मित्राचं निलंबन झालं नी कांशीरामांनी सर्वात मोठं बहुजन आंदोलन बामसेफ उभी केली

सध्या एका बातमीने अख्या महाराष्ट्रात गोंधळ घातला आहे ती म्हणजे दलितांना पाणी नाकारण्यात आलंय. अमरावतीमध्ये ही घटना घडलीये. तर लातूरच्या ताडमुगळी गावानंतर आता हिंगोली जिल्ह्यातील सावरखेडा गावामध्ये सुद्धा दलित वस्तीवर बहिष्कार टाकण्यात आल्याच्या बातम्या समोर येतायेत. अशा बातम्या जेव्हा ऐकण्यात येतात तेव्हा आठवतात ते लोक ज्यांनी दलितांना या जाचातून काढण्यासाठी आयुष्य खर्ची केलं होतं.

यातील अनेक नेत्यांपैकी एक म्हणजेच ‘कांशीराम’. कांशीरामांचं नाव यासाठीसुद्धा लगेच आठवतं कारण त्यांनीच बहुजन समूहाचं सर्वात मोठं आंदोलन उभं केलं होतं, ज्याला आज आपण ‘बामसेफ’ म्हणून ओळखतो. दलितांसाठी लढा देत, त्यांना हक्क देत राजकारणात उतरवण्याचं काम त्यांनी केलं. आजही कांशीरामांचे शिष्य उत्तरप्रदेशच्या राजकारणात कसे दबदबा राखून आहेत, आपण सर्वच बघतोय.

मात्र जिथून याची सुरुवात झाली होती त्या बामसेफची स्थापना नेमकं कांशीरामांनी कशी केली? त्याचाच हा किस्सा 

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा कांशीराम पुण्याच्या दारुगोळा फॅक्ट्रीमध्ये ‘क्लास वन अधिकारी’ म्हणून कार्यरत होते. याच ठिकाणी राजस्थानचे दीनाभाना एससी, एसटी वेलफेअर असोसिएशनशी संबंधित काम बघायचे. एकदा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टी द्यावी’ या मुद्यावरून दीनाभाना यांचा त्यांच्या वरिष्ठासोबत वाद झाला आणि या कारणावरुन त्यांना थेट निलंबित करण्यात आलं होतं. 

इतकंच नाही तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील डी. के. खापर्डे यांना देखील निलंबित करण्यात आलं. ते महार जातीचे होते. कांशीराम यांना लवकरच सर्व घटनाक्रम समजला. तेव्हा कांशीराम यांना अशा मानसिकतेचा प्रचंड राग आला. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टी न देणाऱ्यांची जोपर्यंत सुट्टी करत नाही तोपर्यंत मी शांतपणे बसू शकत नाही’, असा निर्धार त्यांनी केला. 

कांशीराम वंचितांसाठीच्या संघर्षात उतरले. तेव्हा क्लास वन अधिकारी असून देखील त्यांना निलंबित करण्यात आलं. मात्र ते अन्याय सहन करणारे नव्हते आणि जरा जहाल विचारसरणीचे होते. त्यामुळे ज्या अधिकाऱ्याने त्यांचं निलंबन केलं होतं, त्या अधिकाऱ्याला कांशीरामांनी मारहाण केली. इथूनच बामसेफच्या (BAMCEF-Backward And Minority Communities Employees Federation) स्थापनेची ठिणगी पेटली.

यानंतर काही काळाने दीनाभाना यांना पुन्हा कामावर घेतलं गेलं मात्र त्यांची बदली दिल्लीमध्ये करण्यात आली. या घटनेनंतर तर कांशीराम अजूनच विचारात पडले. कारण हाही अन्यायाचा प्रकारचं होता. जर आपल्यासारख्या अधिकाऱ्यांवर अन्याय होतोय तर देशातील दलित आणि मागासवर्गीयांवर किती होत असेल, याचं विचाराने त्यांची झोप उडाली. आणि अशा घटकांसाठी काम करण्याचं ठरवून त्यांनी नोकरी सोडली. 

अशा समाजातील दुर्लक्षित आणि अन्यायाने ग्रस्त गटासाठी कार्य करण्याची कल्पना त्यांनी निलंबनाच्या घटनेचे शिकार झालेले दीनाभाना आणि डी. के खापर्डे यांना सांगितली. त्यांनीही या कार्यात साथ देण्यास होकार दिला. मात्र सर्वात जास्त काम केलं ते कांशीराम यांनी, कारण त्यांनी नोकरी सोडली होती. ज्यामुळे त्यांच्याकडे वेळच वेळ होता. ते त्या एससी, एसटी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष झाले ज्यामध्ये दीनाभाना सहभागी होते. 

कालांतराने त्यांच्या लक्षात आलं की फक्त एससी, एसटीसाठी काम करुन चालणार नाही. परिवर्तनसाठी सर्वच बहुजन समाजाला घ्यावं लागेल. याच विचारातून त्यांनी एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांसाठी देखील काम सुरु केलं. यासाठी एक संघटना स्थापन करण्याची कल्पना डिसेंबर १९७३ साली आली. 

त्यानंतर ६ डिसेंबर १९७८ साली राष्ट्रपती भवनाच्या समोर असलेल्या बोट क्लब मैदानावर या संघटनेची औपचारिक स्थापन करण्यात आली. 

या संघटनेला ‘बर्थ ऑफ बामसेफ’ असं नाव देण्यात आलं. या संघटनेचे दीनाभाना, डी. के खापर्डे आणि कांशीराम हे तिघे संस्थापक. 

बामसेफच्या बॅनरखाली कांशीराम आणि त्यांच्या साथीदारांनी दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध केला. कांशीराम यांनी दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील दलित कर्मचाऱ्यांची एक मजबूत संघटना स्थापन केली. त्यांच्या या क्रांतीच्या पथामध्ये हातभार लावण्यासाठी बरेच अधिकारी आणि कर्मचारी ही संघटना चालवण्यासाठी आपल्या पगाराचा बहुतांश हिस्सा देत होते.

या समाजाला जर स्वत:चा उत्कर्ष साधायचा असेल तर मनुवादी समाज व्यवस्था मोडून काढली पाहिजे, असं कांशीराम त्यांना वारंवार सांगत राहिले. 

आपल्या सहकाऱ्याच्या निलंबनाच्या घटनेतून कांशीरामांनी पुढे इतकं मोठं बहुजन आंदोलन उभं केलं. जिवंत हृदयाचा माणूस म्हणजे काय याचं उदाहरण म्हणजे कांशीराम.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.