सुवर्ण मंदिराची पहिली वीट एका मुस्लीम संताने रचली होती !
अमृतसर येथील सुवर्ण मंदिर हे जगभरातील सिख धर्मीय लोकांचं पवित्र स्थळ मानलं जातं. केवळ सिख धर्मीयांचं पवित्र स्थळ म्हणूनच नाही तर भारतातील अनेक सुंदर मंदिरांपैकी एक म्हणून ‘श्री हरमंदिर साहिब’ अर्थात ‘गोल्डन टेम्पल’ जगप्रसिद्ध आहे. देशविदेशातून दररोज साधारणतः १ लाखापेक्षा अधिक पर्यटक या मंदिराला भेट देतात. विशेष म्हणजे यातील बरेचसे लोक सिख धर्मीय नसतात.
आपल्यापैकी बहुतेकांचा समज असाच असणार की हे मंदिर सिख समुदायातील एखाद्या गुरूने निर्माण केलेलं असेल. पण हा ग्रह मनात ठेवण्याआधी तुम्हाला सुवर्णमंदिराविषयी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की या मंदिराच्या निर्मितीत एका सुफी संताचा ‘हजरत मिया मीर’ यांचा महत्वाचा वाटा राहिलेला आहे. हजरत मिया मीर यांनीच डिसेंबर १५८८ साली या मंदिराचा पाया रचला होता.
१५५० सालचा जन्म असलेल्या लाहोरमधील मिया मीर यांना सर्वधर्मीय लोक अतिशय आदर देत असत. शिखांचे गुरु अर्जन देव यांचे ते अतिशय जवळचे मित्र होते.अर्जन देव यांच्याच विनंतीवरून हजरत मिया मीर यांनी मंदिराची पहिली वीट रचली होती.
सुरुवातीच्या काळात हे मंदिर दगड आणि विटांचं बनलेलं होतं, मात्र नंतरच्या पांढऱ्या शुभ मार्बलचा वापर करण्यात आला. त्यानंतर जवळपास २०० वर्षांनी महाराजा रणजितसिंग यांनी या मंदिरावर सोन्याचा मुलामा चढवला. त्यानंतरच हे मंदिर सुवर्णमंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
मंदिरावर सोन्याचा मुलामा चढविण्याच्या आधी हे मंदिर ‘श्री हरमंदिर साहिब’ किंवा ‘दरबार साहिब’ या नावाने ओळखलं जात असे. अमृतसर सरोवराच्या मधोमध असणाऱ्या या मंदिराच्या चारही दिशेला ४ वेगवेगळे दरवाजे आहेत. ४ वेगवेगळ्या दिशांना असणारे हे दरवाजे सर्वधर्म समभावाचं प्रतिक समजले जातात.
या मंदिराच्या परिसरात लंगारच्या माध्यमातून दररोज लाखांपेक्षा अधिक लोकांना अन्नदान केलं जातं. महत्वाच्या सन-उत्सवाच्यावेळी तर ही संख्या दुपटीपेक्षा अधिक असते. लंगरमध्ये काम करणारे बहुतेक लोक हे केवळ सेवा म्हणूनच हे काम करतात. त्यासाठी ते कुठलाही मोबदला घेत नाहीत.
हे ही वाच भिडू
- अयोध्येत राम मंदिराच्या अगोदर, कोरियाच्या राणीचं स्मारक बांधल जातय !
- चित्रकुटमधील बालाजी मंदिर औरंगजेबाने बांधलं होतं ?
- नाशिकच्या महादेवाच्या मंदिरात नंदी बैलच नाही !
- हे मंदिर ब्रिटीश अधिकाऱ्यानं बांधलय. ते पण बायकोचा नवस पुर्ण करण्यासाठी.