भर पावसात गोव्याला जायचं झालं, तर विस्टा डोमनं असा प्रवास करायचा असतोय

असं म्हणतात, “Focus on the journey, not just the destination.” म्हणजेच आपल्या आयुष्यात आपल्याला कुठे पोहोचायचंय हेच फक्त महत्वाचं नाहीये तर तिथे पोहोचेपर्यंतचा प्रवास सुद्धा तितकाच महत्वाचा आहे.

आता या वाक्याचा मी शब्दश: अर्थ घेतला आणि मला पहिला तर आमचा गोव्याचा प्रवास आठवला.

लॉकडाऊन संपल्या संपल्या आम्ही गोव्याला गेलेलो तेव्हा लय धमाल केलेली, तिथे जाऊन तर धमाल केलीच पण तिथे जाईपर्यंत सुद्धा खूप जास्त धमाल केली. हसलो खिदळलो, दंगा मस्ती केली, खाल्लं प्यायलं, गाणी म्हटली, फूल कल्ला.

आता ग्रुप म्हणल्यावर हे सगळं आलंच, पण आमचा प्रवास खरा सुंदर बनवला तो विस्टा डोमने…

हो, मी बोलतेय ते ‘मुंबई टू गोवा ट्रेन जर्नी’बद्दल. आणि तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण विस्टा डोमची ही ट्रेन जर्नी म्हणजे भारतातली ‘वन ऑफ द बेस्ट’ ट्रेन जर्नी समजली जाते.

या प्रवासात तुम्हाला स्वर्ग सुख अनुभवायला मिळणं हे फिक्स असतंय. झाडी डोंगार तर झालेच शिवाय धबधबे आणि घाटाघाटातनं जाणारी ‘विस्टा डोम ट्रेन’ डोळ्याचं पारणं फिटवणारी असते.

आता विस्टा डोम काय आहे तर जनशताब्दी एक्सप्रेसचा एक लक्झरीयस कोच आहे. आणि फक्त जनशताब्दीच नाही तर विस्टा डोम म्हणजे भारतीय रेल्वेतर्फे चालवण्यात येणारे स्पेशल कोचेस.

हे स्पेशल कोचेस फेमस ठिकाणी आणि टुरिस्टच्या आवडत्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांना अटॅच केले जातात. आणि यात मुंबई पुणे मुंबई प्रवासाचा पण समावेश होतो. 

भारतीय रेल्वेच्या आताच्या घडीला टोटल ४५ विस्टा डोम ट्रेन्स आहेत. त्यातलीच एक म्हणजे मुंबईहून गोव्याला जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस. आणि दुसरी म्हणजे मुंबईहून पुण्याला जाणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस..

विस्टा डोम ट्रेनची स्पेशालिटी काय आहे तर या डब्याच्या खिडक्या संपूर्ण काचेच्या आणि खूप मोठ्या आकाराच्या असतात जेणेकरून आत बसलेल्यांना बाहेरच्या निसर्गसौंदर्याचा असा, ‘रॉयली’ आस्वाद घेता येतो. आणि विस्टा डोमच्या सीट्स सुद्धा 180 डिग्री रोटेट होणाऱ्या असतात. म्हणजे या सीट्स तुम्हाला हव्या तशा तुम्ही फिरवू शकता आणि हवं तिकडे तोंड फिरवून तुम्ही बसू शकता.

शिवाय या कोचेसमध्ये कंपार्टमेंटचे अटोमॅटिक स्लायडिंग डोअर्स आहेत, एलसीडी टीव्हीचे अनेक स्क्रीन्स आहेत, मिनी ओव्हनची सोय आहे, मिनी रेफरीजरेटर आहे, आपलं सामान ठेवण्यासाठी सेपरेट लगेज एरिया आहे, वायफायची सोय आहे शिवाय टॉयलेटची सुद्धा उत्तम सोय आहे.

जनशताब्दी एक्सप्रेसचा मुंबई ते गोवा हा प्रवास आहे नऊ तासांचा. पावसाळ्यात आठवड्यातले सातही दिवस ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटते आणि गोव्यातलं ‘मडगांव’ हे या ट्रेनचं शेवटचं स्टेशन असतं. जेव्हा पावसाळ्याचे दिवस नसतात तेव्हा बुधवार सोडून ही ट्रेन आठवड्यात उरलेल्या सहा दिवशी CSMT स्टेशनवरुन सुटते.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ट्रेनचं बूकिंग कसं करायचं, तर तुम्ही या ट्रेनचं आणि स्पेशल कोचसाठीचं तिकीट ऑनलाइन बूक करू शकता, त्यासाठी तुम्हाला IRCTC च्या वेब साइट वर जावं लागेल, यूजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला तुमचं लॉगइन करावं लागेल. 

