या १० वर्षीय भारतीय चिमुरड्याच्या असामान्य बुद्धीमत्तेसमोर ब्रिटीश सरकारला झुकावं लागलं !
२०१२ साली भारतातून जितेंद्र सिंह आणि अंजु सिंह हे दाम्पत्य ब्रिटनला वर्किंग व्हिसावर स्थलांतरित झालं होतं. जितेंद्र सिंह हे ‘टाटा स्टील’ या कंपनीत कामाला होते. तब्बल सहा वर्षे ब्रिटनमध्ये घालवलेल्या जितेंद्र यांच्या वर्किंग व्हिसाची मुदत जेव्हा संपली तेव्हा त्यांना देश सोडण्याचा आदेश मिळाला.
आता जितेंद्र यांच्यासमोर फक्त २ पर्याय उरले होते. एकतर व्हिसाचे १२०००० पौंड एवढी मोठी रक्कम भरून व्हिसाचे नुतनीकरण करून घ्यायचं किंवा सामान पॅक करून भारतात परतायचं. अर्थातच जितेंद्र यांच्याकडे व्हिसाच्या नूतनीकरणासाठी लागणारी एवढी मोठी रक्कम नव्हती, त्यामुळे बहुतेक आपल्याला दुसऱ्या पर्यायाची निवड करायला लागेल असं त्यांना वाटत होतं.
इथेच येतो या कहाणीमध्ये ट्वीस्ट !
व्हिसाच्या नूतनीकरणासाठी लागणारी रक्कम भरणं शक्य नसताना देखील जितेंद्र यांना ब्रिटनमध्ये राहण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. फक्त मुदतवाढच देण्यात आली असं नाही तर ती देता यावी यासाठी ब्रिटनच्या व्हिसा धोरणाच्या नियमात अपवादात्मक बदल करण्याचा निर्णय ब्रिटिश संसदेने घेतला.
नेमकी अशी काय जादू झाली की एका भारतीय कुटुंबाला ब्रिटनमध्ये राहता यावं यासाठी चक्क ब्रिटनच्या संसदेने आपल्या व्हिसा धोरणाच्या नियमात बदल केला..? तर या प्रश्नाचं उत्तर असं की ब्रिटनला असा बदल करावा लागला याचं मुख्य कारण म्हणजे जितेंद्र आणि अंजु या दांपत्याचा १० वर्षीय मुलगा श्रेयस रॉयल.
असं काय खास होतं श्रेयसमध्ये की ब्रिटिश संसदेने व्हिसाचा नियम बदलला..?
जितेंद्र आणि अंजु जेव्हा ब्रिटनमध्ये शिफ्ट झाले तेव्हा त्यांचा मुलगा श्रेयस ३ वर्षांचा होता. श्रेयसचं शिक्षण ब्रिटन मधल्याच शाळेत सुरू झालं. शिक्षण सुरू असतानाच श्रेयस आवड म्हणून बुद्धिबळ खेळायला लागला. बुद्धिबळाची त्याची ही त्याची आवड कधी पॅशन झाली, हे बहुधा त्यालाही कळलं नसेल.
झालं ! आधी आवड म्हणून चेस खेळणारा श्रेयस नंतरच्या काळात ब्रिटनमधील बुद्धिबळाच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागला. फक्त सहभागी होऊन तो थांबला नाही तर हा चिमुरडा पोरगा त्या वयातच ब्रिटनमधल्या ‘इंटरस्कुल चॅम्पियनशिप’मध्ये भल्या भल्यांना हरवायला लागला.
चेसमधील त्याच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर उंचावत गेला आणि वयाच्या दहाव्या वर्षी तो ‘ग्रँड मास्टर चॅम्पियनशिप’ स्पर्धेपर्यंत येऊन पोहचला आहे. बुद्धिबळातील आपल्या असामान्य कर्तृत्वाने त्याने सगळ्यांनाच अचंबित करून टाकले. जागतिक बुद्धिबळाच्या पटावर त्याचं नाव चर्चिलं जाऊ लागलं.
श्रेयसचं नाव बुद्धिबळाच्या जगातील अग्रगण्य खेळाडूंमध्ये घेतलं जाऊ लागलं. त्याच्या या यशामुळे बऱ्याच कालावधीनंतर ब्रिटनला एक उत्कृष्ट बुद्धिबळपटू मिळणार होता. पण त्याच्या वडिलांना मिळालेल्या देश सोडण्याच्या नोटीसीमुळे या सगळ्यावर पाणी फेरलं जाणार होतं.
ब्रिटनमधील खासदार आणि क्रीडा संघटना उतरल्या समर्थनात !
