आत्ता रामनवमीचं निमित्त ठरलंय पण ‘JNU आणि बीफ’ हा वाद तसा जुनाच आहे

जेएनयू म्हणलं की, आंदोलनं अन वाद आलेच. इथे उजव्या आणि डाव्या संघटनांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो.

सद्याच्या वादाला नॉनव्हेजचा मुद्दा कारणीभूत ठरला तर रामनवमीचं निमित्त ठरलंय. पण याआधीही जेएनयूमध्ये नॉनव्हेजवरून वाद झाले होते.

पण यानिमित्ताने भारतात नॉनव्हेज आणि त्यातल्या त्यात बीफ चा मुद्दा एवढा वादग्रस्त का ठरतो ? विद्यापीठांत नॉनव्हेज न खाण्याची सक्ती आहे का ? असे प्रश्न सद्या चर्चेत आहेत. 

तसेच गोमांस हा विषय भारतीयांसाठी अतिशय संवेदनशील विषय आहे.. पण भारतात गोमांस खाण्याबद्दलचा इतिहास बराच मोठाय..

१० एप्रिल म्हणजे रामनवमीला घडलेली घटना,

जेएनयुच्या कॅम्पसमध्ये एबीव्हीपी आणि डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनेच्या गटात संघर्ष झाला. याबाबतीत दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. एबीव्हीपी आरोप करतेय कि, रामनवमी निमित्त युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये पूजेचं आयोजन केलं होतं. यावेळी डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत पूजेत व्यत्यय आणला.

डाव्या संघटनानी केलेल्या आरोपानुसार, हॉस्टेलच्या मेसमध्ये नॉनव्हेज जेवण तयार केले जात होते. त्याला एबीव्हीपीने विरोध केला होता. या दोन्ही गटात हाणामारी झाली त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले.

जेएनयूच्या मेसमध्ये मांसाहार जेवणावरून हा वाद झाल्याचं सांगण्यात येतंय…..पण आत्ताचा वाद सोडता याआधी देखील जेएनयूमध्ये नॉनव्हेज वरून वाद निर्माण झाले होते.

२०१२-  मध्ये बीफ आणि पोर्क फेस्टिव्हल आयोजित केलं गेलं होतं.. बीफ म्हणजे गोमांस. बफ म्हणजे म्हशीचं मांस. पोर्क म्हणजे डुकराचे मांस. बीफ आणि पोर्क फेस्टिव्हल आयोजित केल्यामुळे जेएनयू प्रशासनाने एका विद्यार्थ्याला निलंबित केले होतं इतर काही विध्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

२०१४ – त्यानंतर पुन्हा एकदा सप्टेंबर २०१४ मध्ये जेएनयू कॅम्पसमध्ये बीफ आणि पोर्क फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले होते. या विरोधात एबीव्हीपी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासारख्या उजव्या विचारसरणीच्या अनेक संघटनांनी  विद्यापीठाबाहेर निदर्शने केली होती. राष्ट्रीय गोरक्षा सेनेने बीफ फेस्टिव्हलच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली. 

याआधी जेएनयूच्या रजिस्टारने एक परिपत्रक जारी केले होते. विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये गोमांस बाळगणे, खाणे किंवा शिजवणे यावर बंदी असल्याचं या परिपत्रकात म्हणलं आहे. याच परिपत्रकाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले होते.

बरं फक्त बीफ चा मुद्दा जेएनयुमधेच नाही तर उस्मानिया विद्यापीठात देखील गाजला होता. 

२०१५ – डिसेंबर २०१५ मध्ये उस्मानिया विद्यापीठात ‘बीफ-पोर्क फेस्टिव्हल चालू होतं. पण या फेस्टिव्हलवर हैदराबाद कोर्टाने बंदी घातली होती.   तर आयआयटी मद्रासमध्ये मे २०१७ मध्ये बीफ फेस्टिव्हल आयोजित केलं होतं. याचदरम्यान केरळात अनेक ठिकाणी बीफ फेस्टिव्हल आयोजित केलं गेलं. तेंव्हा देखील हा मुद्दा बराच पेटला होता. बरं भारतातच नाही तर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये देखील भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या जेवणातून बीफ आणि मांस काढून टाका अशी मागणी केलेली.

२०१६ – जेएनयूमध्ये दरवर्षी प्रजासत्ताक दिनी इंटरनॅशनल फूड फेस्टिव्हल आयोजित केलं जातं. पण २०१६ चं इंटरनॅशनल फूड फेस्टिव्हल वादात सापडलं होतं. या फूड फेस्टिव्हलमध्ये काश्मीर स्टॉल्सवर एबीव्हीपी च्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. नॉनव्हेज फूड असल्याच्या आणि इतर काही कारणावरून काश्मिरी फूड स्टॉलचे बुकिंग रद्द करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कायदेशीर कारवाईची धमकी देण्यात आली होती.

विद्यापीठांत मांस न खाण्याची सक्ती आहे का ?? 