तिथे तुम्हाला फ्रॉम आणि टू असे ऑप्शन्स दिसतील, तिथे कुठून कुठे जायचय त्या स्टेशनांची नावं टाकायला लागतील, डेट टाकावी लागेल आणि कॅटेगरी मेंशन करावी लागेल.

नंतर येतो क्लास सिलेक्ट करण्याचा ऑप्शन. तिथे AC Chair Car किंवा Executive Chair Car यापैकीच कुठला तरी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो. मग तुम्हाला पेमेंटचे डिटेल्स  दिसतात, पुढच्या पानावर गेलात की तुम्हाला तुमच्या विषयीची संपूर्ण माहिती, तुमच्या बुकिंग विषयी माहिती आणि पेमेंट करण्यासाठीचे ऑप्शन्स दिसतात.

 विस्टा डोमसाठी जी कुठली एक्सप्रेस असते, त्या ठिकाणी तुम्हाला विस्टा डोमचा वेगळा ऑप्शन दिसतो. तो सिलेक्ट करावा लागतो.

विस्टा डोम कोच हा जनशताब्दी किंवा कुठल्याही ट्रेनचा यूज्वली सगळ्यात शेवटचा डब्बा असतो. डब्याच्या शेवटच्या भागात तिन्हीही बाजूंना मोठाल्या काचेच्याच खिडक्या लावलेल्या असतात. त्यामुळे तुम्हाला 360 डिग्री व्यू अनुभवता येतो आणि ट्रेनबाहेरची सगळी दृश्य अधिक चांगली दिसतात.  

आता सगळ्यांना गोव्याचं अॅट्रॅक्शन तिथे असणाऱ्या समुद्र किनाऱ्यांमुळे तर असतंच पण दुसरं म्हणजे तिथे असणाऱ्या घाटांमुळे सुद्धा गोव्याच्या सौंदर्यात अधिक भर पडते आणि तेच सौंदर्य तुम्हाला ट्रेनच्या या विस्टा डोमच्या स्पेशल कोचमुळे अनुभवता येतं. शिवाय फक्त गोवाच नाही तर अशीच सेम प्रवासाची मजा आपल्याला मुंबई पुणे प्रवासातही अनुभवता येते. 

मगाशी म्हटल्याप्रमाणे विस्टा डोमचा मुंबई ते पुणे प्रवास तुम्हाला डेक्कन क्वीनने करता येतो. आणि डेक्कन क्वीनच्या विस्टा डोम तिकीट बूकिंगसाठीची प्रोसीजर सुद्धा सेम असते.  

त्यात तुम्ही जर पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर लगेचच प्रवास करत असाल तर नादच. वळणा वळणावरची हिरवळ आणि या हिरवळीतून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे ट्रेनमध्ये बसून बघण्याची मजाच वेगळी असते..  

विस्टा डोम स्पेशल कोचवाली जनशताब्दी एक्सप्रेस CSMT स्टेशनवरुन सकाळी 5.10 ला सुटते आणि गोव्याला म्हणजेच मडगाव स्टेशनला दुपारी 2.10 वाजता पोहोचते. 

विस्टा डोमच्या स्पेशल कोचमध्ये एकूण ४४ सीट्स अव्हेलेबल असतात आणि ट्रेनमध्ये हा एकच कोच असल्यामुळे बुकिंग पटापट होऊन संपूनही जातं. त्यामुळे आपल्याला प्लॅन ठरला की लगोलग बुकिंग करणं भाग असतंय. या स्पेशल कोचचं तिकीट एक्झिक्युटिव क्लास इतकंच असतं आणि साधारण 2500 रुपयांच्या आसपास असतं. त्यामुळे, गोव्याला जाताना आयुष्यात एकदा तरी या विस्टा डोम ट्रेन मधल्या प्रवासाचा प्रत्येकाने आस्वाद घेतलाच पाहिजे भिडू. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.