१९९६ वर्ल्डकप सेमीफायनल मधून भारत बाहेर पडला होता तेव्हा काय झालं होतं..

१३ मार्च १९९६. भारत Vs श्रीलंका. वर्ल्ड कपची सेमी-फायनल.

१ लाखांपेक्षा अधिक प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता असणारं, कोलकात्याच्या ईडन-गार्डन्सचं मैदान. भारत अर्थातच फेवरीट. टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यासाठी भारताचा कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनला  तेवढाही वेळ नाही लागला, जेवढा टॉससाठी फेकलेलं कॉईन खाली यायला लागला.

कारण सरळ होतं की श्रीलकन्स खूप चांगले चेसर्स होते. ग्रुपमधल्या बहुतेक मॅचेस त्यांनी टार्गेट चेस करूनच जिंकल्या होत्या. शिवाय साखळी फेरीतील सामन्यातही श्रीलंकेने चेस करतच भारताला हरवलं होतं.

संपुर्ण वर्ल्डकपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या श्रीलंकेच्या जयसूर्या-कालूविथूर्णा जोडीला जवागल श्रीनाथनं स्वस्तात घरी पाठवलं. या २ विकेट्स मिळवून अर्धी मॅच भारताने इथंच जिंकली होती. कारण संपुर्ण वर्ल्ड कपमध्ये या ओपनर जोडीने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. श्रीलंका १ रन २ विकेटस. त्यानंतर अरविंद डिसिल्व्हा आणि रोशन महानामा यांच्या शानदार फिफ्टीज आणि अर्जुन रणतुंगा आणि हसन तिलकरत्ने यांच्या छोट्या पण उपयुक्त इनिंग्जच्या जोरावर श्रीलंकेचं भारतासमोर २५२ रन्सचं टार्गेट केलं.

२५२ रन्स चेस करायला मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात जेमतेमच झाली होती. सचिन तेंडूलकर सोबत ओपनिंगला आलेला नवज्योतसिंग सिद्धू संघाचा स्कोअर ८ रन्स असतानाच भोपळाही न फोडता पॅव्हेलीअनमध्ये परत आला. त्यानंतर मात्र सचिनने संजय मांजरेकरला सोबत घेऊन डाव सावरला.

६५ रन्सवर खेळणाऱ्या सचिनची विकेट पडली त्यावेळचा भारताचा स्कोअर ९८ रन्सवर २ विकेट.

Screenshot 1
Youtube

भारत सहज विजयाकडे वाटचाल करतोय असं दिसत असतानाच पीचने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. पिचवर बॉलला एक्स्ट्रा टर्न मिळू लागला. सचिनची विकेट काय पडली भारताचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळायला सुरुवात झाली. जशा भारतीय विकेट्स पडत होत्या तशी प्रेक्षकांमधील अस्वस्थता वाढत चाललेली. एक स्टेज तर अशी आली की,

९८ रन्सवर २ विकेट्स असणाऱ्या भारतीय संघाची अवस्था १२० रन्सवर ८ विकेट्स अशी झाली. 

विनोद कांबळी आणि अनिल कुंबळे मैदानात होते. प्रेक्षकांनी गोंधळ घालायला आणि मैदानात बॉटल फेकायला सुरुवात केली. मैदानात जाळपोळही करण्यात आली. ही गोष्ट ज्यावेळी श्रीलंकन कर्णधार अर्जुना रणतुंगाने फिल्डवरील अंपायरच्या लक्षात आणून दिली, त्यावेळी खेळ थांबविण्यात आला.

अशा स्थितीत मॅच रेफ्री क्लाइव्ह लॉइड यांचा निर्णय आला.

जे क्रिकेटच्या इतिहासात कधीच झालं नव्हतं अशा घटनेचं ईडन गार्डन्स साक्ष ठरलं. प्रेक्षकांच्या गोंधळामुळे श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आलं.

१९८३ नंतर वर्ल्डकप जिंकण्याच्या भारतीय संघाच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. त्यावेळी मैदानावर असणारा विनोद कांबळी तर पॅव्हेलीयनमध्ये परतताना अक्षरशः ढसाढसा रडला होता. हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला काळा दिवस ठरला. ईडन-गार्डन्सवरील प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमूळे भारतीय क्रिकेटची जगभरात छी-थू झाली. भारतीय क्रिकेटची मान शरमेने खाली गेली.

नंतर काही वर्षांनी विनोद कांबळीने हा मॅच फिक्स असल्याचा आरोपही केला होता. पण आपल्या आरोपांना सिद्ध करण्यासाठी कांबळीकडे कसलाही पुरावा नव्हता. पुढे भारताचा पराभव करून फायनलमध्ये पोहचलेल्या श्रीलंकेने ऑस्ट्रेलियालाही पराभवाचा धक्का दिला आणि आपला पहिलाच वर्ल्डकप जिंकला होता.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.