हा प्रश्न जो या निमित्ताने विचारला जातोय याबाबत २०१५ दरम्यान हैद्राबाद कोर्टाचं म्हणणं होतं कि, विद्यापीठ कॅम्पसमध्ये बीफ-पोर्क फेस्टिव्हलसारखे कार्यक्रम आयोजित करणं बेकायदेशीर आहे.

 थोडक्यात बीफ-पोर्क फेस्टिव्हल्स पशु संरक्षण विधेयक,  क्रूरता प्रतिबंधक (कत्तलखाना) नियम, २००१ आणि गोहत्या प्रतिबंधक कायद्याचेही उल्लंघन करतात असं देखील स्पष्ट केलेलं.   

२०१४ मध्ये, दिल्ली कृषी पशु प्रतिबंध कायदा, १९९४, नुसार बीफ फेस्टिव्हला परवानगी देऊ नये असा निर्णय दिल्ली हाय कोर्टाने दिला होता. 

या कायद्यानुसार, गोमांस साठवण्यासाठी किंवा सर्व्ह करण्यासाठी पाच वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंडाची तरतूद आहे.

आता भारतात बीफ कुठे कुठे बॅन आहे ? 

तर भारतातील २९ पैकी २४ राज्यांमध्ये गोमांस उत्पादन आणि वापरावर बंदी घातली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगाना, बिहार, चंदीगड, झारखंड इत्यादी राज्यात बीफ बॅन आहे.

तर ईशान्य भारत, गोवा, केरळ, बंगाल, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये बीफ आणि गोहत्येवर बंदी नाही.

तामिळनाडूमध्ये तर १९७६ पासूनच गोहत्येवर पूर्णपणे बंदी आहे. पण याच तामिळनाडू मध्ये नॅशनल सँपल सर्व्हे २०११- १२ च्या रिपोर्टनुसार बीफ खाणाऱ्यांची संख्या ४० लाख इतकी आहे. तर केरळमध्ये हा आकडा ८० लाख एवढा आहे.

अलीकडे बीफ बॅन केलेले राज्ये…

केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये मे २०२१ च्या दरम्यान बीफ बॅन करण्यात आलं. लक्षद्वीपमध्ये ९० टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. असे असतानाही येथे गोमांस खरेदी-विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.  

तर ऑगस्ट २०२१ मध्ये आसाम मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा सरकारने पशु संरक्षण विधेयक २०२१ मंजूर केले.  त्याअंतर्गत कोणत्याही मंदिराच्या पाच किलोमीटरच्या आत गोमांस विक्री आणि खरेदी करण्यास मनाई करण्याची तरतूद केली आहे. हे झालेत वाद अन कोर्टाचे निर्णय ..

पण गोमांस हा भारतात जितका मोठा मुद्दा आहे तितकाच मोठा त्याला इतिहास देखील आहे.

लेखिका आणि मानवशास्त्राच्या अभ्यासक ईरावती कर्वे यांच्या  ‘आमची संस्कृती’ या पुस्तकातला संदर्भ पहिला तर, पाचव्या प्रकरणात पेज नं ५७ वर त्या लिहितात की, 

“गाय-बैल शेळ्या आणि मेंढ्या यांचे कळप पाळणारे बहुतेक लोकं या ना त्या स्वरूपात या प्राण्यांचे मांस खात आणि त्यांचे कातडे पांघरण्यासाठी, चपला बनविण्यासाठी, वाद्य बनविण्यासाठी वापरले जात. पूर्वी आर्य भारतात आले तेव्हा त्यांच्या जवळही अशा तऱ्हेचे कळप होते त्या प्राण्यांचे दूध मांस आणि कातडी याचा सर्रास वापर करत असत.

युरोपसारख्या थंड प्रदेशात मांस आठवड्याचा आठवडे टिकू शकते पण भारतासारख्या उष्ण प्रदेशात मास लवकर नासतं म्हणून जनावर मारलं की शक्य तितक्या लवकर ते खाऊन संपवावे लागायचे. शेळी मेंढी सारखे जनावर पाच ते सहा जणांना संपवता येत पण गाई-बैलांची मास संपायला चांगली ५० माणसं लागतात. त्यामुळे गायबैल सारखे मोठं जनावर मारणं मोठा मेजवानीचा प्रसंग समजला जाई.

याबाबत लेखिका लिहितात कि, “ मोठा मेजवानीचा प्रसंग आला किंवा कोणी थोर ऋषी आले तरच गाईचे कोवळे मांस शिजवले जाई. ब्राह्मणांचा सर्वात मोठा सन्मान करणे किंवा पाहुण्यांचा सन्मान करणे म्हणा –ह्या विधीला मधुपर्क असे नाव आहे व त्यात गोमांस अवश्य म्हणून उल्लेख आहे.”

 “प्राचीन आर्यांचे पंचगव्य म्हणजे गाईपासून झालेले पाच पदार्थ दुध, दही, तूप, लोणी आणि मांस असे होते.” अशी माहिती या पुस्तकात दिली आहे.

आता गोमांस आणि गोहत्येबाबत असणारे कायदे आणि गोभक्षणाचा इतिहास हे सगळे संदर्भ पाहता, भारतात निर्माण होणाऱ्या वादावर तुमचं काय म्हणणं आहे ? ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.