अयोध्येत राम मंदिराच्या अगोदर, कोरियाच्या राणीचं स्मारक बांधल जातय !

जुलै २०१८ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आलेले दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून-जे-इन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान अनेक करार झाले होते. त्यापैकी एका करारान्वये दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी अयोध्येमध्ये राजकुमारी सुरीरत्न यांचे स्मारक बनविण्यात येणार आहे.

भारत आणि कोरिया हे दोन्ही देश संयुक्तपणे हे स्मारक विकसित करणार आहेत. या स्मारकासाठी साधारणतः ४०० कोटी रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. दोन्हीही देश यातला आपला हिस्सा म्हणून निम्मा खर्च उचलतील.

आता तुम्हाला प्रश्न पडला असणार की भारतातल्या एका राजकुमारीच्या स्मारकामध्ये दक्षिण कोरियाच्या सरकारला एवढा रस का आहे की ते थेट भारत सरकारसोबत मिळून तिचं स्मारक उभारताहेत…?

दक्षिण कोरियाच्या सरकारने राजकुमारी सुरीरत्न यांच्या स्मारकाच्या उभारणीत रस घेण्यामागे एक दक्षिण कोरिया आणि भारतात देखील प्रचलित असलेली एक दंतकथा आहे. या दंतकथेनुसार अयोध्येची राजकुमारी असलेल्या सुरीरत्न यांनी कोरियन राजा किम सुरोशी लग्न केलं होतं आणि त्यामुळे राजकुमारी सुरीरत्न दक्षिण कोरियाच्या राजाच्या राणी झाल्या होत्या.

राजकुमारी सुरीरत्न यांच्यासंबंधीची ही दंतकथा इतकी प्रचलित आहे की दक्षिण कोरियातून अनेक लोक दरवर्षी आपल्या या राणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी अयोध्येला येतात.

राजकुमारीला स्वप्न पडलं आणि ती राजकुमारच्या शोधात कोरियात पोहोचली.

प्रचलित दंतकथेनुसार अयोध्येची राजकुमारी असलेल्या सुरीरत्न यांना असं स्वप्न पडलं होतं की आपल्या स्वप्नातल्या राजकुमारच्या शोधात त्यांना समुद्र पार करावा लागेल. पडलेल्या स्वप्नानुसार आपल्या आई-वडिलांच्या परवानगीने राजकुमारीने अयोध्या सोडली आणि जहाजाने कोरियात जाऊन पोहोचली.

कोरियात पोहोचल्यानंतर तिथे त्यांची भेट राजा सुरो यांच्याशी झाली. राजकुमारीने आपल्याला पडलेल्या स्वप्नाविषयी राजाला सांगितलं आणि त्यानंतर या दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर राजकुमारी सुरीरत्न यांचं नामकरण हियो ह्यंग असं करण्यात आलं.

तेराव्या शतकातील कोरियन कागदपत्रांमध्ये उल्लेख.

‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रकाशित बातमीनुसार तेराव्या शतकातील सांगूक युसा या कागदपत्रांमध्ये राजकुमारी सुरीरत्न यांचा गया राज्याचे राजे सुरो यांच्या पत्नी म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे.

या कागदपत्रांनुसार राणी हियो या अयुता राज्याच्या राजकुमारी होत्या, ज्या वयाच्या सोळाव्या वर्षी कोरियामध्ये आल्या होत्या. राजे सुरो यांच्याशी झालेल्या लग्नानंतर त्यांना गया राज्याच्या पहिल्या महाराणी हा सन्मान देखील प्राप्त झाला होता.

गिमहे शहरात राणी हियो यांची कबर असून त्या कबरीवर एक दगड ठेवण्यात आलेला आहे. सांगूक युसा कागदपत्रांनुसार हा दगड महाराणी हियो या अयुता म्हणजेच अयोध्येमधून येताना स्वतः सोबत घेऊन आल्या होत्या.

इतिहासकार काय म्हणतात..?

इतिहासकरांच्या दृष्टीने मात्र या सगळ्या गोष्टींना एक मिथक यापलीकडे फारसं महत्व नाही. शिवाय सांगूक युसा कागदपत्रे सोडली तर इतर कुठल्याही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये अथवा ग्रंथांमध्ये महाराणी हियो किंवा राजकुमारी सुरीरत्न यांचा उल्लेख आढळत नाही.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.