श्रेयसच्या करियरची काळजी म्हणून जितेंद्र यांनी ब्रिटनच्या होम सेक्रेटरीला पत्र लिहिलं. परंतु त्यांनी स्पष्ट शब्दात आपला नकार कळवला. त्यामुळे जितेंद्र व्यथित झाले. आपल्या मुलाचं असामान्य कर्तुत्व लक्षात घेऊन सरकारने त्यांना ब्रिटनमध्ये वास्तव्याची परवानगी द्यावी एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती.
होम सेक्रेटरीकडून मिळालेल्या नकारानंतर जितेंद्र यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीशी संपर्क साधला. त्यानंतर स्वतः बुद्धिबळपटू असणाऱ्या मजूर पक्षाच्या खासदार राचेल रेव्हीस यांनी या प्रकरणात लक्ष घातलं. तसंच जितेंद्र ज्या ठिकाणी राहतात त्या ग्रीनवीच भागातील खासदाराने देखील पुढाकार घेत दोन कॅबिनेट मंत्र्यांना या संदर्भात विनंती करणारं पत्र लिहिलं.
Govt plan to force an 8 year old chess prodigy to leave the country next month because his father earns less than £120,000 a year.
UK shouldn't be deporting its brightest young talent. @sajidjavid should intervene and allow Shreyas to stay in the only home he can remember. pic.twitter.com/DLonnTgSzX
— Rachel Reeves (@RachelReevesMP) August 3, 2018
या पत्रानंतर देखील नकारघंटा वाजायची थांबत नव्हती. त्यानंतर या खासदार जोडीने ब्रिटनच्या अजून एक पत्र लिहिलं. श्रेयस आणि कुटुंबियांना जर ब्रिटनमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली नाही तर देश एका होऊ घातलेल्या महान बुद्धिबळपटूला मुकेल, असं त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं.
ब्रिटनच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू
ब्रिटनमधील क्रीडा संघटना आणि खेळाडू देखील श्रेयसच्या समर्थनात उतरले. माजी ग्रँडमास्टर ख्रिस वॉर्ड यांनी तर ‘ब्रिटनच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू’ या शब्दात श्रेयसचा गौरव करत त्याला ब्रिटनमध्ये वास्तव्याची परवानगी देण्यात यावी अशी सरकारला विनंती केली. ‘इंग्लिश चेस असोसिएशन’ने श्रेयसच्या समर्थनार्थ सिग्नेचर कॅम्पेन राबवलं. भरीस भर म्हणून की काय एक पत्र तर खुद्द ‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटने’कडून आलं.
खासदार राचेल रेविस यांनी हा प्रश्न ब्रिटीश संसदेत मांडत सरकावर दबाव निर्माण केला. इतर अनेक खासदारांचे देखील त्यांना पाठबळ लाभले. अनेक ब्रिटीश खासदारांच्या तसेच क्रीडा संघटनांच्या दबावापुढे शेवटी सरकारला झुकावं लागलं.
श्रेयस आणि त्याच्या कुटुंबियांना ब्रिटनमध्ये वास्तव्याकरिता व्हिसाची मुदत वाढवून देण्याचा निर्णय ब्रिटिश गृह खात्याला घ्यावा लागला. होम सेक्रेटरी साजिद वाजीद यांनी तशी मेल जितेंद्र यांना पाठवली. खासदार राचेल रेविस आणि क्रीडा संघटनाच्या लढ्याला यश आलं.
‘श्रेयस’ सारखं टॅलेंट गमवायला लागू नये यासाठी ब्रिटनमधील लोक, लोकप्रतिनिधी आणि क्रीडा संघटना एका भारतीयासाठी आपल्याच सरकारच्या निर्णयाच्या विरोधात उभ्या राहिल्या आणि ब्रिटन सरकारने देखील सामुहिक भावनेचा आदर करत त्यांची मागणी मान्य केली. ब्रिटनमधील लोकांना, लोकप्रतिनिधींना आणि सरकारला देशातील ‘टॅलेंट’ची किती काळजी असते हेच यावरून दिसून येतं.
हे ही वाच भिडू
- कोहली आणि ज्यो रूट यांच्याकडून पहिल्या महायुद्धातील भारतीय सैन्याच्या हौतात्म्यास सलाम !!!
- गेल्या २० वर्षांपासून या सुरक्षित हातात आहे भारतीय क्रिकेट संघाचं ‘स्टेअरिंग’
- क्रिकेटचा शोध लावणारा इंग्लंड, इतिहासातील पहिल्याच कसोटीत पराभूत झाला होता !!
- .तर भारतीय क्रिकेटचे जन्मदाते रणजीत सिंह इंग्लंड संघाचे कॅप्टन झाले असते !!!