभर पसरलं होतं तेव्हा ब्रिटिशांनी आशिया-आफ्रिकेतील देशातून अनेक मौल्यवान वस्तू नेल्या होत्या. आणि याच लुटीच्या वस्तूंच्या जीवावर आज ब्रिटनमध्ये अनेक म्युझियम्स उभे आहेत.
भारतातून अश्याच ब्रिटिशांनी नेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये सर्वात मौल्यवान गोष्ट आहे कोहिनुर हिरा.
आता या कोहिनूर हिऱ्याच्याच बाबतीत एक न्युज आली आहे. आता ब्रिटनच्या राणीनं वय झालं म्हणून आपलं उत्तराधिकारी नेमला आहे. आता जेव्हापसून बघतोय तेव्हापासून तिचं वय झालेलंच आहे पण तिला आता वाटायला लागलंय असो. ब्रिटीश सिंहासनावर राणीच्या प्रवेशाला ७०व्या वर्धापन दिनानिमित्त, राणी एलिझाबेथ II ने घोषणा केली आहे की प्रिन्स चार्ल्सची पत्नी कॅमिला तिच्या मुलाच्या सिंहासनावर प्रवेश केल्यावर “क्वीन कॉन्सोर्ट” म्हणून ओळखली जाईल.
आणि मग राणीचं मुकुट मग क्वीन कॅमिलाला भेटणार आहे. या मुकुटाची खासियत म्हणजे कोहिनूर हिरा याच मुकुटावर आहे. चार्ल्स राजा झाल्यावर कॅमिलाला ‘अमूल्य’ हिऱ्याचा मुकुट मिळेल.
मुकुटावर प्लॅटिनम फ्रेम आणि कोहिनूरसह २,८०० हिरे जडलेले आहेत.
कोहिनूर मुकुट १९३७मध्ये राजा जॉर्ज सहावाच्या राज्याभिषेकासाठी तयार करण्यात आला होता. हा मुकुट सध्या टॉवर ऑफ लंडन येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.
२१.१२ ग्रॅमच्या या हिऱ्याचा मोठा वादग्रस्त इतिहास आहे. १४व्या शतकात हा हिरा भारतात सापडला आणि १८४९ पर्यंत अनेक जणांच्या हातात हा हिरा पडला होता. १८४९ मध्ये, पंजाबचा ब्रिटीशांनी ताबा घेतल्यानंतर हा हिरा राणी व्हिक्टोरियाला देण्यात आला. तेव्हापासून हा हिरा ब्रिटिश क्राउन ज्वेल्सचा एक भाग आहे, परंतु भारतासह चार देशांमधील ऐतिहासिक मालकी विवादाचा विषय राहिला आहे.
भारत
१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताच भारत सरकारने हिऱ्यासाठी एक केस तयार केली. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, दुसरी विनंती राणी एलिझाबेथ II च्या राज्याभिषेकाच्या वर्षी १९५३ मध्ये करण्यात आली होती. एप्रिल २०१६ मध्ये, भारत सरकारने सांगितले की ते कोहिनूर भारतात परत आणण्यासाठी “सर्व शक्य प्रयत्न” करेल.
पाकिस्तान
पाकिस्तानने १९७६ मध्ये पहिल्यांदा या हिऱ्यावर आपला हक्क सांगितला होता. लाहोरच्या राजाने कोहिनुर ब्रिटीशांनं दिला असल्यानं त्याच्यावर आमचा हक्क आहे असा पाकिस्तानचा दावा आहे.
अफगाणिस्तान
२००० मध्ये, तालिबाननेही कोहिनूर परत करण्याची मागणी केली आणि असे म्हटले की राणीने ‘लवकरात लवकर’ रत्न परत द्यावे. तालिबानचे परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते फैज अहमद फैज म्हणाले की, हिरा अफगाणिस्तानची ‘कायदेशीर मालमत्ता’ आहे आणि भारतापेक्षा त्यावर अधिक चांगला दावा आहे.
आता ब्रिटिश भारताला किंवा इतर देशांना कोहिनूर देतील का हे सांगणं अवघड आहे. त्यामुळं सध्यातरी ब्रिटनच्या एका राणीकडून दुसऱ्या राणीकडे जातोय एवढंच आपल्याला पहावं लागणार आहे.
हे ही वाच भिडू:
- लोकांना गंडवणाऱ्या आधुनिक शिक्षण सम्राटाची जाहिरात शाहरुखला महागात पडली होती..
- जाहिरातीवर पैसे खर्च न करताही ग्रो-प्रो कॅमेरा जगातला सगळ्यात भारी ब्रँड कसा बनला?
- दहा विकेट्स कुंबळेनी घेतल्या, पण त्याही दिवशी जंटलमन राहुल द्रविड हिरो ठरला