फक्त महिला पत्रकारांकडून चालवणाऱ्या खबर लहरियावरची डॉक्युमेंटरी ऑस्करसाठी गेलीय

‘हमार खबर, हमार आवाज’ असं म्हणत गेल्या २० वर्षांपासून एक न्युज पोर्टल चालवलं जात आहे. देशभरातल्या बातम्या, गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या पत्रकारांची टीम करतेय. तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष ? खबर लहरिया केवळ त्याच्या पत्रकारांमुळेच नव्हे तर त्याच्या पत्रकारितेमुळेही अद्वितीय आहे.

पण खबर लहरियाचं एक वैशिष्ट म्हणजे, हे जगातील एकमेव न्यूज नेटवर्क आहे जे फक्त महिला पत्रकारांची टीम चालवते. या महिला कोण आहेत तर, दलित, मुस्लिम, आदिवासी आणि मागास जातीच्या आहेत. 

 

आजची भारी बातमी म्हणजे त्यांच्यावर बनवलेल्या डॉक्युमेंटरीला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. “सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर” साठी ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. या चित्रपटात ‘खबर लहरिया’च्या टीमचा वर्तमानपत्र ते डिजिटल मीडियापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ऑस्करसाठी नामांकन मिळालेला हा पहिली भारतीय फीचर डॉक्युमेंटरी आहे. पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्याचा “रायटिंग विथ फायर” डॉक्युमेंटरी बनवायला पाच वर्षे लागली. 

हिंदी आणि प्रादेशिक पत्रकारितेत आपला ठसा उमटवणाऱ्या ‘खबर लहरिया’ या साप्ताहिक वृत्तपत्राने अलीकडेच २० वर्षे पूर्ण केली आहेत. उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील कारवी शहरात २००२ मध्ये सुरू झालेल्या या अनोख्या प्रयोगाने आता उत्तर आणि मध्य भारताच्या ग्रामीण भागात चांगली पकड घेतली आहे. सध्या ते चित्रकूट, बांदा, महोबा, बनारस आणि फैजाबाद येथून बातम्या प्रकाशित करता आहेत.

देशभरात आपला ठसा उमटवणे आणि तो प्रभाव आणि कामाची तत्परता कायम ठेवणे असे आव्हाने या महिलांच्या टीम ने यशस्वी करून दाखवली आहेत. 

खबर लहरियाची एक वेगळी ओळख आहे आणि त्याच्या लोकप्रियतेचे कारण म्हणजे त्यात प्रकाशित झालेल्या स्थानिक बातम्या.

हे वृत्त अहवाल स्थानिक समस्यांचा सखोल आणि निष्पक्ष पद्धतीने तपास करतात. खबर लहरिया तळागाळातील समस्यांच्या पत्रकारितेसाठी ओळखली जाते. ग्रामीण गरिबांसाठी जाहीर केलेल्या योजना आणि ग्रामीण विकासासाठी वाटप केलेले बजेट यावर बारीक नजर ठेवणारी पत्रकारिता.

अगोदर हे मासिक स्वरुपात कार्यरत होते मात्र हळूहळू माध्यमे आणि पत्रकारिता जशी बदलत गेली तशी या ग्रामीण न्यूज नेटवर्कने देखील बदल स्वीकारले आणि डिजिटल स्वरुपात आले.

उत्तर आणि मध्य भारतातील ग्रामीण भागातील महिलांच्या प्रश्नांवर केंद्रित असणाऱ्या बातम्या बाहेर याव्या, त्यावर बोललं जावं या प्रयत्नातून सुरू झालेले वृत्तपत्र आता प्रादेशिक प्रशासन, शिक्षण आणि विकास इत्यादींसह प्रदेशातील इतर अनेक मुद्दे समोर आणत आहे.

वृत्तपत्र त्याच प्रदेशातील ४० महिलांच्या संस्थेद्वारे चालवले जाते, जे वृत्त निवडीपासून संपादन, छायाचित्रण, स्वरूपन आणि वृत्तपत्राचे प्रकाशन या सर्व जबाबदाऱ्या हाताळतात.

“हमार खबर, हमार आवाज” म्हणजेच “आमच्या बातम्या, आमच्या भाषेत” हेच खबर लहरियाची खासियत आहे.

हिंदी व्यतिरिक्त, हा साप्ताहिक पेपर, प्रामुख्याने प्रादेशिक भाषांमध्ये बुंदेली, अवधी आणि भोजपुरी मध्ये प्रकाशित होतो, विषयांतील भाषिक पोहोच आणि विविधतेमुळे इतर वृत्तपत्रांमधून वेगळं आहे. या ८ पानांच्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या ६००० प्रती उत्तर प्रदेश आणि बिहारच्या ६०० गावांमध्ये प्रकाशित केल्या जातात.

सुमारे ८०,०००  वाचकांपर्यंत पोहोचलेल्या वृत्तपत्र ‘खबर लहरिया’ ला महिला पत्रकारितेच्या क्षेत्रात ‘चमेली देवी जैन पुरस्कार’ आणि ‘युनेस्को किंग सेजोंग’ सारखे पुरस्कार मिळवले आहेत. 

खबर लहरियाने डिजिटल युगात एन्ट्री केली आणि देशातील एकमेव डिजिटल ग्रामीण माध्यम नेटवर्क बनले आहे.

आजच्या काळात आपण पाहतोच कि, माध्यमं आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात, जेव्हा रंजक आणि मसालेदार बातम्यांना महत्त्व देतात कारण लोकं देखील तेच वाचतात, मात्र अजूनही असे खरे वाचक आहेत ज्यांना आत्ताच्या काळात देखील बातमी आणि बातमीमागचं सत्यता वाचणे आवश्यक वाटते.

अशा वाचकांमुळे तळागाळात काम करणाऱ्या अशा संस्थांचे महत्त्व खूप वाढते. अलिकडच्या काळात नोकरीच्या शोधात ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. पण तरीही भारताच्या लोकसंख्येचा सर्वात मोठा भाग, जो ६७% पेक्षा जास्त आहे, ग्रामीण भागात राहतो.

अशा परिस्थितीत या क्षेत्रांचे प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न अगदी स्तुत्य आहे.

२००२ पासून स्वतंत्र, स्थानीय और निष्पक्ष पत्रकारिता अशी भूमिका म्हणजे खबर लहरिया !

खबर लहरिया आपल्या पत्रकारीतेमधून कायमच एक स्पष्ट संदेश देतो की,

ग्रामीण भाग, येथील समस्या, प्रश्न हे शहरी भागाकडून कसे दुर्लक्षित केले जात आहेत. हे लक्षात ठेवले पाहिजे की आधुनिक शहरांचे सध्याचे जे स्वरूप आहे ते देशातील विविध ग्रामीण आणि प्रादेशिक क्षेत्रातील संसाधनांचे शोषण करून तयार केले गेले आहे. थोडक्यात गावांमुळेच शहरे आहेत ! खबर लहरियामध्ये, कौटुंबिक वर्तुळातले  तसेच सार्वजनिक क्षेत्रातल्या सत्ता आणि असमानतेवर सतत प्रश्न उपस्थित केले जातात.

त्यामुळे ‘खबर लहरिया’ सारख्या संस्थांची आज खूप गरज आहे, ज्यांच्याकडे समाजाच्या पारंपारिक पद्धतींपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची इच्छाशक्ती आहे, जेणेकरून शहरे आणि गावांमधील ही वाढती दरी कमी करता येईल….शहर आणि खेडे मधील दुवा बनता येईल !

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.