चार्ल्स शोभराजला सुधारायला निघाललेली ही पोर शेवटी त्याच्याच मोहपाशात अडकली

महाभारतात, कृष्णाच्या भोवती गोपींचा वेढा असायचा. गोपी कृष्णासाठी वेडया व्हायच्या. तसंच चार्ल्स शोभराजच्या बाबतीत सुद्धा होत. त्याच्या आजूबाजूला अनेक सुंदर, मादक, देशी विदेशी ललनांचा गराडा असायचा. मग तो अमेरिकेत असो, युरोपमध्ये असो, भारतात असो किंवा थायलंडमध्ये असो. पण कृष्ण हा एक अलौकिक अद्भूत आणि देवी युगपुरुष होता. त्याच्या मुरलीच्या जादूने तो गोपीच काय पण गायी, गुरे पण आकर्षून घेत असे. पण चार्ल्सजवळ अशी कोणती जादू होती कुणास ठाऊक? ज्या युवती त्याच्या जाळ्यात सापडल्या त्यांनाच ठाऊक !

तसा चार्ल्स गव्हाळी वर्णाचा, उंचा, पूरा, मध्यम बांध्याचा त्याचे विशेष होते ते म्हणजे डोळे! त्याच्या नजरेत एक आगळीच जादू होती. असं वाटायचं की, जादूगार ज्याप्रमाणे समोरच्या माणसावर मोहिनी टाकून, जादूचे प्रयोग करताना त्या व्यक्तिकडून हवे ते काम करवून घेतो, तद्वतच, शोभराज त्याला हव्या असणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत करत होता की काय ? त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याचे समोरच्या व्यक्तीवर चटकन छाप पडणार बोलणं ! सकाळीच नवीन ओळख झालेल्या अनोळखी स्त्रीला तो रात्री आलिशान हॉटेलमध्ये असायचा !

भले एखाद्याजवळ भुरळ घालणारे डोळे असतील, छाप पाडणारे बोलणे असेल, चारचौघांपेक्षा वेगळेच व्यक्तिमत्व असेल, तारुण्याचा जोश असेल, वेगळाच मर्दानीपणा असेल पण लक्ष्मीचा वरदहस्त नसेल तर मग स्त्रिया कशा वश होतील ? सुदेवाने ह्या महाभागास लक्ष्मीही वश होती, तीही हात जोडून उभी होती. सायगावला जेव्हा तो कोवळघा वयात बंदरावर, रस्त्यावर, गल्लोगल्ली हिडत असे, भेटणाऱ्या सुंदर स्त्रिया त्याला बेचैन करून सोडत ! पण त्या वेळी पोरींना खेळविण्यासाठी लागणारा पैसा त्याच्या हातात खेळत नव्हता.

चार्ल्सच्या सानिध्यात येणाऱ्या महिलांची यादी भली मोठी होती. जशी आपल्या संजय दत्तची. अशा या बहुगुणी चार्ल्स बाळाची एक प्रेयसी म्हणजे हैद्राबादची श्रीमती वैशाली रेड्डी. ४८ वर्षांची असलेली  वैशाली निजामाबाद येथील वूमेन्स कॉलेज येथे वनस्पतीशास्त्र शिकवायची. गेली दहा वर्षे तिने चार्ल्सबद्दल बराच वेळ घालवलेला. 

तीच म्हणणं असायचं.  बालपणीच्या जडणघडणीमुळे आणि कुटुंबाची वाताहत झाल्यामुळे तो गुन्हेगारीकडे वळला आहे. आपण असा हा वेगळा दृष्टिकोन ठेवून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करून, विवाह करून त्याला निश्चित सुधारू शकू, असं तिला वाटायचं. 

पहिल्यांदा त्यांनी पत्रांची देवाणघेवाण सुरू केली. प्रत्यक्ष चाल्सची तिची पहिली भेट जानेवारी ८६ मध्ये झाली. मात्र चार्ल्सला तिने लिहिलेल्या शेवटच्या पत्रात कायदेशीर विवाहाचा आग्रह धरला होता. तसेच जुन्या एका प्रेयसीबरोबरचे संबंध लपवून ठेवल्याबद्दल तिने कडक भाषा वापरली होती. असे म्हणतान की, प्रत्यक्ष वैशाली रेड्डीस चार्ल्सने पाहिले असता, तिचा काळासावळा रंग आणि वयाचा फरक पाहून तो थोडासा नाराज झाला. तसेच तिचा किंचित् लठ्ठपणाही त्याला खटकला. 

चार्ल्सने पहिल्याच भेटीत तिला ‘लाईफ अॅड क्राइम्स ऑफ चार्ल्स शोभराज ‘ हे पुस्तक भेट दिले. परंतु तिहारमधून चार्ल्स पळाल्याच्या घटनेमुळे दिल्ली पोलीस ताबडतोब तिच्या चौकशीसाठी हैद्राबादला गेले. आणि तिची कसून चौकशी केली गेली. 

पोलिसांनी तिच्या जवळची सर्व चाल्सची पत्रे, कात्रणे देखील जप्त केली आहेत. तिने आपल्याकडून भेट चार्ल्स शोभराजला चार शर्ट तुरुंगात असताना भेट दिले होते. म्हणून एक सुशिक्षित भारतीय स्त्री आपल्यावर प्रेम करते, आपल्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवते, याचे चार्ल्सला थोडे बहुत नवल वाटले असावे !

 ३१ जानेवारी आणि १ व ३ फेब्रुवारी या दिवशी वैशाली रेड्डी चार्ल्सच्या भेटीस गेली होती. दिल्लीला विमानाने जाणे येणे, तेथील आलीशान हॉटेलात रहाणे, उतरणे इ. ची चार्ल्सनेच व्यवस्था केली होती. परंतु वैशालीची प्रतिक्रिया अशी, की आपण सुखवस्तु सुस्थितीत असल्यामुळे स्वतःच्या पैशातून देखील हे सर्व करू शकले असते. तिच्या म्हणण्यानुसार जेलमध्ये चार्ल्स एखाद्या बादशहासारखा वावरत असे.

 तुरुंगातील अधिकारी आणि  इतर कैदी व्ही. आय. पी. व्यक्ती म्हणूनच त्याच्याशी वागत, बोलत, व्यवहार करीत. परंतु त्याला भेटायला सतत कोणी ना कोणीतरी येत असे. ते लोक अडचणी तक्रारी घेऊन येत असत. त्यामुळे प्रत्यक्ष त्याच्याशी प्रेमाचे ‘गुफ्तगु करायला वैशाली रेड्डीस मोका वळत नसे. त्यामुळे ती नाराज होत असे.

असा हा ललनांचा गोतावळा, अवती भोवती बाळगणारा, त्यांच्यात खेळणारा, त्यांना खेळवणारा, स्वैराचाराचा कडेलोट करणारा, बलात्कार आणि खून यांची गणती न करणारा चार्ल्स शोभराज. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.