बच्चन, लता दीदी ते मुख्यमंत्री… लॉकडाऊनमध्ये सगळे फक्त ‘हास्यजत्रेचं’ कौतुक करत होते..
टीव्ही चॅनल्सवर अनेक रिआलिटी आणि कॉमेडी शोज येतात आणि जातात. काही शोज आपण पहातो आणि विसरूनही जातो, ते तेवढ्यापुरतेच असतात. पण काही रिआलिटी शोज आपल्या कायम आठवणीत राहतात.
‘कोण होणार करोडपती’ या शोचच पाहिलं तर, तिथे येणारे स्पर्धक अगदी आपल्यासारखे साधे असतात, आपल्या सारखंच आयुष्य जगत असतात पण तरी मोठी स्वप्न पहायचं ध्येय डोळ्यासमोर ठेऊन पुढे जात असतात. त्यांच्याकडे पाहून ‘हे आपल्यालाही जमू शकतं’ असं आपल्याला वाटून जातं आणि म्हणून त्या स्पर्धकांचं तिथवर पोहोचणं आपल्याला आपलंच यश वाटत रहातं.
आपल्याला अजून एक शो पाहून सुद्धा असंच भारी वाटतं. तो शो म्हणजे
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’.
आता तुम्हाला पर्वणीची गोष्टी सांगायची झाली तर आपल्या, एका आवडत्या शो मधल्या भन्नाट कलाकारांनी आपल्या दुसऱ्या आवडत्या शोमध्ये हजेरी लावली होती.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधले कलाकार ‘कोण होणार करोडपती’च्या रंगमंचावर येऊन गेले, धमाल करून गेले.
खरंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचं नाव कोणी काढलं तर मला माझे लॉकडाऊनचेच दिवस आठवतात. निराशेच्या गर्तेतले आपण सगळे, अगदीच सगळं असह्य व्हायला लागलं की ‘सोनी मराठी’ चॅनल लाऊन महाराष्ट्राची हास्यजत्रा बघत बसायचो.
मास्क, सॅनिटायझर सोबत हास्यजत्राची टीमसुद्धा आपल्या मूलभूत गरजांमध्ये अॅड झाली होती.
नम्रताची लॉली, ओंक्याचा मामा, निमिषचा जावई, समीरचा बाप, प्रसादचा नवरा अशी सगळी कॅरक्टर्स आपली घरातलीच झाली होती. ही कॅरक्टर्स आणि ह्यांची कॉमेडी कुठेही, कधीही आणि केव्हाही सुरू झाली की सुरूच राहायची. आजही ह्यातलं कोणीही टीव्ही स्क्रीनवर दिसत असलं की कोणी चॅनल बदलत नाही की टीव्ही बंदही करत नाही. स्किट सुरवातीपासून बघण्याचा पण आग्रह नाही. कुठूनही बघायला घेतलं तरी तेवढंच हसायला येतय.
बरं हे फक्त आमचं म्हणणं आहे का तर नाही.. हे अख्ख्या महाराष्ट्राचं, महाराष्ट्रातल्या जनतेचं, अनेक मोठ्या सेलेब्रिटीजचं आणि बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांचंही म्हणणं आहे.
हास्यजत्रेच्या अख्ख्या टीमने मागच्या वर्षी फिल्म सिटीला जाऊन अमिताभ बच्चन यांची भेट घेतली होती. यावेळी अमिताभ बच्चन यांनी संपूर्ण टीमचं विशेष कौतुक केलं होतं.
“अतिशय कठीण अशा काळात तुम्ही लोकांना हसवण्याचं अतिशय कठीण काम करत आहात, ते असंच करत रहा” असं अमिताभ बच्चन म्हणाले होते.
शिवाय लॉकडाऊनच्या काळात आपल्या निखळ मनोरंजनातून या कार्यक्रमाने आपल्या देशाची सरस्वती, गानकोकिळा, म्हणजेच भारतरत्न लता मंगेशकर यांना सुद्धा खूप हसवलं होतं, त्यांचं निखळ मनोरंजनही केलं होतं, बातम्यांमधून आपल्या कानावर आलंच असेल की या शोचं आणि शो मधल्या कलाकारांचं लता दीदीनी अनेकदा कौतुक सुद्धा केलं होतं.
समीर चौगुले यांनी त्यावेळी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी, लता दिदी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो अगदी न चुकवता पहायच्या आणि त्यांना हा शो मनापसून खूप आवडायचा असा उल्लेख केला होता.
शिवाय लता दीदिंनी समीर चौगुले आणि अख्ख्या हास्यजत्रेच्या टीमला त्यांच्या कामाची पोचपावती म्हणूण काही भेट वस्तूही पाठवल्या होत्या, त्यावर स्वतःच्या हस्ताक्षरात नोट लिहिली होती.
इतक्या मोठ्या व्यक्तिकडून मिळालेली कौतुकाची थाप हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमसाठी खूप मोलाची होती.
अजून एक कौतुकाची थाप, हास्यजत्रेच्या टीमसाठी अतिशय महत्वाची ठरली होती, ती म्हणजे या हास्यकलाकारांना तत्कालीन मुख्यमंत्ऱ्यांच्या हस्ते मिळालेला
‘माझा पुरस्कार’.
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मूळये यांचा ‘माझा पुरस्कार’ सोहळा तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पार पडला होता. कोविड काळात प्रत्येकाला आलेलं नैराश्य दूर करण्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमचा खूप मोठा वाटा आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून संपूर्ण टीमला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
यावेळी लेखक सचिन मोटे, निर्माता-दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक-अभिनेते समीर चौगुले, अभिनेते प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, नम्रता संभेराव यांना हे पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले होते.
हे ही वाच भिडू:
- आणि सुधा मूर्ती नारायण मूर्तींना म्हणाल्या,”मी पुण्याची आहे… तुम्हाला उधारी फेडावीच लागेल”
- काय पण म्हणा रंजना अशोक सराफला कॉमेडीत जडच जायची.