आईनस्टाईन आणि न्यूटनला खुळ्यात काढणारे ते आणि त्यांना खुळ्यात काढणारे आपण.

आज स्टिफन हॉकिंग या जगप्रसिद्ध वैज्ञानिकाची जयंती. भिडूलोग आपल्यापैकी अनेकांचं आणि सायन्सच वाकड हाय. आपली आणि सायन्सची गणित कधी जुळलीच नायत हे सगळं आम्हाला मान्य आहे.

तर सांगायचा विषय असा की आजकाल आपल्याला काय काय जोक वाचायला मिळायलेत. जोक कशावरून तर भारतीय विज्ञान काँग्रेसच्या १०६ व्या संमेलनात वैज्ञानिकांनी उधळलेली मुक्ताफळे. आता काँग्रेस म्हटल तर जोक असणारच असले जुने विनोद करू नका. या काँग्रेसचा आणि राहुल गांधी घराण्याच्या काँग्रेसचा काहीही संबंध नाही.

भारतीय विज्ञान काँग्रेसची सुरवात १९१४ साली झाली. तेव्हापासून भारतातले वैज्ञानिक, विज्ञानाचे विद्यार्थी दर वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटतात आणि विज्ञानाची चर्चा करतात. यावर्षी पण भेटले. यावेळी पंजाबच्या जालंधरमध्ये भरलेल्या या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केले.

या परिषदेमध्ये बोलताना आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.जी नागेश्वर राव म्हणाले,

“कौरवाचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीच्या प्रयोगातून झाला. विष्णूचे दहा अवतार म्हणजे डार्विनच्या सिद्धांता पेक्षा उत्तम उदाहरण आहे. रावणाकडे चोवीस विमाने होती. विष्णूचे सुदर्शन म्हणजे गायडेड मिसाइल होते.”

जमलेल्या जागतिक दर्जाच्या वैज्ञानिकांनी डोक्याला हात लावला. एका मोठ्या विद्यापीठाचे हे कुलगुरू. पुराणातील वांगी काढून त्याचं भरीत त्यांनी जमलेल्यांना खाऊ घातलं.

ही विमाने असतील तर त्यांचे डिझाईन कुठे आहे? टेस्ट ट्यूब बेबीअसेल तर त्याची प्रोसेस नेमकी काय होती हे बोलायचं त्यांनी टाळल. नुसतेच हजारो वर्षापूर्वी आपल्याकडे काय काय होत याची त्यांनी उजळणी करून दिली. या सगळ्याचे पुरावे मागितल्यावर कुलगुरू म्हणाले,

“इतिहास हाच एक पुरावा आहे.”

त्यांच्या पाठोपाठ आणखी एक संशोधक श्री. कनन कृष्णन यांनी तर बॉम्बच टाकला. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया विद्यापीठातून यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी सुद्धा नागेश्वर राव यांच्या पुराणातल्या विधानांना पाठिंबा दिला.

एवढं नव्हे तर न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या नियमाला सुद्धा त्यांनी धादांत खोटे असे संगितले. न्यूटनकडे गुरुत्वाकर्षण समजून घेण्याइतपत बौद्धिक क्षमता नव्हती. एवढच नाही तर त्यांनी म्हणे अल्बर्ट आईन्स्टाईनच्या सिद्धांतामध्ये सुद्धा चूक शोधली आहे. हे सगळ फक्त आपणच दुरुस्त करू शकतो असा त्यांचा दावा आहे.

वेद हे आईन्स्टाईनच्या वैज्ञानिक सिद्धान्तापेक्षा श्रेष्ठ असे म्हणणारे भारताचे विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन हे मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अब्दुल कलाम यांच्या पेक्षा ही मोठे संशोधक म्हणून सिद्ध होतील हा दावा सुद्धा त्यांनी केला आहे.

कनन कृष्णन यांना आपण शोध लावल्यावर गुरुत्वाकर्षण लहरींना नरेंद्र मोदी लाट असे नाव द्यायचे आहे आणि गुरुत्वाकर्षण च्या लेन्सिंग परिणामानां डॉ. हर्षवर्धन यांच नाव द्यायचं आहे.

असले उद्योग विज्ञान परिषदेमध्ये झाल्यावर सोशल मिडीयावर गावगोळा झाला. न्यूटन आणि आईनस्टाईनला अडाणी ठरवणाऱ्या या वैज्ञानिकांना लोकांनी इन्टरनेट वर चांगलाच धुतला. whatsapp university मध्ये सुद्धा फोरवर्ड न करण्याचे लायकीचे हे शोध अखिल भारतीय विज्ञान परिषदेमध्ये केले जात आहेत याचे सर्वाना आश्चर्य वाटले. बरोबरच आहे. पण यात आपण पण एक चूक करतोय.

आईनस्टाईन पण चुकीचा असू शकतो. न्यूटनने सुद्धा चूक केली असू शकते. कोणत्याही साईडची अंधश्रद्धा वाईटच.

हे संशोधक न्यूटन आणि आईनस्टाईनला वेड्यात काढता आहेत आणि आपण त्यांना वेड्यात काढतोय. न्यूटनने जेव्हा गुरुत्वाकर्षण पहिल्यांदा मांडल तेव्हा त्यानाही लोकांनी वेड्यात काढलं होत. खरोखर आपले कनन कृष्णन यांनी खरोखर मोदी लाट शोधून काढली असेल. काय माहित?

विज्ञानाचा सर्वात मोठा नियम म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध घालं. अर्थात जो काही सिद्धांत मांडायचा आहे त्याला पुरावा दाखव. आज काल पुराणात असं लिहिलं होत, वेदात असं लिहिलं आहे असं सांगण्याची पद्धत आली आहे. यावर प्रश्न विचारणार्यांना एक तर खुळ्यात काढलं जात किंवा राष्ट्रवादाचा धाक दाखवून गप्प बसवलं जात.

प्रश्न विचारले पाहिजेत. शाळेत आपल्याला शिक्षकांनी प्रश्न विचारू दिले नाहीत म्हणून आपण हि सवय विसरून गेलो. आज कोणीही उठतो आणि आपल्याला काहीही माहिती चिकटवून टाकतो. म्हणे मोर सेक्स करत नाहीत, अश्रूंची झाली मुले टाईप मोर रडतो आणि त्याच्या अश्रूंमुळे लांडोर प्रेग्नंट राहते. 

का बाबा? कसा शोध लागला? याला काही शास्त्रीय आधार आहे का? हि उत्तरे मिळालीच पाहिजेत. विज्ञान म्हणजे जोक नव्हे. कोणी जर देशातल्या जनतेला मूर्ख समजून गंभीर प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी असले बाष्कळ उद्योग करत असेल तर त्यांना प्रश्न विचारून जागा दाखवून दिली पाहीजे न कि त्यांना खुळ्यात काढून.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.